बंद

    06.01.2024 : शाश्वत बांबू विकासातून महाराष्ट्राला जागतिक मान्यता मिळेल – राज्यपाल रमेश बैस

    प्रकाशित तारीख: January 6, 2024

    शाश्वत बांबू विकासातून महाराष्ट्राला जागतिक मान्यता मिळेल – राज्यपाल रमेश बैस

    मुंबई,दि.6 : राज्यातील पर्यावरण शेतीमध्ये बांबूचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ‘शाश्वत पर्यावरण विकास परिषदे’ च्या माध्यमातून निश्चितपणे महाराष्ट्रातील बांबूला जागतिक पातळीवर स्थान मिळेल असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला. राज भवन येथे आज दि. ६ रोजी बांबू संवर्धन संदर्भात झालेल्या बैठकीचे वेळी ते बोलत होते.

    पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि लातूर जिल्ह्यातील फिनिक्स फाऊंडेशन संस्थेच्या सहकार्याने मुंबईत दि. 9 जानेवारी, 2024 रोजी “शाश्वत पर्यावरण विकास” परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत जगभरातील तज्ञ यात सहभागी होणार आहेत.

    राजभवन येथे परिषदेच्या आयोजकांकडून राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली सादरीकरण करण्यात आले. यावेळी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार, मनरेगा चे क्यूसीओ कम एसई राजेंद्र शहाडे, परिषदेचे आयोजक सचिव आणि एमडी जंसबांबूचे कृणाल गांधी, कॉन्बॅकचे संचालक संजीव करपे,मुथा इंडस्ट्रीजचे अनिल मुथा, सनविन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बाजोरिया हे उपस्थित होते.

    “शाश्वत पर्यावरण विकास” परिषदेच्या माध्यमातून शाश्वत विकासाला दिशा आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल असा विश्वास राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केला.

    कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी “शाश्वत पर्यावरण विकास परिषद” आयोजित करण्यामागे असलेली भूमिका स्पष्ट करत राज्यपालांना या परिषदेमध्ये सहभागी होण्याबाबत विनंती केली. राज्यपाल रमेश बैस यांनी सहमती दर्शवत परिषदेला शुभेच्छा दिल्या.

    महाराष्ट्राने बांबू शाश्वत विकास वृद्धिंगत होण्यासाठी नुकतीच राज्य पातळीवर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत केला आहे. राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत बांबू लागवडीसाठी 4 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आल्याचे सांगितले. सातारा, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर, जालना जिह्यातील शेतकऱ्यांना बांबू शेतीसाठी हेक्टरी 7 लाख रुपयांचं अनुदान देण्यात येत आहे. तसेच राज्य शासनाकडून बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी तीन योजना जाहिर केल्या आहेत. यात शेतकऱ्यांनी ३५ रूपयांचे बांबूचे झाड लावल्यावर ५८० रुपये मिळतात. यासह राष्ट्रीय योजनेत बांबू लागवडसाठी १२० रुपये आणि अटल बांबू मिशन मध्ये २७ रुपये सबसीडी मिळते.यासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त आणि रोजगार निर्मिती यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे या सादरीकरणाच्या माध्यमातून सांगण्यात आले.