बंद

    04.06.2022: माहितीपट, ऍनिमेशन व लघुपटांनी करमणुकीसोबत प्रेरणा व प्रबोधनाला महत्व द्यावे: राज्यपाल

    प्रकाशित तारीख: June 4, 2022

    माहितीपट, ऍनिमेशन व लघुपटांनी करमणुकीसोबत प्रेरणा व प्रबोधनाला महत्व द्यावे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

    माहितीपट, लघुपट व ऍनिमेशन चित्रपट समाजाचेच प्रतिबिंब दाखवीत असतात. हे चित्रपट बनविताना डोळ्यासमोर निश्चित असे ध्येय व मिशन असले पाहिजे. हे चित्रपट समाजाच्या भल्यासाठी असावे या दृष्टीने लघुपटांनी व माहितीपटांनी करमणुकीसोबतच प्रेरणा व प्रबोधनाला देखील महत्व दिले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.

    राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत माहितीपट, लघुपट व ऍनिमेशन चित्रपटांच्या १७ व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (मिफ्फ २०२२) सांगता समारोह तसेच पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि. ४) नेहरू केंद्र मुंबई येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन, ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल, पीआयबीचे महानिदेशक मनीष देसाई व मिफ्फचे संचालक रविंदर भाकर प्रामुख्याने उपस्थित होते.

    लघुपट, माहितीपट व ऍनिमेशन चित्रपट समाजाला गहन संदेश देत असतात. हे चित्रपट रंजक असतात तसेच अंतर्मुख करणारे देखील असतात, त्यामुळे ते लोकांना विशेष भावतात असे राज्यपालांनी सांगितले.

    यावेळी राज्यपालांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विभागातील सर्वोत्कृष्ट ऍनिमेशन फिल्म, सर्वोत्कृष्ट लघुपट व सर्वोत्कृष्ट माहितीपट हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

    डच माहितीपट ‘टर्न युअर बॉडी टू द सन’ ला गोल्डन कोंच पुरस्कार देण्यात आला तर साक्षात्कारम (मल्याळम) व ‘ब्रदर टोल’ या लघुपटांना सिल्व्हर कोंच पुरस्कार विभागून देण्यात आला. ‘प्रिन्स इन अ पेस्ट्री शॉप’ या पोलिश ऍनिमेशन चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अनिमेशन फिल्म पुरस्कार देण्यात आला. पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन इरझिक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी राष्ट्रीय प्रवर्गातील पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

    आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागाच्या निवड समितीच्या अध्यक्षा मीना रॅड व राष्ट्रीय स्पर्धेचे अध्यक्ष संजीत नार्वेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मिफ्फचे संचालक रविंदर भाकर यांनी आभारप्रदर्शन केले.