बंद

    09.08.2024: युवकांनी जर्मनीकडून कार्य संस्कृती अंगीकारावी: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    प्रकाशित तारीख: August 9, 2024
    Governor launches the educational initiatives of School Education Department

    जर्मनीच्या बॅडेन वर्टेम्बर्ग राज्याशी रोजगार विषयक कराराचे आदानप्रदान संपन्न

    राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते शालेय शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा शुभारंभ

    युवकांनी जर्मनीकडून कार्य संस्कृती अंगीकारावी: राज्यपाल सी पी राधाकृष्णन

    महाराष्ट्रातून जर्मनीला कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्याचा शालेय शिक्षण व कौशल्य विभागाचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या योजनेमुळे राज्यातील तरुणांसाठी नवीन मार्ग उघडतील. मात्र युवकांनी जर्मनीमध्ये जाऊन केवळ उत्तम पगारावर नोकरी मिळण्याचे ध्येय न बाळगता तेथील उत्कृष्ट कार्य संस्कृती अंगीकारावी, असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

    शालेय शिक्षण विभागांतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’, ‘महावाचन महोत्सव’ यांसह इतर शैक्षणिक उपक्रमांच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. ९) राजभवन मुंबई येथे करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्हिडीओ संदेशामार्फत उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाला शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, राज्याचे कौशल्य व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, जर्मनीचे मुंबईतील वाणिज्य दूत एकिम फेबिग, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव इदझेस कुंदन, अधिकारी तसेच प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व निमंत्रित उपस्थित होते.

    जर्मनीने तसेच जपानने दुसऱ्या महायुद्धानंतर अतिशय विपरित परिस्थितीत उत्कृष्टतेचा ध्यास, एकाग्रता, कार्य संस्कृती व कठोर परिश्रम या माध्यमातून अनेक क्षेत्रात क्रांती केली. आज जर्मनीमध्ये तयार झालेली वाहने व मशिनरी आपल्या उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध आहेत असे सांगून भारतातील युवकांनी जर्मनीकडून गुणवत्ता, शिस्त व कार्य संस्कृती भारतात आणावी असे आवाहन राज्यपालांनी केले.

    भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची असेल असे सांगून विद्यार्थ्यांनी आळस सोडावा व शालेय जीवनात जितके होईल तितके ज्ञानार्जन करावे. समाज माध्यमांवर वेळ घालविण्या ऐवजी वाचनासाठी किमान दहा मिनिटे काढावी तसेच थोरांची चरित्रे वाचावी अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    शिक्षण हे केवळ वैयक्तिक विकासाचे साधन नाही; तर ते राष्ट्र निर्माण कार्याचा मजबूत पाया आहे, असे सांगून राज्याला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या थोर नेत्यांच्या शैक्षणिक कार्याचा वारसा लाभला हे आपले भाग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

    ‘महा वाचन उत्सव’, ‘माझी शाळा सुंदर शाळा’, ‘माझी शाळा माझी परसबाग’ आणि ‘माझी शाळा स्वच्छ शाळा’ यांसारख्या प्रमुख उपक्रमांचा दुसरा टप्पा सुरू करीत असल्याबद्दल शालेय शिक्षण विभागाचे अभिनंदन करून स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत ‘विकसित भारत’ साकार करण्याच्या कार्यात महाराष्ट्र सक्रिय योगदान देईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

    मुख्यमंत्री

    जर्मनीशी झालेल्या रोजगार विषयक करारामुळे राज्यातील दहा हजार युवकांना आरोग्यसेवा, आदरातिथ्य यांसह अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या संदेशाद्वारे सांगितले. शालेय शिक्षण विभागाच्या स्पर्धात्मक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा व शाळांचा सर्वांगीण विकास होईल असे त्यांनी सांगितले.

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    शालेय शिक्षण विभागाचे अभिनव उपक्रम सुसंस्कृत महाराष्ट्राला बळ देणारे आहेत असे सांगून जर्मनीतील राज्याशी झालेल्या करारामुळे राज्यातील युवकांसाठी रोजगाराचे नवे दालन खुले झाले आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशाद्वारे सांगितले.

    जर्मनीला कुशल मनुष्यबळाची गरज आहे. तर राज्यातील युवकांना रोजगाराच्या संधी पाहिजे आहेत. त्यामुळे कौशल्य प्राप्त युवकांना गोथं इन्स्टिट्यूटच्या मदतीने जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. ‘माझी परसबाग’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना पहिलीपासून निसर्ग व कृषि विषयक शिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाने मुलांचे पुस्तकाचे ओझे साठ टक्क्यांनी कमी केले असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची समयोचित भाषणे झाली. दोन शालेय विद्यार्थिनींनी राज्याच्या शालेय उपक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शालेय शिक्षण उपक्रमांचे ब्रँड अम्बॅसेडर अमिताभ बच्चन यांनी आपल्या संदेशातून विद्यार्थ्यांना दररोज दहा मिनिटे नवे व सकारात्मक वाचन करण्याचे आवाहन केले.

    जर्मनी येथील बॅडेन – वर्टेम्बर्ग येथे राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगारासाठी पाठविण्यासाठी झालेल्या करारासंदर्भात बोधचिन्हाचे तसेच क्यूआर कोडचे यावेळी अनावरण करण्यात आले.

    कार्यक्रमाच्या वेळी शालेय शिक्षण विभाग व गोथं इन्स्टिट्यूट यांच्यात युवकांना जर्मन भाषा शिकविण्याबाबत करारांचे आदानप्रदान करण्यात आले, तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळ अमेरिकेशी तेथील मुलांना मराठी शिकविण्याबाबत झालेल्या सुधारित करारांचे हस्तांतरण करण्यात आले.

    मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा २, महावाचन महोत्सव टप्पा २, माझी शाळा माझी परसबाग टप्पा २ व जर्मनीस कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत प्रकल्प यांचा शुभारंभ करण्यात आला.