04.09.2023 : विकसित भारतासाठी विद्यापीठांना जागतिक दर्जाची ज्ञानकेंद्रे बनवूया – राज्यपाल
विकसित भारतासाठी विद्यापीठांना जागतिक दर्जाची ज्ञानकेंद्रे बनवूया
-माननीय राज्यपाल श्री रमेश बैस यांचे प्रतिपादन
-आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शिक्षक दिनानिमित्त शताब्दी महोत्सव पुरस्कारांचे वितरण
नागपूर :(४-९-२०२३)
देशातील युवा पिढीला २१ व्या शतकातील जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्याची गरज आहे. यासोबतच सर्वच क्षेत्रात अग्रेसर होत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून जगापुढे उभे राहायचे आहे. त्यासाठी विद्यापीठांमधून जागतिक दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत भारताला वैश्विक ज्ञान केंद्र बनविण्याचे आवाहन माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी सोमवार, दिनांक ४ सप्टेंबर २०२३ रोजी केले. सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात आयोजित समारंभात राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांच्या हस्ते शिक्षक दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॅा. राजू हिवसे यांच्यासह विविध विभागांचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पुरस्कारार्थींचे कुटुंबीय उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार, आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार, डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्णपदक, प्राचार्य श्री. बलराज अहेर स्मृती सुवर्णपदक, शताब्दी महोत्सव सुवर्णपदक आदी विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. विद्यापीठाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास मदत केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला तसेच विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धेचे पुरस्कार वितरित करण्यात आले.
भारताच्या गतकाळातील वैभवाचा संदर्भ देत राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, एकेकाळी भारत हा जगातील सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेला देश होता. जगभरातील लेखक आणि इतिहासकारांनी देशाच्या प्रगतीचा गुणगौरव आपल्या ग्रंथांमध्ये केल्याचे वाचावयास मिळते. सूती कापड, रेशीम, लिलन, वास्तूकला अशा विविधांगी क्षेत्रात आपल्या देश आघाडीवर होता. युरोप किंवा आशिया खंडातील अन्य राष्ट्रांच्या तुलनेत भारत हा उद्योग आणि निर्मिती क्षेत्रात आघाडीवर असल्याचे पहायला मिळाले आहे. गतकाळातील हे वैभव पुन्हा प्राप्त करायचे झाल्यास दर्जेदार शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. यासाठी शैक्षणिक गुणवत्ता ही जागतिक दर्जाची राखण्याची गरज असल्याचे सांगत राज्यपालांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिक्षणाचे महत्व यावेळी अधोरेखित केले. जगभरातील विविध विद्यापीठांमध्ये गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम आणि विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. जगभरातील विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याकरिता विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांनी ही विद्यार्थी केंद्रीत धोरण आखण्याची गरज असल्याचे राज्यपाल श्री. बैस पुढे म्हणाले.
‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ या तंत्रज्ञानाविषयी बोलताना राज्यपाल म्हणाले की, राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये एआय तंत्रज्ञानाची माहिती तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येण्याची गरज आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी सदुपयोग करणे तसेच विद्यापीठ प्रशासनाने प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॅा. सुभाष चौधरी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी विद्यापीठाची गेल्या शंभर वर्षातील वाटचाल आणि शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठाकडून राबविल्या जात असलेल्या ‘रीच टू अनरीच्ड’ अभियानाबाबत त्यांनी माहिती दिली. विद्यापीठाला ५० वर्षे पूर्ण झाले तेव्हा इंडियन सायन्स काँग्रेस तसेच शंभरव्या वर्षात देखील इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन विद्यापीठाने केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाला नॅकचा अ प्लस दर्जा, एलआयटीला प्रथमच नॅक, एनबीए दर्जा मिळवून दिला. विद्यापीठ अनुदान आयोगाने एलआयटीला स्वायत्तता प्रदान केली आहे. एलआयटी आता स्वतंत्र विद्यापीठ झाल्याचे त्यांनी सांगितले. सागर, जबलपूर, अमरावती, गोंडवाना आणि आता एलआयटी असे ५ स्वतंत्र विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून तयार झाले आहे. विद्यापीठाने क्रीडा क्षेत्रात देखील भरीव कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक ट्रॅक तयार असून भविष्यात मल्टी लेवल मल्टी स्पोर्ट कॉम्प्लेक्स तयार होत असल्याचे कुलगुरू म्हणाले.
माजी न्या. विकास सिरपूरकर यांनीही यावेळी आपले विचार केले. जीवन साधना पुरस्कार देत गुणांची जाण असल्याचे हे पुरस्कार देत विद्यापीठाने दाखवून दिले आहे. पुरस्कारार्थींचे अभिनंदन करीत भविष्यात अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॅा. अमृता इंदूरकर आणि डॅा. वर्षा देशपांडे यांनी केले तर आभार प्र-कुलगुरू डॅा. संजय दुधे यांनी मानले.
