बंद

    07.10.2024: ग्रामसभांना मिळणारा पेसा अबंध निधी दुप्पट करणार असल्याची राज्यपालांची घोषणा

    प्रकाशित तारीख: October 8, 2024
    07.10.2024: राज्यपालांच्या उपस्थितीत जव्हार येथे पालघर व नाशिक जिल्ह्यातील १२२ पेसा ग्रामसभांचे महासंमेलन संपन्न

    ग्रामसभांना मिळणारा पेसा अबंध निधी दुप्पट करणार असल्याची राज्यपालांची घोषणा
    दि. ७ ऑक्टो, जव्हार (जि. पालघर)

    वयम् चळवळीने जव्हार येथे आयोजित केलेल्या ग्रामसभा महासंमेलनात मा. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांनी ग्रामसभा ही साधीसुधी बैठक नसून एक छोटी संसदच आहे आणि गावापासून देशापर्यंत असणाऱ्या संसदीय लोकशाहीचे एक अभिन्न अंग आहे असे उद्गार काढले. तसेच ग्रामसभांना पेसा अबंध निधी दुप्पट करावा ही वयम् चळवळीची मागणी मान्य केल्याचे घोषित केले. राजभवनात जनजाति कक्ष (ट्रायबल सेल) स्थापन करण्यात येणार असून कोणत्याही गाऱ्हाण्यासाठी आदिवासी नागरिक या कक्षाला संपर्क करू शकतील असेही राज्यपालांनी सांगितले. या प्रसंगी नाशिक व पालघर जिल्ह्यातील १२२ ग्रामसभांमधील हजारो आदिवासी नागरिक उपस्थित होते. राजपत्रात नुकत्याच घोषित झालेल्या २७ नविन पेसा ग्रामसभांना राज्यपालांच्या हस्ते घोषणापत्रेही प्रदान करण्यात आली.

    वयम् चळवळीचे अध्यक्ष विनायक थाळकर यांनी ग्रामसभांना येणाऱ्या अडचणी व पंचायतींकडून सहकार्य मिळत नसल्याच्या समस्या या वेळी राज्यपालांपुढे मांडल्या. तसेच वयम् चे विश्वस्त मिलिंद थत्ते यांनी राज्यपालांनी पाचव्या अनुसूचीतील अधिकार वापरून ग्राम पंचायत कायदा व पेसा नियमांमध्ये बदल करावेत अशी मागणी केली. सध्या गाव घोषित करण्याची किचकट प्रक्रिया सुधारुन मध्य प्रदेशच्या धर्तीवर प्रांत अधिकाऱ्यांना गाव घोषणेचे अधिकार द्यावेत. तसेच लोकशाहीतील समतोलाच्या तत्त्वानुसार सरपंच व ग्रामसभा अध्यक्ष ही पदे वेगळी ठेवावीत. ग्राम पंचायतींना ग्रामसभेस उत्तरदायी करावे. या मागण्यांबरोबरच वनहक्काच्या अपिलांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ सोडवावीत अशीही मागणी या संमेलनात करण्यात आली.

    संमेलनाचा मांडव अनेक ग्रामसभांनी मिळून उभा केला, याबद्दल राज्यपालांनी लोकांचे कौतुक केले. लोक स्वखर्चाने सार्वजनिक हितासाठी एकत्र आले, यातून लोकांची लोकशाहीवरील आस्था दिसते असेही राज्यपाल म्हणाले. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लोक या संमेलनास उपस्थित होते. २७ नविन ग्रामसभांना या वेळी विभागीय आयुक्तांनी घोषित केल्याचे पत्र मिळाले. तसेच प्रलंबित २५ पाड्यांना लवकरच ग्रामसभेचा दर्जा मिळेल असे जिल्हाधिकारी श्री गोविंद बोडके यांनी सांगितले.

    वयम् च्या संस्थापक व सीइओ दीपाली गोगटे यांनी आपल्या प्रास्ताविकात ग्रामसभांनी आतापर्यंत केलेले उत्कृष्ट काम तसेच चळवळीने यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. उपाध्यक्ष प्रकाश बरफ यांनी व चार ग्रामसभांच्या अध्यक्षांनी स्थानिक प्रथेनुसार धान्याचे तुरे व रानफुलांचा गुच्छ, तसेच कंदफळे व जंगलातला मध देऊन राज्यपालांचा सत्कार केला. वनवासीपाड्याच्या तारपा वादक चमूने नृत्य करून स्वागत केले व संबळ वाद्याच्या सुरावर पाच ग्रामसभांमधील महिलांनी राज्यपालांचे औक्षण केले.

    संमेलनास खासदार हेमंत सवरा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जि.प. मु.का.अ. भानुदास पालवे, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तसेच इतर सर्व अधिकारी उपस्थित होते.