बंद

    11.01.2022 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा १७ वा दीक्षांत समारोहात राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न

    प्रकाशित तारीख: January 11, 2022

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा १७ वा दीक्षांत समारोहात राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न

    ‘उद्यमशील विद्यार्थी घडवून आदर्श देशात प्रस्तुत करावा व विद्यापीठाचे मानांकन उंचवावे’ : राज्यपालांचे आवाहन

    सोलापूर हे औद्योगिक शहर आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने स्थानिक उद्योगांना पूरक रोजगारक्षम अभ्यासक्रम राबवून उद्यमशील विद्यार्थी घडवावेत, तसेच स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देऊन देशातील विद्यापीठांकरिता आदर्श प्रस्तुत करावा, असे सांगताना विद्यापीठाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून आपले आंतरराष्ट्रीय मानांकन उंचवावे, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

    राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सतरावा दीक्षांत समारंभ मंगळवारी (दि. ११) ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने संपन्न झाला त्यावेळी राजभवन येथून सहभागी होताना ते बोलत होते.

    कार्यक्रमाला सोलापूर येथून विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर प्रामुख्याने उपस्थित होते.

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषा अवश्य शिकावी तसेच फ्रेंच, जर्मन आदी भाषा देखील शिकाव्या; मात्र मातृभाषा व मातृभूमीप्रती आपल्या कर्तव्याला विसरू नये असे राज्यपालांनी सांगितले.

    साक्षरतेला संस्कारांची जोड मिळाली नाही तर राक्षस प्रवृत्ती बळावून युवक चुकीच्या मार्गाला जातील असे नमूद करून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मूल्य शिक्षण व संस्कारांना महत्व दिल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    २०२२ वर्ष उजाडले तरी देखील कोविड – १९ संसर्ग कायम आहे. यानंतर करोनाला न घाबरता, करोना विषयक सुयोग्य खबरदारी घेऊन कार्य करीत राहिल्यास सर्व क्षेत्रात प्रगती कायम ठेवता येईल, असे राज्यपालांनी सांगितले. या संदर्भात विद्यार्थ्यांनी समाजात जनजागृती केल्यास समाजाला त्याचा फायदा होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

    राज्यातील इतर विद्यापीठांप्रमाणेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुवर्णपदके मिळविण्यात विद्यार्थिनी आघाडीवर असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना विद्यापीठातील मुले देखील यातून प्रेरणा घेऊन अधिक प्रयत्न करतील अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

    विद्यापीठाला शासनाकडून अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी १४ कोटी ७४ लाख रुपये मंजूर झाल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आपल्या अहवालात सांगितले. कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्रासाठी २५ लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली असून ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लाखाची निधी मिळाला असून त्यातून शंभर एकर परिसरात क्रिडांगणाची कामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    दीक्षांत समारोहात १२,२३९ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या तसेच ६२ विद्यार्थ्यांना पीएच.डी पदवी व ५५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात आठ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके तर चार विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी करुणा उकिरडे या विद्यार्थिनीचा ४ सुवर्ण पदके मिळाल्याबद्दल कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.