बंद

  06.07.2021 : करोना काळात सेवा देणाऱ्या ऍम्ब्युलन्स चालकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

  प्रकाशित तारीख: July 6, 2021

  अधिकाधिक लोकांचे लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल: राज्यपाल
  करोना काळात सेवा देणाऱ्या ऍम्ब्युलन्स चालकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

  करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत देशातील व राज्यातील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. लाखो लोकांचे रोजगार गेले व उत्पन्न कमी झाले. हॉटेल उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचे रोजगार गेले तसेच मालकांचेही उत्पन्न घटले. या कठीण प्रसंगी देखील करोना योद्ध्यांनी जीवाची पर्वा न करता देवदुतांप्रमाणे काम केले.

  देशात करोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटत आहे. लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण झाल्यास करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  करोना उद्रेकानंतर शाळा व कंपनीच्या बसेस व वाहने गरजु रुग्णांच्या सेवेकरिता ऍम्ब्युलन्स सेवा म्हणून वापरल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील ५० ऍम्ब्युलन्स चालक, व्यवस्थापक, स्कुल बस मालक व स्कुल व कंपनी बस चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

  स्कुल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनतर्फे करोना योध्द्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग, सचिव दीपक नाईक व महासचिव रमेश मणियन प्रामुख्याने उपस्थित होते.

  वाहनचालकांचे किंवा कोणत्याही श्रमिकांचे काम गौण नसून ते महत्वाचे आहे. वाहनचालक नसेल तर राष्ट्रपती असो वा राज्यपाल, सर्वांचे व्यवहार ठप्प होतील असे सांगून राज्यपालांनी वाहनचालकांना कौतुकाची थाप दिली.

  ****