बंद

    06.04.2021 : राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारोह संपन्न

    प्रकाशित तारीख: April 6, 2021

    राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारोह संपन्न

    ‘स्नातकांनी आत्मनिर्भर होऊन श्रेष्ठ भारत निर्मितीसाठी योगदान द्यावे’ : राज्यपाल

    ‘विद्यापीठांनी समाजासाठी अधिक योगदान द्यावे’

    ‘शिक्षणाच्या माध्यमातून जातीवाद नष्ट व्हावा’

    दीक्षांत समारोहात ७७५४२ स्नातकांना पदव्या प्रदान

    युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजक व्हावे तसेच स्टँड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, मुद्रा आदी योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊन स्वतः आत्मनिर्भर व्हावे व श्रेष्ठ भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज केले.

    विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्य प्रदान करीत असतानाच विद्यापीठे समाजासाठी व परिसरासाठी मोठे योगदान देऊ शकतात असे सांगून राज्यातील सर्व विद्यापीठांनी समाजासाठी अधिक योगदान द्यावे, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.

    कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या ५७ व्या वार्षिक दीक्षांत समारोहाला राजभवन मुंबई येथून दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.

    कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू प्रमोद पाटील, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

    दीक्षांत समारोहात ७७५४२ स्नातकांना पदव्या, पदव्युत्तर पदव्या, प्रमाणपत्रे तसेच पीएच.डी. प्रदान करण्यात आल्या.

    देशात जातीवाद, प्रांतवाद अजुनही कायम असल्याबद्दल खंत व्यक्त करताना शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील जातीवाद नष्ट होऊन समानता यावी अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

    स्नातकांनी पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे न मानता पदवी ही आयुष्यभर शिकण्याच्या प्रक्रियेचा आरंभ मानावी असे सांगून विद्या अमरत्व प्रदान करते असे राज्यपालांनी सांगितले.

    शिवाजी विद्यापीठाला नॅक कडून ए ++ मानांकन प्राप्त झाल्याबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करताना करोना काळात विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून समाजासाठी उत्तम कार्य केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाला कौतुकाची थाप दिली. करोनाची दुसरी लाट आली असल्याचे स्मरण देताना विद्यापीठाने गेल्यावर्षी पेक्षा अधिक काम करावे अशी त्यांनी सूचना केली.

    विद्येमुळे विनय प्राप्त होतो व मनुष्याला आपल्या समाजाप्रती कर्तव्याची जाणीव होते असे सांगून स्नातकांनी जीवनात सकल मानवजात, प्राणीमात्र, वृक्षवल्ली, पर्यावरण व नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनासाठी योगदान दिले पाहिजे असे राज्यपाल म्हणाले.

    राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आंतर शाखीय अध्ययनाला महत्व देण्यात आले असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी आपले आवडते विषय शिकल्यास शिक्षणात अधिक आनंद घेता येईल व विद्यार्थ्यांना अधिक प्रगती करता येईल असे त्यांनी सांगितले.

    उदय सामंत

    आपण काही काळ शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी होतो असे सांगून विद्यापीठाने सीमाभागातील मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम सुरु केल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले. शासनाच्या वतीने विद्यापीठाला सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

    अनिल सहस्रबुद्धे

    शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून विद्यार्थ्यांनी आयुष्यभर विद्यार्थी राहून आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील समस्या सोडविण्यासाठी केला पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ अनिल सहस्रबुद्धे यांनी आपल्या दीक्षांत भाषणात केले.

    नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रित असून शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागतिक नागरिक बनवणे हे धोरणाचे उद्दिष्ट असल्याचे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

    कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के

    कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. जलयुक्त विद्यापीठ योजनेतून शिवाजी विद्यापीठ पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

    राष्ट्रपती व कुलपती सुवर्ण पदके प्रदान

    दीक्षांत समारोहात सौरभ संजय पाटील या विद्यार्थ्याला राष्ट्रपती सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले तर महेश्वरी धनंजय गोळे या विद्यार्थिनीला संस्कृत विषयात प्राविण्य मिळाल्याबद्दल कुलपती सुवर्ण पदक देण्यात आले. विविध विद्याशाखांमधील स्नातकांना यावेळी पीएच. डी प्रदान करण्यात आल्या.