02.08.2021 : भौगोलिक मानांकनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नव्या युगाचा आरंभ होईल: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
भौगोलिक मानांकनाच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नव्या युगाचा आरंभ होईल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
बौद्धिक संपदा व भौगोलिक मानांकन शेतकऱ्यांकरिता महत्वाचे विषय असून देखील त्यांना त्याबाबत पुरेशी माहिती नाही. भौगोलिक मानांकनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळेल तर ग्राहकांना अस्सल वस्तू व उत्पादने खरेदी करता येईल. यादृष्टीने बौद्धिक संपदा व भौगोलिक मानांकनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या मातृभाषेत भाषेत पोहोचवणे अतिशय आवश्यक असून त्यातून कृषि क्षेत्रात नव्या युगाचा आरंभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
बौद्धिक संपदा व भौगोलिक मानांकन या क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या प्रा. गणेश हिंगमिरे यांच्या ‘इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स’ या इंग्रजी, व ‘जीआय मानांकन’ या मराठी पुस्तकाचे तसेच डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. २) राजभवन येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रातील शेतकरी प्रागतिक असून देशातील शेतकरी येथील शेतीतील नवनवे प्रयोग पाहण्यास येत असतात. शेती हा भारताचा प्राण असून राज्यातील शेतकऱ्यांनी प्रगती केली तर देशातील शेतकरी त्यांचे अनुकरण करतील व त्यातुन देशाची प्रगती होईल, असे सांगताना शेतकऱ्यांच्या घरोघरी भौगोलिक मानांकनाचे उत्कृष्ट ज्ञान पोहोचविणारे हिंगमिरे जीआय क्रांतीचे आरंभकर्ता असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
बौद्धिक संपदा, पेटंट व ट्रेड मार्क हे विषय जपान मध्ये सातव्या इयत्तेत शिकविले जातात मात्र हे विषय भारतात स्नातक स्तरावर देखील शिकविले जात नाहीत याबाबत खंत व्यक्त करून युरोप प्रमाणे भारताने आर्थिक प्रगती साधायची असेल तर हे विषय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे लागतील असे लेखक गणेश हिंगमिरे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित राज्यातील विविध विभागातून आलेल्या शेतकऱ्यांनी राज्यपालांना आपापली जीआय मानांकित कृषी उत्पादने भेट दिली. कार्यक्रमाला कर्नल (नि.) गिरीजा शंकर मुंगली, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष सुधाकर आव्हाड, प्रबोध उद्योगाचे संचालक रामभाऊ डिंबळे, रश्मी हिंगमिरे व गणेश हिंगमिरे यांच्या आई उपस्थित होते. बुकगंगाच्या सुप्रिया लिमये यांनी आभार प्रदर्शन केले.