बंद

    11.12.2023 : पंतप्रधानांच्या संबोधनाने ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’ उपक्रमाचा शुभारंभ

    प्रकाशित तारीख: December 11, 2023

    पंतप्रधानांच्या संबोधनाने ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’ उपक्रमाचा शुभारंभ

    महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत प्रथमच राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांची कार्यशाळा संपन्न

    अमृतकाळ ही विकासाकरिता गरुड भरारी घेण्याकरिता योग्य वेळ : पंतप्रधान मोदी

    विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी विकसित विद्यापीठे व शिक्षण प्रणाली अत्यावश्यक : राज्यपाल रमेश बैस

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’ या उपक्रमाचा शुभारंभ केला. महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख आणि प्राध्यापक यांच्यासाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेला पंतप्रधानांनी यावेळी संबोधित केले.

    अनेक देशांनी आपल्या इतिहासात सर्वांगीण विकासासाठी एकदा निर्धाराने गरुड भरारी घेतली व ती राष्ट्रे आज विकसित राष्ट्रे म्हणून नावारूपाला आली आहेत. स्वातंत्र्याचा अमृतकाळ ही विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्याकरिता गरुड भरारी घेण्याची योग्य वेळ आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केले.

    विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्याची जबाबदारी ज्या शिक्षक, विद्यापीठे व शिक्षण संस्थांवर आहे त्यांनी अमृत काळातील एकही क्षण वाया जाणार नाही या दृष्टीने प्रयत्न करावे असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. अधिकाधिक युवकांना विकसित भारत संकल्पनेशी जोडण्यासाठी विद्यापीठांनी आपल्या स्तरावर अभियान चालवावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. विकसित भारत अभियानातून देशाला नेतृत्व प्रदान करणारी अमृत पिढी घडवायची आहे असे त्यांनी सांगितले.

    केवळ शिक्षण व कौशल्यातून अमृतपिढी निर्माण होणार नाही तर उत्तम नागरिक होण्याकरिता सर्वांनी रहदारीचे नियम पालन करणे, तसेच उद्योजकांनी देशातील उत्पादनांची गुणवत्ता सर्वोत्तम राहील या दृष्टीने प्रयत्न करणे देखील आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

    आज जगातील काही देशांची लोकसंख्या वृद्धतेकडे झुकत आहे. अशावेळी युवा राष्ट्र असलेल्या भारताकरीता पुढील ३० ते ४० वर्षे महत्वाची आहेत असे सांगून विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक युवकाकडे किमान एक तरी कौशल्य राहील याची खातरजमा विद्यापीठांनी करावी असे पंतप्रधानांनी सांगितले.

    विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी विकसित विद्यापीठे व शिक्षण प्रणाली अत्यावश्यक : राज्यपाल रमेश बैस

    यावेळी राजभवन येथील कार्यशाळेसाठी आलेल्या राज्यातील ६५ विद्यापीठे व शिक्षण संस्थांच्या कुलगुरु व विद्यापीठ प्रमुखांच्या कार्यशाळेला संबोधित करताना राज्यपाल रमेश बैस यांनी ‘विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विद्यापीठे विकसित होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

    विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांचा देशाच्या विकासाशी घनिष्ट संबंध आहे, असे नमूद करून बहुतेक विकसित राष्ट्रांकडील विद्यापीठे व संशोधन संस्था जगात अग्रेसर आहेत, असे राज्यपालांनी सांगितले. महान राष्ट्रांच्या प्रगतीमध्ये तेथील विद्यापीठांचा मोलाचा वाटा आहे असे सांगून विकसित भारतासाठी विकसित विद्यापीठे व विकसित शिक्षण प्रणाली असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल बैस यांनी यावेळी केले.

