बंद

    08.03.2023: देशाला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या वाटचालीत महिलांचे योगदान अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त – राज्यपाल

    प्रकाशित तारीख: March 8, 2023

    देशाला ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या वाटचालीत महिलांचे योगदान अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त – राज्यपाल रमेश बैस

    कौशल्य विकास विभागामार्फत महिला उद्योजिका, यशस्वी महिलांचा सन्मान

    मुंबई, दि. ८ : भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आपला देश आता ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महिलांचे योगदान आणि त्यांची सक्रिय भूमिका अत्यंत आवश्यक आणि उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

    राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

    राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिलांचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात स्त्रियांची गाथा नेहमीच महान राहिली आहे. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, आनंदी गोपाळ जोशी, लता मंगेशकर अशा अनेक महिलांचे कार्य फार मोठे आहे. राज्याने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील, पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन दिल्या आहेत. भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी आपले पंतप्रधान कौशल्य विकासाला राष्ट्रीय गरज मानतात. यासाठी त्यांनी केंद्र शासनामध्ये स्वतंत्र कौशल्य विकास विभाग सुरु केला, राज्यातही हा विभाग सुरु करण्यात आला. या विभागाचे काम आणि यश आता अधोरेखीत होत आहे. आज महिला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करत आहेत. परिणामी, लहान आणि मोठ्या अशा दोन्ही स्तरांवर आर्थिक सुधारणा दिसत आहेत. स्त्रिया जेव्हा आघाडीवर असतात तेव्हा नवनिर्मितीला प्रोत्साहन मिळते, उत्पादकतेला चालना मिळते, त्यामुळे अर्थव्यवस्थेतही निश्चितच वाढ होते, असे ते म्हणाले.

    महिला उद्योजकांचा सातत्याने विकास होत राहिल्यास देशात समतोल विकासाला नक्कीच चालना मिळेल. भारतातील महिलांना त्यांची पूर्ण क्षमता साध्य करता यावी यासाठी त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्यामुळे महिलांचे हक्क आणि कल्याण यावर अधिक जोर दिला जाईल, असे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.

    ग्रामीण, कृषी संबंधीत स्टार्टअप्सना चालना – मंत्री मंगलप्रभात लोढा

    कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी २०० कोटी रुपयांची बीज भांडवल योजना आज सुरु करण्यात आली असून प्राधान्याने
    ग्रामीण भागासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. ग्रामीण तसेच कृषी संबंधीत स्टार्टअप्सना यातून चालना मिळेल. राज्यात आज २८ हजारहून अधिक ग्रामपंचायती आहेत. या गावांमध्ये कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल. महिलांसाठी विविध प्रकारची कौशल्य प्रशिक्षणे, तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यावर कौशल्य विकास विभाग भर देईल, असे त्यांनी सांगितले.

    कौशल्य विकास’मार्फत महिला उद्योजकतेला चालना – प्रधान सचिव मनिषा वर्मा

    कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा म्हणाल्या की, कौशल्य विकास विभागामार्फत राज्यातील साडेपाच लाखहून अधिक युवकांना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यात येते. महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यात स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अभियांत्रिकीमध्ये मुलींच्या प्रवेशाला प्रोत्साहन देण्यासाठी स्कूल कनेक्ट कार्यक्रम राबवित आहोत. संयुक्त राष्ट्र संघटनेसमवेत फ्लाईट प्रोग्राम राबविण्यात येत आहे. अमरावती, नागपूर विभागातील दुर्गम क्षेत्रातील २१५ विद्यार्थीनींसाठी ॲडव्हान्स्ड आयटी प्रोग्रामींग डिप्लोमा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र हे नेहमीच प्रगतीशील आणि सामाजिक सुधारणांना चालना देणारे राज्य राहीले आहे. हीच परंपरा कायम ठेवत कौशल्य विकास विभाग महिला उद्योजकतेला चालना देत आहे, असे त्यांनी सांगितले.

    व्हर्च्युअल इनक्युबेशन सेंटर, बीजभांडवल योजनेचा शुभारंभ

    याप्रसंगी राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते महाराष्ट्र व्हर्च्युअल इनक्युबेशन सेंटर तसेच महाराष्ट्र इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड या योजनांचा शुभारंभ करण्यात आला. व्हर्च्युअल इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून प्राथमिक टप्प्यातील स्टार्टअप्सना विविध प्रकराचे सहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी या स्टार्टअप्सनी https://www.msins.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र व्हर्च्युअल इनक्युबेशन सेंटरसाठी नोंदणी करावयाची आहे. महाराष्ट्र इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट फंड ही योजना आयडीबीआय कॅपीटल यांच्या सहयोगाने राबविण्यात येणार असून याद्वारे २०० कोटी रुपयांचे बीजभांडवल उपलब्ध करुन देण्यात येईल. राज्यातील स्टार्टअप्समध्ये याद्वारे गुंतवणूक करुन त्यांना चालना देण्यात येईल.

    याप्रसंगी उद्योजकता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गितांजली सुर्यवंशी (जिल्हा सांगली), कल्याणी शिंदे (जिल्हा नाशिक), मंजुळा दहिभाते (जिल्हा यवतमाळ), मंजरी शर्मा (जिल्हा पुणे), नमिता शआह (जिल्हा मुंबई), पल्लवी उटगी (जिल्हा मुंबई), प्रेरणा भोपाळकर (जिल्हा रत्नागिरी), रीना गडेकर (जिल्हा वर्धा), संगिता सवालाखे (जिल्हा यवतमाळ), स्वाती धोटकर (जिल्हा चंद्रपूर), विणा मोकतळी (जिल्हा पुणे), योगिता पटले (जिल्हा रत्नागिरी) यांचा राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देउन सन्मान करण्यात आला. याबरोबरच उत्कृष्ट कामगिरी करणारे महिला बचतगट, उत्कृष्ट कार्य करणारे व्यावसायिक प्रशिक्षण भागीदार, कौशल्य स्पर्धेतील महिला विजेत्या यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

    कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आभार मानले. कौशल्य विकास विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगांबर दळवी, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र धुर्जड, कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, कौशल्य विकास विभागाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

    ००००