बंद

    06.09.2023: तांत्रिक कौशल्यांसोबत युवकांनी भाषा कौशल्ये देखील आत्मसात करावी : राज्यपाल

    प्रकाशित तारीख: September 6, 2023

    राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे उदघाटन संपन्न

    श्रमाची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्याचे आवाहन

    तांत्रिक कौशल्यांसोबत युवकांनी भाषा कौशल्ये देखील आत्मसात करावी : राज्यपाल रमेश बैस

    आपल्या समाजात कौशल्यांना ‘प्रतिष्ठित’ व ‘अप्रतिष्ठित’ असे विभाजित केले गेल्यामुळे युवक छोटे-मोठे काम करण्यास तयार होत नाहीत. अशिक्षित व्यक्ती आपली रोजी-रोटी कमावते, परंतु, स्नातक झालेले बेरोजगार युवक श्रमाधारित काम करण्यास तयार होत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी श्रमाची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

    राज्यपाल बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि. ६) महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे औपचारिक उदघाटन सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    राज्यपालांच्या हस्ते यावेळी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून अभ्यासक्रम पूर्ण करुन जर्मनी व जपान येथे दुहेरी पदवी तसेच – तांत्रिक आंतरवासितेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र देण्यात आले.

    कार्यक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, रोजगार व नाविन्यता विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन., राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

    आज कृत्रिम प्रज्ञा व मशीन लर्निंगच्या युगात अनेक कौशल्ये कालबाह्य होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी प्रत्येक युवकांनी एकापेक्षा अधिक कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले. तांत्रिक कौशल्यांसोबतच भाषा व संभाषण कौशल्यांकडे देखील युवकांनी लक्ष दिले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. पालकांनी पाल्यांना एकापेक्षा अधिक भाषा शिकण्यास प्रवृत्त केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

    जगातील सर्वाधिक युवा देश म्हणून भारताकडे पुढील काही वर्षे लोकसंख्येचा लाभांश राहणार आहे. सरासरी वयोमान वाढत असलेले जपान, जर्मनी सारख्या देशांना कुशल मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी भारताकडून मोठ्या अपेक्षा आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी युवकांचे शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण तसेच कौशल्य वर्धन करणे आवश्यक असून हे कार्य राज्यातील औद्योगिक व व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना करावे लागेल असे राज्यपालांनी सांगितले.

    महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय केंद्रासाठी जागा निर्धारित करण्यात आली असून सादर केंद्र तीन महिन्यात सुरु केले जाईल असे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले. याठिकाणी भाषेचे वर्ग देखील चालवले जातील असे त्यांनी सांगितले. विविध देशांच्या कौशल्याच्या गरजा समजून त्यानुसार कौशल्याधारित अभ्यासक्रम तयार केले जातील असे त्यांनी सांगितले.

    आंतरराष्ट्रीय केंद्रामुळे पंतप्रधानांचे कुशल भारताचे स्वप्न साकार होत आहे. बाहेर देशात लागणारी कौशल्ये वेगळी असून त्यासाठी वरळी येथे ‘सेन्टर ऑफ एक्सलन्स’ स्थापन केले जात असल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री पुढील महिन्यात जर्मनी येथे जाणार असून बेडन वुर्टेम्बर्ग राज्याशी सहकार्य करार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    यावेळी जर्मनी आणि जपान येथे दुहेरी पदवी तसेच तांत्रिक अंतर्वासितेसाठी निवड झालेल्या ६ आयटीआय प्रशिक्षित उमेदवारांना राज्यपालांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर तसेच व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी प्रास्ताविक केले तर आयुक्त डॉ रामास्वामी एन यांनी आभारप्रदर्शन केले.