11.03.2024: ‘इंद्रधनुष्य’ची शिदोरी आयुष्यभर जपून ठेवा कुलपती मा.रमेश बैस यांचे युवा कलावंतांना आवाहन
‘इंद्रधनुष्य’ची शिदोरी आयुष्यभर जपून ठेवा कुलपती मा.रमेश बैस यांचे युवा कलावंतांना आवाहन
‘इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवाचे थाटात उद्घाटन
छत्रपती संभाजीनगर, दि.११ : युवा महोत्सवात आपण सादर केलेली कला आयुष्यभर लक्षात राहणारी गोष्ट आहे. या ठिकाणी लाभलेले रसिकांच्या टाळया व कौतुक तुम्हाला नवी ऊर्जा देईल. ’इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवाची ही शिदोरी आयुष्यभर जतन करुन ठेवा, असे आवाहन कुलपती मा.रमेश बैस यांनी युवा कलावंताना केले.
डॉ.बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठात ११ ते १५ मार्च दरम्यान १९ व्या राज्यस्तरीय ’इंद्रधनुष्य’ युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कुलपती मा.रमेश बैस यांनी महोत्सवाचे ऑनलाईन पध्दतीने सोमवारी (दि.११) सकाळी उद्घाटन केले. यावेळी पोलीस आयुक्त मनोज लोहिया व कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तर प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य काशिनाथ देवधर, डॉ.रविकिरण सावंत, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ. कैलास अंभुरे यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी कुलपती मा.रमेश बैस यांनी अभासी पध्दतीने महोत्सवाचे उद्घाटन केले. यानंतर उद्घाटनपर भाषण त्यांनी केले. ते म्हणाले, सन २००३ पासून ’राजभवन’ने सुरु केलेल्या या महोत्सवाला दोन दशके होऊन गेली आहेत. महाविद्यालयीन काळातील सर्वोत्कृष्ट महोत्सव म्हणून विद्यार्थी वर्षभर महोत्सवाची वाट पाहत असतात. अशा महोत्सवातील नाटके, गाणे, मिमिक्री, भाषण आपणास अनेक वर्षे स्तरावर राहील. महोत्सवातून मोठे कलावंत घडतील, असेही ते म्हणाले. यजमान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विजय पुâलारी यांच्या नेतृत्वाखाली महोत्सवाची उत्तम तयारी केल्याचा आवर्जून उल्लेख मा.कुलपती यांनी केला.
तिसऱ्यांदा यशस्वी आयोजन : मा.कुलगुरु
मराठवाड्याला संताचा व कलावंताचा मोठा वारसा आहे. एक प्रकारे ही समस्त कलांची भुमी आहे, असे गौरवदगार कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी काढले. मराठवाडयाला स्वातंत्र्य देखील उशिरा मिळाले. या भुमीत स्थापन झालेले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे हे श्रमिकांचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. जैन, बौध्द व शैव धर्मपरंपराही या भागाचे वैशिष्टये आहे. सन २००८, २०१६ व २०२४ असे सलग तीन वेळा इंद्रधनुष्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन विद्यापीठाने केले. मा.कुलपती रमेश बैस यांनी विद्यापीठाला यजमानपद दिल्याबद्दल त्यांचे कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी आभार मानले.
कलावंताकडून समाजाला दिशा : लोहिया
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नावलौकिक राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे, असे पोलिस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले. या विद्यापीठातून अनेक कलावंत, नेते, शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ज्ञ पुढे आले आहेत. अशा या क्रांतीकारी विचारांच्या विद्यापीठाला संघर्षाचा वारसा आहे. कलावंत हे केवळ मनोरंजन अथवा प्रबोधनाचेच कार्य करत नाहीत तर समाजाला दिशा देण्याचे कार्य करीत असतात, असेही मनोज लोहिया म्हणाले. राजभवनात प्रत्यक्ष उपस्थित राहुन डॉ.प्रवीण वक्ते यांनी मा.कुलपतींचे स्मृतिचिन्ह, शाल पुष्यगुच्छ देऊन स्वागत केले. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. डॉ.समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, डॉ.अंकुश कदम, डॉ.भगवान साखळे, डॉ.योगिता पाटील, डॉ.अपर्णा पाटील तसेच अधिष्ठाता डॉ.एम.डी.सिरसाठ, डॉ.संजय साळुंके, डॉ.वैशाली खापर्डे, डॉ.बीना हुंबे, ’राजभवन’चे निरीक्षक डॉ.प्रमोद पाब्रेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.