बंद

  02.03.2022 : आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारोह संपन्न

  प्रकाशित तारीख: March 2, 2022

  आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २१ वा दीक्षांत समारोह संपन्न

  रुग्णसेवा ही देशसेवा समजून काम केल्यास आत्मिक आनंद मिळेल: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  युक्रेनहून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करावा : अमित देशमुख

  करोना काळात सर्व विद्यापीठांपैकी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सर्वोत्तम काम केले. आज देशाला डॉक्टरांची आवश्यकता आहे. अशावेळी रुग्णसेवा करताना आपण देशसेवा करीत आहोत किंवा ईशसेवा करीत आहोत ही भावना ठेवली तर वैद्यकीय स्नातकांना नोकरीसोबत आत्मिक आनंद होईल तसेच सर्वांच्या प्रयत्नातून नव्या भारताचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २१ वा वार्षिक दीक्षांत समारोह राज्यपाल कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत बुधवारी (दि. २) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.

  दीक्षांत समारोहाला विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महानिदेशक डॉ बलराम भार्गव, विद्यापीठाच्या कुलगुरू ले. जन. माधुरी कानिटकर, परीक्षा नियंत्रक डॉ अजीत पाठक, कुलसचिव डॉ कालिदास चव्हाण, अधिष्ठाता, शिक्षक व स्नातक उपस्थित होते.

  शाबासकी

  करोनाच्या कठीण काळात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रत्यक्ष ऑफलाईन परीक्षा घेऊन तसेच परीक्षांचे निकाल वेळेत लावून इतिहास घडवला याबद्दल राज्यपालांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख व तत्कालीन कुलगुरू दिलीप म्हैसेकर यांचे जाहीर कौतुक केले. करोना काळातील या कामगिरीसाठी विद्यापीठाचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल असे त्यांनी सांगितले.

  कोविड लसनिर्मिती करणाऱ्या देशांमध्ये भारताने जगात पहिले स्थान मिळविले. अश्यावेळी वैद्यकीय क्षेत्राने देखील मागे राहून चालणार नाही. वैद्यकीय क्षेत्रात नित्यनुतन संशोधन होत असताना कोविड सारखे नवनवे आजार देखील उद्भवत आहेत. त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांनी देखील येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

  सक्षम नेतृत्व

  ले. जन. माधुरी कानिटकर यांच्या रूपाने विद्यापीठाला एक सक्षम नेतृत्व लाभले याबद्दल आनंद व्यक्त करताना विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या २०२३ साली होणारा रौप्य महोत्सवाचे यथायोग्य आयोजन करावे, अशी सूचना राज्यपालांनी केली.

  युक्रेन विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाचा विचार करावा : अमित देशमुख

  युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात परत येत आहेत. या विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षण तात्पुरत्या स्वरूपात सुरु ठेवण्यासाठी त्यांना काही मदत करता येईल का याचा विद्यापीठाने विचार करावा व त्यासंदर्भात एक पेपर तयार करावा असे आवाहन प्रकुलपती अमित देशमुख यांनी केले. अश्या प्रकारचा विचार करणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे देशातील पहिले विद्यापीठ ठरावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  राज्यात एकात्मिक वैद्यकीय शिक्षण परिसर (Integrated Medical Education Campuses) विकसित केले जावे व त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग शिक्षण आदी सर्व संबंधित शाखांचा समावेश असावा, या दृष्टीने शासनाच्या वतीने धोरण तयार करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

  आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध आदी शाखांचा समावेश असलेला एकात्मिक आयुष परिसर विकसित करण्याबाबत देखील विचार केला जाईल असे त्यांनी सांगितले.

  रिसर्च हॉस्पिटल कॉलेज

  वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केवळ अध्यापन करणे पुरेसे नाही तर तेथे संशोधन देखील झाले पाहिजे असे नमूद करून राज्यात संशोधन इस्पितळ व महाविद्यालये साकारावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  विद्यापीठाला वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल देशमुख यांनी राज्यपालांचे आभार मानले व विद्यापीठाच्या व्हिजन डॉक्युमेंटवर देखील राज्यपाल शिक्कामोर्तब करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

  भारत औषधी निर्माण क्षेत्रात जगाची ‘फार्मसी’ झाले आहे तसेच आरोग्य सुविधा निर्मिती क्षेत्रात देशाने उत्तुंग कामगिरी केली आहे असे केंद्र शासनाच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ बलराम भार्गव यांनी सांगितले.

  दीक्षांत समारोहात विविध वैद्यकीय विद्याशाखांमधील १०८३६ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी व डिप्लोमा पदव्या तसेच सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली.