बंद

  01.03.2022: जगातील युद्धजन्य परिस्थितीत आचार्य तुलसींचे अणुव्रत प्रासंगिक: राज्यपाल

  प्रकाशित तारीख: March 1, 2022

  जगातील युद्धजन्य परिस्थितीत आचार्य तुलसींचे अणुव्रत प्रासंगिक: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

  जगात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली असताना तसेच वैयक्तिक स्तरावर मनुष्य अशांत असताना जैन आचार्य तुलसी यांनी सुरु केलेली अणुव्रत चळवळ शांतीच्या पुनर्स्थापनेसाठी अधिक प्रासंगिक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

  आचार्य तुलसी यांनी सन १९४९ साली सुरु केलेल्या अणुव्रत आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘शंखनाद अणुव्रताचा’ हा कार्यक्रम राज्यपाल कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन अणुव्रत समिती मुंबईतर्फे करण्यात आले होते.

  यावेळी आचार्य महाश्रमण यांचे शिष्य मुनिश्री डॉ अभिजित कुमार, मुनिश्री जागृत कुमार, अणुव्रत विश्वभारतीचे अध्यक्ष संचय जैन, अणुव्रत समिती मुंबईच्या अध्यक्षा कंचन सोनी, समाजसेवक रविंद्र संघवी व राजकुमार चपलोट आदी उपस्थित होते.

  आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले, दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बमुळे प्रचंड नरसंहार झाला त्यावेळी आता विश्वशांतीसाठी ऍटम बॉम्ब नाही तर आत्मभान आवश्यक असल्याचे आचार्य तुलसी यांनी जगाला पटवुन दिले. या पार्श्वभूमीवर जनसामान्यांना करता येईल असे अणुव्रत म्हणजे शांततेसाठी लघुसंकल्प करण्यास त्यांनी सांगितले होते. आज जगभर युद्धाची परिस्थिती उद्भवली असताना सर्वांनी शांततेच्या दिशेने लहानसाही प्रयत्न केला तर एक स्वस्थ समाज व सुखी जग निर्माण करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले.

  राज्यपालांच्या हस्ते यावेळी ‘उत्थान गीत’ तसेच पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.

  मुनिश्री जागृत कुमार यांनी तणाव मुक्त जगण्याचे सूत्र सांगितले तर मुनी डॉ अभिजित कुमार यांनी संबोधन केले.

  कंचन सोनी व संचय जैन यांनी यावेळी प्रास्ताविक केले. राजकुमार चपलोट यांनी सूत्रसंचालन केले तर वनिता बाफना यांनी आभार प्रदर्शन केले.