बंद

    05.12.2024:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदान येथे भव्य शपथविधी सोहळा संपन्न

    प्रकाशित तारीख: December 5, 2024
    Swearing in Ceremony of CM, DyCMs

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आझाद मैदान येथे भव्य शपथविधी सोहळा संपन्न

    देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

    एकनाथ शिंदे, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ

    राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

    आझाद मैदान मुंबई येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे व अजित आशाताई अनंतराव पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

    राष्ट्रगीताने तसेच राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी नामनिर्देशित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच नामनिर्देशित उपमुख्यमंत्र्यांना राज्यपालांच्या अनुमतीने शपथ घेण्यास पाचारण केले.

    राज्यपालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुष्पगुच्छ दिल्यानंतर पंतप्रधानांनी तिघांचेही अभिनंदन केले. राष्ट्रगीताने शपथविधी सोहळ्याची सांगता झाली.

    कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, विविध क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.