12.10.2023- आरोग्य विद्यापीठ आंतराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करेल – मा. कुलपती तथा राज्यपाल
आरोग्य विद्यापीठात मा. राज्यपाल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न
आरोग्य विद्यापीठ आंतराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करेल
– मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांचे प्रतिपादन
नाशिक: (दि.12) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ शिक्षण व आरोग्य क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्णाण करेल असा विश्वास विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी विद्यापीठाच्या आढावा बैठकीत केला. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ व अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी सांगितले की, कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कनिटकर यांच्या नेतृत्वात शिक्षण आणि संशोधनात उत्कृष्टता सुनिश्चित करण्यासाठी विविध पावले उचलत आहे. राज्यात आरोग्य विद्यापीठ खूप महत्वाचे आहे, कारण समाजाचे आरोग्य आणि आरोग्य शिक्षणाशी विद्यापीठाचा थेट संबंध आहे.
ते पुढे म्हणाले की, वैद्यकीय विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सतत प्रगती होत असल्याने अभ्यासक्रम सतत अद्ययावत करणे आवश्यक आहे. याबरोबर आरोग्य शिक्षणातील पदवीधरांना संवाद कौशल्य शिक्षण देणे गरजेचे आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा अवलंब करुन शिक्षणातून समग्र दृष्टिकोनास चालना मिळेल असे उपक्रम घ्यावेत. डॉक्टरांचा रूग्णांशी नम्र संवाद देखील आवश्यक आहे संवाद कौशल्याचा भाग अभ्यासक्रमात असावा जेणेकरुन रुग्ण व डॉक्टर यांचे मतभेद टाळता येतील. विद्यापीठाला पुरेशी संसाधने आणि निधी उपलब्ध करुन देणे महत्वाचे आहे. प्राध्यापक आणि संशोधकांना आरोग्य सेवेत येणारी आव्हानांना टाळण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा पाठपुरावा करुन विद्यार्थ्याना प्रोत्साहित करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, संशोधन क्षमता आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर वैद्यकीय संस्थांशी भागीदारी वाढवावी. आरोग्य विद्यापीठ हा समाजाचा भाग आहे म्हणूनच ते आरोग्य सेवेच्या समस्येच्या बाबतीत लोकांच्या समस्यांविषयी संवेदनशील असावे. विद्यापीठाने मोबाइल क्लिनिक आणि टेलिमेडिसिन उपक्रम देखील राबवावेत. आरोग्य सेवा कर्मचारी, परिचारिका यांना अन्य देशातही रोजगाराच्या मोठया प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. विद्यापीठाने नियमितपणे वंचित नागरिकांसाठी वैद्यकीय आणि आरोग्य शिक्षण, कार्यशाळा, शिबिरे आयोजित करावेत. वृद्ध लोकांची आरोग्याची काळजी, औषधे आदी गरजा भागविण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. अन्य देशातील विद्यार्थ्यांना भारतात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गतिशील परिसंस्था तयार केली पाहिजे, ज्याव्दारा अन्य देशातील विद्यार्थ्यांना आरोग्य शिक्षणासाठी आपल्या देशाकडे आकर्षित करू.
आयुर्वेद, युनानी, सिध्दा आणि होमिओपॅथी यांच्या उपचार पध्दती प्रभावी असून त्यांचा मोठया प्रमाणात वापर होण्यासाठी जगभरातील विद्यार्थ्यांना आयुर्वेद आणि आयुष विषयांमधील पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रमांकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. मानसिक आरोग्य हे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे ज्यात जीवनशैलीशी संबंधित रोग वेगाने वाढत आहेत. या रोगांच्या उपचार, मार्गदर्शन व सल्ला यासाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित होणे आवश्यक आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाने पुणे येथे नुकतीच सुरु केलेली जीन हेल्थ लॅब, विद्यापीठ परिसारातील प्रकृती पंचकर्मा केंद्र महत्वपूर्ण असून औषध, शस्त्रक्रिया, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि सिध्द या क्षेत्रातील दर्जेदार संशोधक निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे असे सांगितले.
याप्रसंगी सादरीकरणाव्दारे विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यापीठाकडून विविध शैक्षणिक आणि संशोधन विषयक उपक्रम राबविण्यात येतात. संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी अविष्कार, खेळांना चालना देण्यासाठी क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्पंदन आदी कार्यक्रम घेण्यात येतात. कमी मनुष्यबळात विद्यापीठाने अनेक विविध उपक्रम व्हिजन डॉक्युमेंटमध्ये नमुद केल्यानुसार प्रारंभ केला आहे. विद्यापीठातर्फे यावर्षी वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमास प्रारंभ करण्यात आला असून 52 विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. उत्तम दर्जाचे आरोग्य शिक्षणासाठी विविध संस्थाबरोबर सांमंजस्य करार करण्यात आला आहे. विद्यापीठाचा मालेगांव मॅजिक संशोधन प्रकल्प, ब्लॉसम, नासिकल आदी उपक्रम विद्यापीठाकडून राबविण्यात येत आहेत. विद्यापीठाकडून विहित वेळेत निकाल जाहिर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून अत्यंत कमी वेळात निकाल घोषित करण्यात येतो. विद्यापीठाकडून फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम, नॅक मानांकनाकरीता नॅकसेलचा प्रारंभ करण्यात आला आहे. विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांचे मूल्यांकन करण्याच्या पध्दतीत ऑटोमेशन पध्दतीचा वापर करत आहे, यामुळे गुणवत्ता व दर्जा यांचे मूल्यांकन राखण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, विद्यापीठाची कार्यप्रणाली व प्रशासकीय कामकाज सुयोग्यरित्या होत असून उच्चतम कार्यप्रणालीचा वापर करण्यात येतो. विद्यापीठाने विविध संस्थासमवेत सामंजस्य करार केले आहेत. तंत्रज्ञानाचा व सॉफ्टवेअरचा वापर कामकाजात मोठया प्रमाणात केला असून परीक्षेनंतर एक दिवसात परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. विद्यापीठाचा परिसर ग्रीन कॅम्पस उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले आहे. विद्यापीठाने समर इंटरशिप प्रोगाम सुरु केला असून विद्यार्थ्यांना त्याचा मोठया प्रमाणात उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी आढावा बैठकीच्या सुरवातीला विद्यापीठ परिसराची पहाणी केली. याप्रसंगी विभागीय आयुक्त मा.श्री. राधाकृष्ण गमे, मा. राज्यपाल महोदयांच्या सचिव श्रीमती श्वेता सिंघल, पोलिस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, जिल्हा परिषदेच्या सीईओ श्रीमती अशिमा मित्तल, मा. राजभवनातील अधिकारी श्री. रमेश येवले, श्री. विकास कुलकर्णी, परिक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, डॉ. मृणाल पाटील, डॉ. सुनिल फुगारे, डॉ. उदयसिंह रावराणे, डॉ. नितीन कावेडे, डॉ. संजय नेरकर, श्री. महेंद्र कोठावदे, डॉ. मनोजकुमार मोरे, डॉ. व्यंकट गिते आदी अधिकारी उपस्थित होते.