बंद

  03.12.2021: जनता जनार्दनाची सेवा करणे हेच लोकशाहीचे मुलभूत सूत्र : राज्यपाल

  प्रकाशित तारीख: December 3, 2021

  जनता जनार्दनाची सेवा करणे हेच लोकशाहीचे मुलभूत सूत्र : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  ‘द डेमॉक्रसी’ पोर्टलचे बोधचिन्ह, संकेतस्थळाचे अनावरण

  आपल्या देशात जनतेलाच जनार्दन मानले आहे. प्रजा कुणाच्या अधिपत्याखाली नसते. जनता जनार्दनाची सेवा करणे हेच लोकशाहीचे मुलभूत सूत्र असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ३) राजभवन येथे ‘द डेमॉक्रसी’ या दैनंदिन घडामोडी व बातम्या देणाऱ्या व्हिडीओ पोर्टलच्या बोधचिन्हाचे तसेच संकेतस्थळाचे अनावरण झाले, त्यावेळी ते बोलत होते.

  ‘आफ्टरनून व्हॉइस व द डेमॉक्रसी’ माध्यम समूहाच्या मुख्य संपादिका डॉ वैदेही तमन यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

  भारतात मुघल, पोर्चुगीझ, फ्रेंच व इंग्लिश शासक आले आणि गेले. परंतु देशाचा स्थायी भाव ते मिटवू शकले नाही. जातिभेद ही कुप्रथा असून प्रत्येकात ईशत्व पाहणे हीच भारताची स्थायी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

  यावेळी राज्यपालांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘लोकशाहीचे स्तंभ’ पुरस्कार देण्यात आले.

  मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु व माजी राज्यसभा सदस्य डॉ भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री डॉ दीपक सावंत, जाहिरात व नाट्यकर्मी भरत दाभोळकर व मकरंद देशपांडे, नृत्य दिग्दर्शक संदीप सोपारकर, बत्रा क्लिनिकचे डॉ मुकेश बत्रा, ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या लक्ष्मी त्रिपाठी, माहिती हक्क कार्यकर्ते विवेक वेलणकर, निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे, सामाजिक कार्यकर्त्या चित्रा वाघ, पक्षीप्रेमी सुनीश कुंजू, आदींना यावेळी ‘लोकशाहीचे स्तंभ’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.