बंद

    13.02.2024 : पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय क्षेत्रात आगामी काळात अनेक संधी : राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: February 13, 2024

    पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय क्षेत्रात आगामी काळात अनेक संधी : राज्यपाल रमेश बैस

    भारतात इंद्रधनुष्य क्रांती झाली असून कृषि क्षेत्रात हरित क्रांती, दुग्ध उत्पादनात श्वेत क्रांती, डाळींच्या उत्पादनात पीत क्रांती, मत्स्य उत्पादनात निलक्रांती तर मांस उत्पादनात लाल क्रांती झाली. आगामी काळात पशुपालन, मत्स्य शेती व दुग्धव्यवसाय हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी आकर्षक होणार असून या क्षेत्रात गुंतवणूक, उद्योग व रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज येथे केले.

    राज्यपाल बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचा (माफसू) ११ वा दीक्षांत समारोह संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालनाची भूमिका महत्वाची आहे असे सांगून पशुविज्ञान विद्यापीठातील स्नातकांकडे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याची तसेच रोजगार निर्मिती करुन सामान्य नागरिकांना उपजीविका उपलब्ध करुन देण्याचे सामर्थ्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या क्षेत्रातील स्नातकांनी पशुपालन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यपालन या क्षेत्रात लाभदायक उद्योग सुरु करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

    विद्यापीठातील प्राध्यापक – स्नातकांनी २०२२ या वर्षी लम्पी त्वचा रोगाच्या निर्मूलनाचे कार्य करताना अनेक प्राण्यांचे जीव वाचवले तसेच स्वदेशी गायींच्या संवर्धनासाठी महत्वपूर्ण कार्य केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

    दोन महिन्यांपूर्वी आपण गोरेवाडा नागपूर येथील वन्यजीव बचाव व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली होती याचे स्मरण देऊन मनुष्य व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    आपल्या दीक्षांत भाषणात मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ अनिल कुमार श्रीवास्तव यांनी दुग्ध उत्पादन क्षेत्रातील श्वेत क्रांतीचा प्रभाव व सकल मूल्य हरित क्रांतीपेक्षा अधिक होते, असे सांगितले. अन्नधान्य उत्पादनात देश आत्मनिर्भर असला तरीही देशात कुपोषण आढळते असे सांगून पोषण सुरक्षेची समस्या दूध, अंडी, मासे व मांस यांच्या माध्यमातून सोडविता येऊ शकते असे त्यांनी सांगितले. वातावरणातील टोकाच्या बदलांचा मोठा परिणाम कृषी व अन्नधान्य उत्पादनावर होईल असे सांगून राज्यात तसेच देशात पशुसंवर्धन व मत्स्यपालन उद्योग यातील मोठ्या क्षमतांचे दोहन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

    दीक्षांत समारोहात १७९० स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या, ९५ स्नातकांना सुवर्ण व रौप्य पदके देण्यात आली तर तीन स्नातक विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देण्यात आली.

    यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. माफसुचे कुलगुरु डॉ नितीन पाटील यांनी विद्यापीठ अहवाल सादर केला.

    दीक्षांत समारोपाला विद्यापीठाचे माजी कुलगुरु, इतर विद्यापीठांचे कुलगुरु, विभाग प्रमुख, शिक्षक व स्नातक उपस्थित होते.