बंद

  09.05.2022 : मुंबईतील बंग मैत्री संसद संस्थेच्या अमृत महोत्सवी टपाल आवरणाचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण

  प्रकाशित तारीख: May 9, 2022

  मुंबईतील बंग मैत्री संसद संस्थेच्या अमृत महोत्सवी टपाल आवरणाचे राज्यपालांच्या हस्ते लोकार्पण

  साहित्य संस्कृती क्षेत्रात बंगालचे योगदान फार मोठे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  बंगालने देशाला राष्ट्रगीत दिले तसेच स्वातंत्र्य लढ्यात स्फुल्लिंग चेतविणारे वंदेमातरम सारखे देशभक्तीपर गीत दिले. बंकीम चंद्र यांचे ‘आनंदमठ’ तुलसीदासांच्या रामचरित मानसपेक्षा काहीच कमी नाही असे सांगताना बंगालचे देशाच्या साहित्य संस्कृती क्षेत्रात योगदान फार मोठे असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

  मुंबईतील बंगाली भाषिक लोकांच्या बंग मैत्री संसद या संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ९) राजभवन येथे एका विशेष टपाल आवरणाचे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

  रवींद्रनाथ टागोर यांच्या १६१ व्या जयंतीचे औचित्य साधून टपाल विभागातर्फे विशेष आवरणाचे प्रकाशन करण्यात आले.

  भारताच्या विविध राज्यांमध्ये लोकांच्या भाषा, लिपी व वेशभूषा वेगवेगळ्या असल्या तरीही संपूर्ण देश सांस्कृतिक दृष्टीने पूर्वापार एक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. भाषा देखील वरपांगी वेगवेगळ्या वाटत असल्या तरीही ऐकल्यानंतर त्यातील समानतेचे दुवे दिसून येतात असे राज्यपालांनी सांगितले. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी साजरा करीत असताना बंग मैत्री संसद ही संस्था देखील ७५ व्या वर्षात पदार्पण करीत असल्याबद्दल राज्यपालांनी आनंद व्यक्त केला.

  यावेळी राज्यपालांच्या हस्ते बंग मैत्री संसदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेच्या वतीने राज्यपालांना रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली ग्रंथाची प्रत देण्यात आली

  कार्यक्रमाला टपाल विभागाच्या महाराष्ट्र व गोव्याच्या प्रधान पोस्ट मास्टर जनरल वीणा श्रीनिवास, मुंबई सर्कलच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे, बंग मैत्री संसदचे अध्यक्ष देबब्रत मित्रा, महासचिव बिवास चक्रवर्ती, सहसचिव इंद्रनील मुखर्जी तसेच बंग मैत्री संसदेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.