बंद

    08.08.2024 : राज्यपालांच्या हस्ते दृष्टिहीन विद्यार्थ्यांना स्मार्ट चष्म्यांचे वाटप

    प्रकाशित तारीख: June 8, 2024
    08.06.2024 : राज्यपालांच्या हस्ते दृष्टिहीन विद्यार्थ्यांना स्मार्ट चष्म्यांचे वाटप

    राज्यपालांच्या हस्ते दृष्टिहीन विद्यार्थ्यांना स्मार्ट चष्म्यांचे वाटप

    तंत्रज्ञान क्रांतीमुळे दिव्यांगांचे जीवन सुलभ होईल : राज्यपाल रमेश बैस

    नजीकच्या भविष्यकाळात तंत्रज्ञान विकासामुळे दिव्यांगांच्या जीवनात सकारात्मक बदल संभवणार असून त्यांचे जीवन सुलभ होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता दिव्यांगांकरिता वरदान ठरेल, असे सांगताना विकलांगता ही गैरसोय राहील, परंतु प्रगतीत अडचण ठरणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

    राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. ८) मालाड मुंबई येथे १०० दृष्टिहीन विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान आधारित स्मार्ट चष्म्यांचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    अंदाजे वीस हजार रुपये किंमत असलेल्या या तंत्रज्ञान आधारित स्मार्ट चष्म्यांमुळे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अभ्यास करणे, शाळेत अथवा अन्यत्र जाणे तसेच इतर दिनचर्येत मदत होणार आहे. या चष्म्यामध्ये लेन्स, प्रोसेसर व स्पीकरचा समावेश आहे.

    जगाच्या लोकसंख्येपैकी दर आठ व्यक्तींमागे एक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे दिव्यांग असून भारताची दोन टक्के लोकसंख्या दिव्यांग आहे. देशाला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविणे गरजेचे आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

    दिव्यांगांची सेवा हीच वास्तविक नारायणाची सेवा आहे. दिव्यांग व्यक्तींमध्ये अनेक दिव्य गुण असतात. त्यांना योग्य संधी मिळाली तर ते प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकतात असे सांगून दिव्यांगांच्या सक्षमीकरणाबद्दल मानवाधिकार आयोग व हेतू चॅरिटेबल ट्रस्ट करीत असलेल्या कार्याबद्दल राज्यपालांनी उभय संस्थांचे कौतुक केले.

    स्मार्ट चष्मे खरेदीसाठी आर्थिक सहकार्य केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच इतर दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते हेतू चॅरिटेबल ट्रस्टच्या संकेतस्थळाचे देखील यावेळी उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमात ७५ दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश देखील प्रदान करण्यात आले.

    कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. संदीप मेहता, मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. शिवकुमार दिघे व न्या.अभय आहुजा, राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्या. कमल किशोर तातेड (नि.) व हेतू चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रिखबचंद जैन प्रामुख्याने उपस्थित होते.

    महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई उपनगर जिल्हा तसेच हेतू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.