बंद

    06.01.2024 : राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार प्रदान

    प्रकाशित तारीख: January 6, 2024

    राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र जन गौरव पुरस्कार प्रदान

    पुरस्काराने सामाजिक उद्यमशीलतेला प्रोत्साहन – राज्यापाल रमेश बैस

    मुंबई, दि. ६ सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक उद्यमशीलता अत्यंत महत्वाची आहे. समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होतो. पुरस्कारामुळे सामाजिक उद्यमशीलतेला प्रोत्साहन मिळते, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले.

    राजभवन येथे सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ‘महाराष्ट्र जन गौरव’ पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री सुबोध भाऊ सावजी, सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राहुल सुबोध सावजी व्यासपीठावर उपस्थित होते.

    राज्यापाल श्री. बैस म्हणाले, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राहुल सावजी रेडिओलॉजिस्ट असून स्वत: पुरतं मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेतल आहे.

    वडिलांकडून घेतलेला सामजिक वारसा जपत ट्रस्टच्या माध्यमातून राज्यातील गोरगरीब व गरजू व्यक्तींना मदतीचा हात देत निःस्वार्थ भावनेने कार्य करत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. असे सांगून राज्यपाल श्री. बैस यांनी सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्ट आणि पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सर्वांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

    ट्रस्टच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील किडनीग्रस्त रुग्णांना मोफत औषध वाटप, सामूहिक विवाह सोहळा, विदर्भातील आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना मदत, कोविड काळात हेल्प डेस्कची स्थापना,आरोग्य शिबिरांचे आयोजन, दिव्यांगसाठी मदत,गरजू शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप असे अनेक समाज उपयोगी कार्य करत आहेत. एवढेच नाही तर शिर्डी येथे कॅन्सर रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचे समजले असे सांगून राज्यपाल यांनी ट्रस्टचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

    यावेळी साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक क्षेत्र, लोकसेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध क्षेत्रातील ३५ पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

    या कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉ.राहुल सुबोध सावजी यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेशभाऊ सावजी यांनी मानले.