    जगातील ५० सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमधील एकट्या अमेरिकेतील १७ विद्यापीठे आहेत, तर ब्रिटन मधील ६, हॉंगकॉंग मधील ४, ऑस्ट्रेलियातील ५ व बाकी फ्रांस, जर्मनी व कॅनडा देशांमधील आहेत. येथील विद्यापीठे आपल्या देशातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना आकृष्ट करीत आहेत. शिक्षणानंतर अनेक विद्यार्थी नोकरी व्यवसायासाठी त्या त्या देशात थांबत असल्याने प्रतिभावंत विद्यार्थ्यांचे देशाबाहेर कायमस्वरूपी स्थलांतर होत आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    आज जगातील सर्वोत्तम अकाउंटिंग फर्म्स, सर्वोत्तम कन्सल्टिंग फर्म्स तसेच कला व डिझाईन संस्था अमेरिका, इंग्लंड देशांमधील आहेत. त्यामुळे देशात सर्वोत्तम शैक्षणिक, संशोधन व व्यावसायिक संस्था उभारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.

    जगातील सर्व मोठ्या विद्यापीठांकडे विशाल कॉर्पस निधी आहे, तेथील माजी विद्यार्थ्यांकडून देखील विद्यापीठांना मोठ्या देणग्या मिळतात. आपल्या विद्यापीठांनी देखील माजी विद्यार्थ्यांना विद्यापीठांशी जोडावे तसेच आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा असे राज्यपालांनी सांगितले.

    विद्यापीठे विकसित होण्यासाठी तेथील शिक्षकांची पदे पूर्ण भरली गेली पाहिजे असे सांगून आज बहुतांश विद्यापीठांमध्ये मंजूर पदांपैकी केवळ ५० टक्के पदे भरली असून उर्वरित पदे तात्पुरत्या स्वरूपात भरली असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शिक्षकांकडून होते तसेच शिक्षकांचे मूल्यमापन देखील विद्यार्थ्यांकडून झाले पाहिजे कारण त्यामुळे शिक्षकांचे विद्यार्थ्यांप्रती उत्तरदायित्व वाढेल असे राज्यपालांनी सांगितले.

    आज जर्मनी, जपान, इटली यांसारख्या सरासरी वयोमानानुसार वयोवृद्ध होत चाललेल्या देशांना भारताकडून कुशल युवा मनुष्यबळाची आवश्यकता आहे असे सांगून, विद्यापीठांनी उच्च शक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्या ७० टक्के युवकांच्या कौशल्य शिक्षणाचा देखील प्राधान्याने विचार केला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

    सन २०४७ पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी ऊर्जा, अन्नधान्य व पाणी या बाबतीत आत्मनिर्भर बनवावे लागेल असे सांगून विज्ञान, तंत्रज्ञान व नावीन्याच्या माध्यमातूनच भूक, आरोग्य व गरिबी यांसारख्या समस्यांवर मात करता येऊ शकेल, असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांच्या उपस्थितीत ‘सक्षम भारतीय’, ‘समृद्ध आणि शाश्वत अर्थव्यवस्था’, ‘नवसंकल्पना, विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ‘सुशासन आणि सुरक्षा’, ‘जगामधील देशात भारत’, ‘विकसित भारत निर्मितीसाठी कृषी व पशुसंवर्धनाची भूमिका’ व ‘विकसित भारत’ उद्दिष्टप्राप्तीमध्ये युवकांचा सहभाग या विषयावरील चर्चासत्रांमध्ये विविध विद्यापीठांच्या प्रमुखांनी व कुलगुरूंनी आपापले विचार मांडले. माजी मंत्री व पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील, यांसह राज्यातील ४० विद्यापीठांच्या प्रमुखांनी चर्चासत्रात भाग घेतला.

    देशाच्या राष्ट्रीय योजना, प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टांच्या निर्मितीत युवकांचा सक्रिय सहभाग असावा या दृष्टिकोनाला अनुरूप ‘विकसित भारत @2047 : युवकांचा आवाज’ हा उपक्रम हाती घेण्यात आला असून विकसित भारत @2047 साठी आपल्या कल्पना आणि सूचना मांडण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.