बंद

    07.04.2024: माजी विद्यार्थ्यांनी छत्तीसगडच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत वसतिगृह बांधावे : राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: April 8, 2024

    माजी विद्यार्थ्यांनी छत्तीसगडच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत वसतिगृह बांधावे : राज्यपाल रमेश बैस

    रायपूर (छत्तीसगड) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (GEC – NIT) या संस्थेतील अनेक माजी विद्यार्थी मुंबईत विविध शासकीय व निमशासकीय संस्था, सरकारी उपक्रम तसेच उद्योग क्षेत्रात मोठे योगदान देत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. या माजी विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण, प्रशिक्षण अथवा नोकरीसाठी मुंबईला येणाऱ्या छत्तीसगड येथील विद्यार्थी – विद्यार्थीनींसाठी वसतिगृह बांधावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनीं आज येथे केले.

    रायपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संस्थेच्या मुंबई शाखेच्या वतीने रविवारी (दि. ७) सदस्यांचे स्नेहसंमेलन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत चेंबूर मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

    मुंबईकरांकडून कार्य संस्कृती व व्यावसायिकता शिकण्यासारखी आहे, तसेच मुंबईतील राजस्थानच्या लोकांकडून आपल्या राज्यातील लोकांच्या मुलांना मदत करण्याची प्रवृत्ती शिकण्यासारखी आहे असे राज्यपालांनी नमूद केले.

    राजस्थानच्या लोकांनी मुंबईत विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे निर्माण केली व तेथे मुलांना सीए, सीएस होण्यास मदत केली जाते. त्याचप्रमाणे छत्तीसगडच्या मुंबईतील यशस्वी लोकांनी आपल्या राज्यातील मुलामुलींसाठी वसतिगृह निर्माण करण्याबाबत विचार करावा असे राज्यपालांनी सांगितले.

    रायपूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या संस्थेचे देशभरात पन्नास हजार तर मुंबईत ६५० संस्थेचे माजी विद्यार्थी यशस्वी उद्योजक, अभियंते, वास्तुशिल्पकार, वैज्ञानिक म्हणून महत्वाचे योगदान देत आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी विद्यमान विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन करावे तसेच त्यांच्यासाठी व्यवसाय प्रशिक्षणाच्या संधी निर्माण कराव्या असे आवाहन राज्यपालांनी केले.

    हार्वर्ड विद्यापीठ तसेच आयआयटी मुंबई येथील माजी विद्यार्थी संस्थेला मोठ्या प्रमाणात देणग्या देतात तसेच आपल्या मातृसंस्थेच्या विकासात योगदान देतात. त्यांच्या प्रमाणे मुंबईतील छत्तीसगडच्या यशस्वी लोकांनी आपल्या मातृसंस्थेसाठी तसेच एकूणच समाजासाठी आठवड्यातील काही तास द्यावे अशी सूचना राज्यपालांनी केली.

    या कार्यक्रमाला रायपुर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष तसेच हिंदुस्थान कॉपरचे माजी व्यवस्थापकीय संचालक कैलास धर दिवान, मुंबई शाखेचे अध्यक्ष अनिल बंछोर तसेच माजी विद्यार्थी संस्थेचे सदस्य व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.