बंद

    06.01.2021 : पत्रकारांनी महाराष्ट्र जागृतीचे कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    प्रकाशित तारीख: January 6, 2021

    पत्रकारांनी महाराष्ट्र जागृतीचे कार्य करावे
    – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    पत्रकार दिनानिमित्त संपादक, पत्रकारांचा राजभवन येथे सत्कार

    मुंबई, दि. 6 : कोरोना महामारीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करीत समाज जनजागृतीचे कार्य पत्रकारांनी केले ही कौतुकास्पद बाब आहे. यापुढेही पत्रकारांनी महाराष्ट्र जागृतीचे कार्य सातत्याने करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

    दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिन सोहळ्यामध्ये आज राजभवन येथे राज्यपाल यांच्या हस्ते उल्लेखनिय कार्य करणाऱ्या संपादक, पत्रकार तसेच समाजसेवाकांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

    राज्यपाल म्हणाले, देशभरात पत्रकारांचे एक वेगळे स्थान आहे. जहा न पहुंचे सरकार, वहा पहुंचे पत्रकार असे पत्रकारांबद्दल सांगतात. डॉक्टर्स, पोलीस, यांप्रमाणेच कोरोना काळात पत्रकारांनी जनजागृतीचे काम मनोभावाने करुन मोलाचे योगदान दिले. देशावर कोणतेही संकट आले तर एकमेकांचे मतभेद दूर सारून एकजुटीने काम करण्याची देशाची संस्कृती आहे. त्याप्रमाणेच पत्रकारांकडून आपले कर्तव्य चांगल्यारितीने नेहमीच जपले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीनिमित्त पत्रकार दिवस साजरा केला जातो, हीच त्यांना खरीखुरी श्रद्धांजली आहे. महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्र वाचत असतांना वृत्तपत्रात महिला पत्रकारांचेही विविध विषयांवर लेख वाचायला मिळतात. यावरुन वृत्तपत्र क्षेत्रात महिला पत्रकारांचेही मोलाचे योगदान ठरत असल्याची भावना राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

    करोना काळात निधन झालेल्या पत्रकारांच्या पाल्यांचे शैक्षणिक पालकत्व महाएनजीओ फेडरेशन या संस्थेने स्वीकारल्याचे जाहीर केले. राज्यपालांच्या हस्ते दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना शैक्षणिक मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे धनादेश सुपुर्द करण्यात आले.

    पत्रकार दिन सोहळ्यात पुढारीचे अध्यक्ष डॉ.योगेश जाधव, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष सौरभ गाडगीळ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्यसंघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष किरण जोशी, अभिनेते स्वप्निल जोशी, राज्यातील विविध दैनिकांचे आणि वृत्तवाहिन्यांचे जेष्ट संपादक, प्रतिनिधी उपस्थित होते.

    सत्कारमुर्तीमध्ये न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील, झी 24 तासचे संपादक दीपक भातुसे, लोकमत नागपूरचे संपादक श्रीमंत माने, लोकसत्ताचे सह्योगी संपादक संदीप आचार्य, सिंधुदुर्ग तरुण भारत आवृतीचे प्रमुख शेखर सामंत, लोकमतचे सहायक संपादक पवन देशपांडे, बेळगाव दै.पुढारीचे वृत्त संपादक संजय सुर्यवंशी, एबीपी माझा मुख्य वृत्तनिवेदिका ज्ञानदा कदम, टीव्ही 9 मराठीच्या मुख्य वृत्तनिवेदिका निखिला म्हात्रे आदी सत्कारमूर्तींचा राज्यपालांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला.