03.10.2024: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी साधला विविध शिष्टमंडळांशी संवाद
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी साधला विविध शिष्टमंडळांशी संवाद
वर्धा, दि. ०३ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी वर्धा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये विविध क्षेत्रातील शिष्टमंडळांची भेट घेतली व त्यांची विविध विषयांवरील मते जाणून घेतली. यामध्ये आजी माजी लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, क्रीडा, कला, सामाजिक, आदिवासी, कृषी, औद्योगिक, माध्यम आदी क्षेत्रातील प्रतिनिधींची भेट घेवून जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्या जाणून घेतल्या.
यावेळी लोकप्रतिनिधी व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्न व विषयावर राज्यपालांशी चर्चा केली. शेती, उद्योग, सिंचन, दळणवळण, पिककर्ज, आदी विषयांवर मते मांडली. राज्यपालांनी या सर्व प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
यानंतर जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवक, सामाजिक संस्था प्रतिनिधी, उद्योजक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांच्या सोबत राज्यपालांनी संवाद साधला. विविध क्षेत्रात होत असलेल्या घडामोडींबाबत राज्यपालांनी जाणून घेतले. उपस्थित प्रतिष्ठित व्यक्तींनी त्या त्या क्षेत्रातील प्रश्न, समस्या व अडचणी याबाबत राज्यपालांना अवगत केले. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, आरोग्य सेवा, कर प्रणाली, प्रदूषण, सांस्कृतिक संकुल, वन व जल संवर्धन आदींचा यात समावेश आहे.
यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशीही संवाद साधला. महात्मा गांधी हे आजही समविचारी आहेत आणि गांधीजींचे विचार जगाला प्रेरकच राहणार असे राज्यपाल यांनी सांगितले.