बंद

    05.03.2022: कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उमविच्या कुलगुरूपदी डॉ विजय माहेश्वरी

    प्रकाशित तारीख: March 5, 2022

    कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उमविच्या कुलगुरूपदी डॉ विजय माहेश्वरी

    जळगाव येथील कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री) विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तसेच विभाग प्रमुख डॉ विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी यांची कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (दि. ५) डॉ माहेश्वरी यांची नियुक्ती जाहीर केली.

    विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. प्रदीप पाटील यांनी दिनांक ७ मार्च २०२१ रोजी राजीनामा दिल्यामुळे कुलगुरुपद रिक्त झाले होते.

    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. ई. वायुनंदन यांचेकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.

    डॉ माहेश्वरी (जन्म ३ जुलै १९६४) यांनी इंदोर येथील देवी अहिल्या विश्वविद्यालय येथून जैवरसायनशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासकीय कार्याचा व्यापक अनुभव आहे.

    कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी जम्मु काश्मीरचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती महेश मित्तल कुमार यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. खडकपूर येथील भारतीय प्रौदयोगिकी संस्थेचे संचालक प्रो. विरेंन्द्र कुमार तिवारी व राज्याचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता हे समितीचे सदस्य होते.

    समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ माहेश्वरी यांच्या निवडीची घोषणा केली.