03.11.2020 : राज्यपालांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सौर उर्जा रुफ टॉप प्रकल्पाचे उद्घाटन
कोरोना काळात वैद्यकीय शिक्षणाचे महत्व अधोरेखित झालेय;
आंतरिक उर्जा असेल तर सर्वच उर्जा आपोआप संचारतात
राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी
नाशिक: दि. 3 नोव्हेंबर 2020 ( जिमाका वृत्तसेवा ) :
कोरोना संकटाच्या या काळात संपूर्ण जगात वैद्यकीय शिक्षणाचे महत्व प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सद्यस्थितीत डॉक्टरांचे काम सर्वात कठीण तर आहेच त्याचबरोबर चांगले डॉक्टर निर्माण करणे त्याहूनही कठीण असे आहे. परंतु आंतरिक उर्जा असेल तर सर्वच प्रकारच्या उर्जा कशा आपोआप संचारतात याचा अनुभव आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रूपाने संपूर्ण देशाने घेतला असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.
नाशिक येथे आज आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे नुतनीकरण व सौर उर्जा रुफ टॉप प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते, विद्यापीठाच्या ऑडिटोरीयम मध्ये झालेल्या या कार्यक्रमास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालक मंत्री छगन भुजबळ, वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री तथा प्रति कुलपती अमित देशमुख, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलगुरू प्रा.डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति कुलगुरू प्रा. डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण तसेच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, नेतृत्वाशिवाय फॉलोअर्स काहीच करू शकत नाही. खऱ्या नेत्याची ओळख कठीण प्रसंगी, युद्ध प्रसंगी होते. करोना काळात सर्वत्र परीक्षा नको असा सूर असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी धैर्य दाखवीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला तसेच सर्व परीक्षा यशस्वी रित्या घेऊन दाखविल्या या साठी ते अभिनंदनास पात्र आहेत. भविष्य काळात विद्यापीठात अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, होमियोपॅथी, फिजिओथेरपी या सारख्या अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण देणारे महाविद्यालय सुरु होणार असून येणाऱ्या काळात इमारतीच्या नूतनीकरणासोबत बुद्धिमत्तेचेही नूतनीकरण आपणास पहावयास मिळणार आहे; असे सांगून राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी विद्यापीठांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास सतत धरावयास हवा असेही सांगितले.
आता दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून आपण आता त्याचा सामना करण्याची भूमिका स्वीकारली आहे. या संकटात केंद्र सरकार, राज्य शासन यांनी जे ठरवले, लोकांनीही त्याचे अनुकरण केले. ‘डरा सो मरा’ असे हिंदीत बोलले जाते, आपण भयाने खचून न जाता त्याचा सामना करायला शिकले पाहिजे, निष्काळजी न राहता सावधान राहिले पाहिजे तरच आपण कोरोना आणि त्याहीपेक्षा मोठ्या संकटाचा सामना करू शकतो. सर्वच वैद्यकीय शाखांचे त्यांचे स्वतःचे एक वेगळे अस्तित्व आणि महत्व आहे. या सर्वच विद्याशाखांनी इम्युनिटी हा कोरोना वरील सर्वोत्तम उपचार असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्वच वैद्यकीय विद्याशाखांना त्यासाठी काम करण्याचे मोठे आव्हान असल्याचेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी सांगून जगातील क्लीन व ग्रीन एनर्जी असलेल्या सौर उर्जेच्या प्रचार, प्रसारासाठी कार्य करण्याचेही आवाहन यावेळी केले.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रयोजन सार्थ ठरले : छगन भुजबळ
यावेळी बोलतांना पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाचा नावलौकिक राष्ट्रीय व जागतिक पातळीवर पसरला आहे. विद्यापीठाने आजवर केलेली वाटचाल बघता, मी सांगू इच्छितो की, ज्या प्रयोजनाकरीता शासनाने हे विद्यापीठ स्थापन केले ते प्रयोजन विद्यापीठाने सार्थ ठरविले. विद्यापीठाने नुसतीच महाविद्यालयांच्या संख्येत वाढ केली नसुन त्यांची गुणवत्ताही राखली आहे. विद्यापीठ नेहमीच नवीन प्रशासकीय संकल्पना राबवून विद्यार्थी हिताचे निर्णय घेते हे बघून समाधान वाटते. उर्जेची वाढती मागणी लक्षात घेता अपारंपारिक उर्जा श्रोतांद्वारे वीज उपलब्ध करून घेणे ही आजची काळाची गरज असुन राज्य व केंद्र सरकारचे धोरण लक्षात घेता विद्यापीठाने सोलर रुफटॉप पॉवर प्लांट बसविला आहे ही अभिनंदनीय बाब आहे. या सोलर उर्जेमुळे वीज बिलावरील खर्च कमी होईल तसेच वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रसंग निर्माण होणार नाही, असेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.
