07.10.2023: राज्यपालांच्या उपस्थितीत भारतीय वायुसेना दिन साजरा
राज्यपालांच्या उपस्थितीत भारतीय वायुसेना दिन साजरा
भविष्यातील सर्व आव्हानांना तोंड देण्यास भारतीय वायुसेना सज्ज: राज्यपाल रमेश बैस
भारतीय वायुसेना भविष्यातील सर्व आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यास सज्ज आहे. वायुसेना वर्धापन दिन देशाच्या हवाई योद्धांच्या शौर्य, समर्पण आणि बलिदानाचे स्मरण देतो. आज भारताची संरक्षण दले युद्धसामग्रीच्या निर्मितीमध्ये आत्मनिर्भर होत आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. .
दिनांक ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ९१ व्या भारतीय वायूसेवा दिनानिमित्त या दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (दि. ७) भारतीय वायुसेनेच्या सागरी हवाई ऑपरेशन्सच्या मुंबई विभागातर्फे नेव्ही नगर मुंबई येथे एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.
कार्यक्रमाला नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, सागरी हवाई ऑपरेशन्सच्या मुंबई विभागाचे कमांडिंग ऑफिसर एअर व्हाईस मार्शल रजत मोहन, वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त वायुसेना अधिकारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
देशाला सुरक्षित ठेवणारे वायुदलाचे हवाई योद्धे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बचाव कार्यात देखील आघाडीवर असतात. भारतीय हवाई दल आता अग्निवीर वायु महिला म्हणून सर्व विभागांमध्ये महिलांना सामील करत आहे, असे सांगताना देशाच्या भावी पिढ्यांनी वायुदलाकडून देशाप्रती समर्पण, परिश्रम, देशभक्ती आणि त्यागाची मूल्ये शिकावीत, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी वायुदलाच्या वर्धापन दिनानिमित्त यावेळी सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला तसेच वायुदलावरील लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. चहापानाच्या कार्यक्रमाने सोहळ्याची सांगता झाली.