बंद

  03.02.2021: पेसा सारख्या कायद्याद्वारे आदिवासी विकासाला गती – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

  प्रकाशित तारीख: February 3, 2021

  पेसा सारख्या कायद्याद्वारे आदिवासी विकासाला गती
  – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

  नाशिक दि. 3 : आदिवासी विकास योजनांमधून विकासाची कामे सुरू आहे, पेसासारख्या कायद्यांनी त्याला गती मिळाली आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनी त्यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन विकास साधावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.
  कळवण तालुक्यातील गुलाबी गाव (भिंतघर) येथील एकात्मिक आदिवासी जिल्हा प्रकल्पाच्या जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत बांधलेल्या आदिवासी सांस्कृतिक भवनाचा लोकार्पण सोहळा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाला.
  कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, पंचायत समिती सदस्य एन. डी. गावित आदी उपस्थित होते.
  यावेळी गावात राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे आगमन होताच त्यांचे पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आले. गुलाबी रंगाने सजलेली घरे आणि पारंपरिक वेशात असलेले गावकरी आणि त्यांच्याकडून झालेल्या उत्स्फूर्त स्वागताने राज्यपाल श्री. कोश्यारी भारावले. त्यानंतर सभास्थानी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आणि गिर्यारोहक हेमलता गायकवाड यांच्या हस्ते पारंपरिक वाद्य पावरी आणि पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्वागत करण्यात आले.
  राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, निसर्गाचे वरदान लाभलेला हा परिसर आहे. येथील आदिवासी बांधव विकासाची संधी शोधत आहेत त्यांना ती संधी पेसा सारख्या कायद्याच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. याशिवाय वनपट्टे कसण्यासाठी त्यांना देण्यात येत आहेत, त्याचाही उपयोग हे बांधव करत आहेत. या भागात बचतगटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अधिक प्रयत्न होण्याची गरज असल्याचे श्री.कोश्यारी यांनी सांगितले.
  विधानसभा उपाध्यक्ष श्री. झिरवाळ म्हणाले, या भागात पावसाळ्यात सतत चार महिने पाऊस असतो. मात्र, ते पाणी वाहून जाते. त्यामुळे येथील विकास गतीने होण्यासाठी पाण्याचे साठे निर्माण करण्याची गरज आहे. विशेष बाब म्हणून त्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे श्री. झिरवाळ यांनी सांगितले.
  यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात गुलाब वाघेरे, बंडू कडाले आणि तुळशीदास जाधव यांना वन पट्टे सातबाराचे वितरण करण्यात आले.तसेच प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांपैकी श्रीमती विमल जाधव यांना प्रातिनिधीक प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
  गावकऱ्यांच्या वतीने सरपंच कांतीलाल खांडवी यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे स्वागत केले तर आभार रघुनाथ जाधव यांनी मानले.
  राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी या कार्यक्रमानंतर गोविज्ञान सेवाभावी संस्था अंतर्गत येथील जनकल्याण गो शाळेचे उद्घाटन केले. यावेळी आयुर्वेदाचार्य अजित रावळ, राजेन्द्र लुंकड, रवींद्र रगडे, योगिनी चंद्रात्रे, कुबेर पोपटी आदी उपस्थित होते. गो सेवा ही महत्वपूर्ण आहे. त्यामुळे अशा गो शाळांना आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका राज्यपाल यांनी व्यक्त केली.
  दरम्यान, राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे कार्यक्रमासाठी वावरपाडा येथील हेलिपॅड येथे आगमन झाले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उप विभागीय अधिकारी संदीप आहेर, एकात्मिक आदिवासी जिल्हा प्रकल्पच (कळवण) संचालक विकास मीना, अपर पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर आदींची उपस्थिती होती.
  “या लोकांत देव दिसतो”
  राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी या लोकांशी मनमोकळा संवाद साधला. मी सुद्धा पहाडी भागातून आलो आहे. त्यामुळे तुमची जीवनशैली मला माहिती आहे. त्यामुळेच मला शहरी भागापेक्षा अशा कार्यक्रमांना येणे आवडते. तुम्हा लोकांमध्येच मला देव दिसतो, अशा शब्दात राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी भावना व्यक्त केल्या.
  ००००