कोव्हीड – १९ महामारीचे संकट असतांना पदवी व पदव्युत्तर उन्हाळी – २०२० च्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठापुढे सर्वात मोठे आव्हान होते. तथापी विद्यापीठाने अतिशय यशस्वीपणे अंतिम पदव्युत्तर व पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा पार पाडल्या. व विक्रमी वेळेत निकाल जाहिर केले. त्याबद्दल विद्यापीठाचे विशेष अभिनंदन करतो. नाशिक येथे वैद्यकीय पदवी व पी.जी.इन्स्टिट्यूट त्याचप्रमाणे आयुर्वेद, होमिओपॅथी, पिफजिाओथेरपी महाविद्यालयांचा प्रस्ताव विद्यापीठाने शासनास सादर केलेला आहे. याबाबतचे एमओयु व इतर प्रक्रिया पूर्ण करून महिनाभरात मंत्रीमंडळ बैठकीमध्ये नाशिकसाठी या महाविद्यालयांना मान्यता देण्यात येईल. नाशिक जिल्हयाचा पालकमंत्री या नात्याने विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न मी नक्कीच सोडविण्याचा माझा प्रयत्न आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठ प्रशासनाने योग्य तो पाठपुरावा करावा असेही श्री.भुजबळ यांनी सांगितले.
आरोग्य विद्यापीठातील सौर ऊर्जा प्रकल्प ऊर्जापीठ ठरेल : अमित देशमुख
राज्यपाल यांनी सुचविलेली कामे पूर्ण करून त्यांच्याच शुभहस्ते या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने उभारलेला सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण करतांना आज विशेष आनंद होत आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प भविष्यात उर्जापीठ ठरेल. या प्रकल्पास चालना देवून याचा विस्तार करण्यात यावा, ज्यामुळे भविष्यात बाह्य ऊर्जेची आवश्यकता भासणार नाही, असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांनी व्यक्त केला.
कोरोना कालावधीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे व केलेल्या यशस्वी कामांमुळे या आरोग्य विद्यापीठाची यशोगाथा सुवर्ण अक्षरात लिहिली जाईल. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत करण्यात आलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीच्या माध्यमातून या विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू, असेही मंत्री श्री. देशमुख यावेळी म्हणाले.
कोरोना महामारी व त्यानंतरच्या येणाऱ्या विविध अडचणींवर मात करण्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठाने यश संपादन केले आहे. विद्यापीठामार्फत कोरोना काळात घेण्यात आलेल्या परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यसाठी पालकांसह प्राध्यापक, प्राचार्य तसेच यंत्रेणतील सर्व घटकांचे विशेष कौतुक करत भविष्यातही याप्रकारचे योगदान मिळेल. नाशिक हे सांस्कृतिक व धार्मिक वारसा लाभलेले राज्यातील अग्रगण्य शहर असून या शहराच्या प्रगतीसाठी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी विशेष मेहनत घेतली आहे. भविष्यातही या जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी दिली.
0000