बंद

    10.03.2024 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते लोणावळा येथे शिक्षक संमेलनाचे उद्घाटन

    प्रकाशित तारीख: March 10, 2024

    राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते लोणावळा येथे शिक्षक संमेलनाचे उद्घाटन

    विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी सर्वांगिण प्रगतीची संधी द्या – राज्यपाल

    पुणे दि. १०: शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी शाळेतच अभ्यास करून घ्यावा आणि क्षेत्र भेट, ऐतिहासिक स्थळ, गडकिल्ले, नदी, वारसा स्थळ तसेच उद्यानांना भेटीचे उपमक्रम राबवून त्यांच्या सर्वांगिण प्रगतीस हातभार लावावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

    वेध प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटीद्वारा लोणावळा येथे अयोजित शिक्षक संमेलनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला मिशन मनरेगाचे व्यवस्थापक नंद कुमार, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, वेधचे समन्वयक निलेश घुगे आदी उपस्थित होते.

    राज्यपाल श्री. बैस म्हणाले, जगातील अनेक राष्ट्रात विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला जात नाही, आपणही हे धोरण स्विकारण्याची गरज आहे. समूहामध्ये विद्यार्थ्याच्या विचारशक्तीचा विस्तार होतो, त्यांच्यात एकत्रितपणे पुढे जाण्याची भावना निर्माण होते. खेळात सहभाग वाढल्याने विजय आणि पराभव सहजतेने पचविण्याची क्षमता निर्माण होते. मुलांना मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवण्यासाठीदेखील प्रयत्न करावे लागतील, त्यांच्यात नव्या गोष्टींविषयी उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून त्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करावे लागेल.

    देशाच्या विकासात शिक्षणाचे महत्वाचे योगदान असल्याने शिक्षकांनी आपल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. वेध परिवाराने विकसित केलेल्या प्रशिक्षण पद्धतीत शिक्षक विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी प्रोत्साहित करतात. देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी विद्यार्थी सक्षम होणे गरजेचे असून २१ व्या शतकात आवश्यक कौशल्य त्यांने संपादन करावे म्हणून वर्गाच्या आत आणि बाहेरच्या शैक्षणिक प्रक्रीयेत बदल घडवून आणावे लागतील. शिक्षणात तंत्रज्ञानाच्या समावेशाने विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करावा, असे आवाहन राज्यपाल श्री.बैस यांनी केले.

    शिक्षकांनी केवळ शासनातर्फे आयोजित प्रशिक्षणावर अवलंबून न राहता प्रोफेशनल कम्युनिटी लर्निंगद्वारे एकमेकांशी जोडले जावे. याद्वारे आपल्या अडचणी दूर करण्यासोबत शैक्षणिक प्रक्रीयेबाबत अद्ययावत रहाणे शक्य होईल, असे श्री. बैस म्हणाले.

    आर्टीफिशल इंटेलिजन्सचा उपयोग वैयक्तिक अध्ययनासाठी करता येणे शक्य आहे. एआयद्वारे विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याची त्याच्यासाठी असलेली योग्य पद्धती जाणून घेणे शक्य होते, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य आहेत याची माहिती शिक्षकांना मिळू शकते, असेही त्यांनी सांगितले.

    श्री. देओल म्हणाले, शाळेत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांची महत्वाची भूमिका असते. शिक्षकांनी विद्यार्थांना शिक्षण देण्याबरोबरच त्यांना प्रोत्साहित करावे. सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की पट संख्या कमी असलेल्या शाळेत मुले अधिक असलेल्या शाळेपेक्षा विद्यार्थ्यांची प्रगती कमी आहे. म्हणजेच मुले समूहात राहून अधिक चांगल्याप्रकारे शिकतात. विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षण घ्यावे यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.

    श्री. नंदकुमार यांनी सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी, गुणवत्ता सुधारण्यासाठी वेध परिवार करीत असलेल्या कामाची माहिती दिली.

    प्रास्ताविकात श्री. निलेश घुगे यांनी वेध परिवाराच्या कार्याची माहिती दिली.

    यावेळी श्रीमती रोहिणी पिंपळखेडकर यांच्या ‘वेध कृती संकलन’ व ‘स्पोकन इंग्लिश वेध कृती’ या पुस्तिकेचे व श्रीमती केवरा सेन यांच्या ‘बेसिक जपानी भाषा’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच व्यावसायिक शिक्षण समुदायाच्या सदस्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

    जिल्हा माहिती कार्यालय, पुणे