01.06.2022 : वॉर्सा – मुंबई थेट विमानसेवेमुळे व्यापार, पर्यटनाला चालना मिळेल : पोलंड राजदूत
वॉर्सा – मुंबई थेट विमानसेवेमुळे व्यापार, पर्यटनाला चालना मिळेल : पोलंड राजदूत
पोलंड गणराज्याचे भारतातील राजदूत प्रो. ऍडम बुराकोवस्की यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
दिनांक ३१ मे रोजी पोलंडची राजधानी वॉर्सा येथून मुंबई पर्यंत थेट विमानसेवा सुरु झाल्यामुळे भारत व पोलंड देशांमधील व्यापार व पर्यटनाला चालना मिळेल असे राजदूत बुराकोवस्की यांनी यावेळी राज्यपालांना सांगितले. पोलिश एअरलाईन्सची ही विमानसेवा आठवड्यातून तीनदा असेल असे त्यांनी सांगितले.
पोलंड – भारत राजनैतिक संबंध १९५४ साली सुरु झाले असले तरी मुंबई येथील दूतावास सन १९३३ पासून सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलंडमध्ये ४०,००० भारतीय राहत असून ते विविध क्षेत्रात चांगले योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रात देखील पोलंड भारताशी सहकार्य करण्यास इच्छूक असून आजच मुंबई विद्यापीठाच्या प्रकुलगुरूंची भेट घेतल्याचे राजदूतांनी सांगितले.
महाराष्ट्राशी जुने संबंध
पोलंड येथून काही निर्वासित दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूर येथे आले होते त्यामुळे पोलंडचे महाराष्ट्राशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. पोलंडसरकारच्या वतीने कोल्हापूर येथे एक स्मारक तयार करणार असून या संदर्भात संभाजी छत्रपती यांचेशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील काही चित्रपट पोलंड येथे चित्रित झाल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन इरझिक हे देखील उपस्थित होते.