बंद

    04.03.2024: राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजेमेंटचा दीक्षांत समारंभ संपन्न

    प्रकाशित तारीख: March 4, 2024

    राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजेमेंटचा दीक्षांत समारंभ संपन्न

    शिक्षणाच्या माध्यमातून नवकल्पनांना चालना देणारे उद्योजक घडावेत-राज्यपाल

    पुणे दि.४- जगातील यशस्वी सेवा उद्योग सुरूवातीस एक नवकल्पना होते, प्रयत्न आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी पुढे यश मिळविले. आज देशात अशा नवकल्पनांची निर्मिती करणारे, त्यांना चालना देणारे यशस्वी तरुण उद्योजक घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

    पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजेमेंटच्या १४ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला वीकफील्ड कंपनीचे कार्यकारी संचालक डी. एस. सचदेवा, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री, पीआयबीएम गुपचे अध्यक्ष रमण प्रीत आदी उपस्थित होते.

    राज्यपाल श्री.बैस म्हणाले, नव्या पिढीने नवोन्मेषक, उद्योजक, नवप्रवर्तक आणि आव्हाने स्विकारणारे व्यावसायिक व्हावे. त्यांच्यामध्येही एखादा मार्क झुकरबर्ग दडलेला असेल. आज कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. जगातले अनेक देश व्यापारासाठी चीनला पर्याय शोधत आहेत. युवकांना कौशल्याचे आणि नवनिर्मितीचे प्रशिक्षण देवूनच देशाला या संधीचा लाभ घेता येईल.

    देशाला विकसित राष्ट्र करण्याच्या या परिवर्तनकारी यात्रेत प्रत्येक स्नातकांने आपली भूमिका निभावण्याची गरज आहे. व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी आणि उद्योजकांनी जागतिक स्तराच्या लेखा परिक्षण आणि व्यवस्थापन संस्था तसेच सल्लागार संस्था उभाराव्यात. जागतिक दर्जाच्या कायदे विषयक सल्ला देणाऱ्या संस्था आपल्या देशात तयार व्हाव्यात. संपत्ती निर्माण करणारे आणि स्टार्ट अप्सचे प्रवर्तक स्नातक भारतीय विद्यापीठांमधून घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    देशातील ५० टक्क्यापेक्षा अधिक रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, फलोत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता शिक्षण, आरोग्य आणि इतर सेवा क्षेत्रांना प्रभावित करणार आहे. व्यवस्थापन स्नातक आणि व्यवसाय व्यवस्थापकांनी देशाच्या विकासासाठी एआय शक्तीचा उपयोग करण्यात भारताला अग्रेसर ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    पदवीदान समारंभात एमबीएच्या ३२३ व पीजीडीएमच्या ३५९ अशा एकूण ६८२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात सुवर्णपदक आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

    प्रारंभी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रमन प्रीत यांनी प्रास्ताविकात संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेतील प्राध्यापक, पालक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.