01.04.2023 : नेपाळ संसद सदस्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
भारत – नेपाळ सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने नेपाळ संसद सदस्यांनी योगदान द्यावे : राज्यपाल रमेश बैस
नेपाळ संसद सदस्यांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
भारताने आपल्या शेजारी राष्ट्रांचा सदैव आदर केला आहे. भारत संकटकाळी नेपाळ, श्रीलंका व पाकिस्तान या देशांच्या मदतीला धावून गेला आहे, या गोष्टीला इतिहास देखील साक्षीदार आहे. त्यामुळे लोक चुकीच्या दिशेने नेत असतील तर त्यांना आपण योग्य दिशेने घेऊन जावे व भारत – नेपाळ सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीने योगदान द्यावे असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
नेपाळ संसदेच्या विविध पक्षांच्या १२ सदस्यांच्या एका शिष्टमंडळाने शनिवारी (दि. १) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. संसद सदस्यांच्या भेटीचे आयोजन स्वतंत्र युवा प्रजातांत्रिक संघ, नेपाळ या संस्थेने विश्व हिंदू परिषदेच्या सहकार्याने केले होते.
मित्र बदलता येतात परंतु शेजारी बदलता येत नाही. भारत आणि नेपाळचे संबंध अनादी काळापासून घनिष्ठ असून, नेपाळ भारताकडे भगवान बुद्धाची भूमी असलेला शांतीप्रिय देश म्हणून पाहत आला आहे. परस्पर नात्यांची वीण अशीच घट्ट राहावी व भारत – नेपाळ सहकार्य नव्या पिढीच्या खासदारांमध्ये देखील टिकून राहावे अशी भावना यावेळी नेपाळ संसद सदस्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
यावेळी नेपाळ संसद सदस्यांनी राज्यपालांना पशुपतीनाथ मंदिर काठमांडू येथून आणलेला प्रसाद दिला. राज्यपालांनी सर्व सदस्यांचे भेटवस्तू देऊन स्वागत केले.
यावेळी नेपाळ संसदेचे सदस्य मैना कार्की, शान्ति बी. के., प्रतिमा गौतम, मेनका कुमारी पोखरेल, सेराज अहमद फारुकी, नारायण प्रसाद आचार्य, डॉ. ढाका कुमार श्रेष्ठ, शेर बहादूर कुंवर, बलराम अधिकारी, माधव सपकोटा व मीना लामा हे उपस्थित होते. यावेळी संयोजक तथा स्वतंत्र युवा प्रजातांत्रिक संघ, नेपाळचे अध्यक्ष अरबिंद महोतो, विश्व हिंदू परिषदेचे संयोजक संजय ढवळीकर, तसेच जीबीत सुबेडी, डॉ महेश जोशी, राजलक्ष्मी जोशी आदी उपस्थित होते.