बंद

  11.07.2021 : डॉ हेडगेवार रुग्णालयाचे कार्य स्पृहणीय: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  प्रकाशित तारीख: July 11, 2021

  डॉ हेडगेवार रुग्णालयाचे कार्य स्पृहणीय: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  औरंगाबाद येथील डॉ हेडगेवार रुग्णालय करीत असलेले रुग्णसेवेचे सेवाभावी कार्य अत्यंत स्पृहणीय असून प्रतिष्ठानच्या रुग्णालयांनी सध्याच्या त्यांच्या एकूण ६०० बेड्स क्षमतेचा विस्तार करून ६००० बेड्स क्षमता गाठण्याचे लक्ष्य ठेवावे. रुग्णसेवेच्या माध्यमातून दीनदयाळ उपाध्याय यांना अभिप्रेत अंत्योदय साधण्यासाठी दानशूर व्यक्तींनी संस्थेला सहकार्य करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  औरंगाबाद येथील डॉ हेडगेवार रुग्णालयासह विविध वैद्यकीय संस्थांचे संचालन करीत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या २०१५-२० या कालावधीच्या पंचवार्षिक अहवालाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. ११) राजभवन येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

  कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अनिल भालेराव, महासचिव डॉ. अनंत पंढरे, उद्योजक रमेश टेनवाला, सुनील केजरीवाल, रवींद्र संघवी, राजेंद्र बारवाले, डॅा. उषा क्रिष्णा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

  आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले, सन १९२५ साली डॉ हेडगेवार यांनी राजकारणापासून अलिप्त व समाज कार्याला समर्पित अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मुहूर्तमेढ रोवली. संघाने स्वयंसेवकांना निःस्वार्थ सेवेचे संस्कार देत देशाला विश्वगुरू बनवण्याचे ध्येय ठेवले. त्यामुळेच डॉ हेडगेवार यांच्या प्रेरणेने सुरु झालेले कार्य यशस्वी होत आहे.

  रुग्णालय या शब्दामुळे एखाद्या संस्थेत केवळ रुग्णच आहेत असे नकारात्मक चित्र उभे राहते असे सांगून डॉ हेडगेवार रुग्णालयाने ‘रुग्णालय’ शब्दाऐवजी चिकित्सालय शब्द वापरावा अशी सूचना राज्यपालांनी केली.

  औरंगाबाद येथील डॉ हेडगेवार रुग्णालयात इतरांपेक्षा ४० ते ६० टक्के कमी खर्चात आधुनिक उपचार व रुग्णसेवा दिली जाते असे सांगून रुग्णालयातील शेकडा ७५ टक्के लोक कमी उत्पन्न गटातील असल्याची माहिती रुग्णालयाचे महासचिव डॉ. अनंत पंढरे यांनी यावेळी दिली. अतिशय कमी वेतन घेऊन डॉक्टर्स सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवा देत असल्यामुळे कमी दरात वैद्यकीय सेवा देणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

  राज्यपालांच्या हस्ते डॉ हेडगेवार रुग्णालय तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानच्या विविध प्रकल्पांना मदत करणाऱ्या सिद्धार्थ भीमराजका, निशीथ संघराजका, शैलाताई गोखले, सुनील केजरीवाल, राजेंद्र बारवाले, एसबीआय फाउंडेशनचे राजीव कुमार सिंघल, भावेश पटेल, एल अँड टीचे दिवंगत अधिकारी वाय एम देवस्थळी यांच्या पत्नी लीना देवस्थळी आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.