*पुरस्कारार्थींची यादी*
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवन साधना पुरस्कार*
१) डॉ. एच.एफ. दागीनावाला, नागपूर,
२) श्री. हरिश्चंद्र बोरकर, भंडारा
३) प्रा. श्री. सुरेश देशमुख, वर्धा,
४) श्री. शिवकिसन अग्रवाल, नागपूर,
५) डॉ. निरूपमा देशपांडे, अमरावती
*शिक्षण संस्था पुरस्कार*
– श्री. नागपूर गुजराती मंडळ, नागपूर.
*डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्णपदक*
– डॉ. महेंद्र ढोरे, प्राचार्य, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, नागपूर
*प्राचार्य श्री बलराज अहेर स्मृती सुवर्ण पदक*
– श्री. प्रदीप बिनीवाले (वर्ग १)
*शताब्दी महोत्सव सुवर्ण पदक*
१) डॉ. नितीन डोंगरवार, विभाग प्रमुख,
२)श्री. वसीम अहमद (वर्ग १ )
३) श्री. प्रवीण गोतमारे (वर्ग २),
४) श्री. राजेन्द्र बालपांडे (वर्ग ३),
५) श्री. दर्पण गजभिये (वर्ग ४)
*आदर्श अधिकारी पुरस्कार*
१) डॉ. रमण मदने (वर्ग १),
२) श्री. गणेश कुमकुमवार (वर्ग २)
*आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार*
१) श्री. प्रदीप घ्यार,
२) श्री. अरूण हट्टेवार
३) श्री. विलास घोडे,
४) श्री. भास्कर शेंडे
*उत्कृष्ट प्राचार्य* –
डॉ. देवेंद्र एस. भोंगाडे, जीवन विकास महाविद्यालय, देवग्राम, ता. नरखेड जि. नागपूर
*उत्कृष्ट शिक्षक*
१) डॉ. प्रमोद खेडेकर, औषधी निर्माण शास्त्र विभाग.
२) डॉ. ईश्वर के. सोमनाथे, विद्या विकास कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समुद्रपूर वर्धा.
*उत्कृष्ट संशोधक*
१) डॉ. रविन एन. जुगादे, रसायनशास्त्र विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शैक्षणिक विभाग
२) डॉ. रतिराम गो. चौधरी, सेठ केसरीमल पोरवाल कॉलेज, कामठी जि. नागपूर संलग्नित महाविद्यालयातून
*उत्कृष्ट लेखक*
डॉ. सत्यप्रकाश एम. निकोसे, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ
उत्कृष्ट राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट पुरस्कार
१) श्री. साहिल भिमराव खेलकर, जी. एस. कॉमर्स कॉलेज, वर्धा.
२) कु. आरजु समिर खान पठान, जी. एस. कॉमर्स कॉलेज, वर्धा.
*उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार*
१) श्री. विशाल राजकुमार खर्चवाल, शिवाजी सायन्स कॉलेज, नागपूर.
२) कु. अनुश्का नाग (महिला प्रवर्ग), हिस्लॉप कॉलेज, नागपूर.
*उत्कृष्ट सांस्कृतिक उपक्रमपटू पुरस्कार*
१) श्री. आशुतोष अजय तिवारी, आर. एस. मुंडले धरमपेठ आर्टस ॲन्ड कामर्स कॉलेज, नागपूर,
२) कु. अश्लेषा राजेश खंते (महिला प्रवर्ग), नबिरा महाविद्यालय, काटोल.
*उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमपटू पुरस्कार*
१) श्री. मनिष प्रमेलाल कडुकर, (पुरुष प्रवर्ग), विज्ञान संस्था, नागपूर,
२) कु. पृथ्वी अनिल राउत, (महिला प्रवर्ग), विज्ञान संस्था नागपूर.
*शासकीय अधिकारी*
१) श्रीमती प्रियदर्शनी बोरकर, तत्कालीन तहसीलदार, नागपूर (शहर) व वर्तमान तहसीलदार हिंगणा नागपूर (शहर),
२) श्री. राजेश आनंदराव देठे, मंडळ अधिकारी, तहसीलदार नागपूर (शहर) कार्यालय,
३) ॲड. प्रमोद उपाध्याय, विद्यापीठ अधिवक्ता
*विद्यापीठ आंतर -महाविद्यालयीन वार्षिकांक स्पर्धा* – १) लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ – दि क्लॉक टॉक्स, २) हिस्लॉप कॉलेज, टेम्पल रोड, सिव्हिल लाईन नागपूर – दी हिस्लोपीएन,
३) कमला नेहरू महाविद्यालय, सक्करदरा, नागपूर – कमलगंधा,
४) बॅरी. शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा जि. नागपूर –कुसुमगंध,
५) यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लाखांदूर जी. भंडारा – यशवंत,
६) गोविंदराम सेकसरिया वाणिज्य महाविद्यालय, वर्धा – अर्थसंदेश,
७) श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय भुसावळ जी. जळगाव – मानस