01.11.2022 : राज्य कौशल्य विद्यापीठ देशातील आदर्श विद्यापीठ व्हावे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्य कौशल्य विद्यापीठ देशातील आदर्श विद्यापीठ व्हावे: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यात नव्याने स्थापन झालेले कौशल्य विद्यापीठ युवकांना आधुनिक कौशल्ये प्रदान करणार असून हे विद्यापीठ देशातील आदर्श विद्यापीठ व्हावे यासाठी उद्योजक, शिक्षक, वैज्ञानिक, प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी एकदिलाने प्रयत्न केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा आरंभ तसेच बोधचिन्हाचे अनावरण राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. १) एल्फिन्स्टन तांत्रिक शिक्षण संस्था मुंबई येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, वैद्यकीय शास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड रॉबर्ट्स, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपुर्वा पालकर, महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे मुख्याधिकारी डॉ रामास्वामी एन., विविध विद्यापीठांचे कुलगुरू तसेच काही देशांचे वाणिज्यदूत यावेळी उपस्थित होते.
भारतात योगशास्त्राची मोठी परंपरा असून कुठल्याही कार्यामध्ये कौशल्यता प्राप्त करणे म्हणजेच योग होय असे राज्यपालांनी सांगितले. सन २०१४ साली पदभार स्वीकारल्यानंतर एक वर्षातच पंतप्रधानांनी कौशल्य विकास मंत्रालय सुरु केले तसेच त्यानंतर महाराष्ट्र शासनाने देखील कौशल्य विकास विभाग सुरु केला असे राज्यपालांनी सांगितले.
कौशल्य विद्यापीठाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन ६० दिवसांच्या आत केले जाईल तसेच राज्यात मराठी भाषेतून देखील कौशल्य अभ्यासक्रम राबविले जातील असे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले. राज्यात कौशल्य प्रशिक्षणाची चळवळ उभारली जाणार असून १००० कौशल्य केंद्रे उघडली जातील असे लोढा यांनी सांगितले. कौशल्य प्रशिक्षित ५ लाख युवकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठरवले असून यादृष्टीने उद्योग जगताने सहकार्य करावे असे आवाहन लोढा यांनी केले.
अपयश हा गुरूच
एखाद्या विषयात सुरुवातीला मिळालेले अपयश हाच एक उत्तम गुरु असतो असे नमूद करून विद्यार्थ्यांनी ज्या विषयाची मनस्वी आवड आहे तो विषय निवडला पाहिजे असे नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड रॉबर्ट्स यांनी सांगितले.
विद्यापीठातर्फे सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाऊड कॉम्पुटिंग, उद्योग ४.०, बांधकाम व्यवस्थापन या विषयांमध्ये एम. टेक. अभ्यासक्रम तसेच बिझनेस ऍनालिसिस या विषयात एम एस्सी. अभ्यासक्रम, एमबीए तसेच विविध आधुनिक विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येत असल्याचे कुलगुरु डॉ अपूर्वा पालकर यांनी सांगितले. लोकसंख्येमध्ये महिलांचे प्रमाण ४९ टक्के इतके असले तरीही कौशल्याधारित नौकरीमध्ये हे प्रमाण अतिशय कमी आहे असे सांगूतन राज्याच्या प्रत्येक महसूल विभागात विद्यापीठाचे एक उपकेंद्र उभारले जाईल व अधिकाधिक महिलांना कौशल्य शिक्षण दिले जाईल असे डॉ पालकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यापीठाचे व्हिजन डॉक्युमेन्ट सादर केले. विद्यापीठाचे वित्त उपसंचालक विक्रम यादव यांनी आभारप्रदर्शन केले.