01.02.2023 : स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन
स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे राज्यपालांच्या हस्ते उदघाटन
‘मौखिक आरोग्यासाठी ‘फिंगर बोल’ मध्ये हात धुण्याची पद्धत बंद करावी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
आधुनिक जीवन पद्धतीमध्ये जेवणानंतर चूळ न भरता ‘फिंगर बोल’मध्ये हात धुण्याची पद्धत प्रचलित झाली आहे. दंतरोग्याच्या दृष्टीने ही पद्धत अतिशय चुकीची असून दंत वैद्यकांनी ही पद्धत बंद करण्यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.
दंतवैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. १) राज्यातील दंतवैद्यकांना ‘एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री’ पुरस्कार राजभवन येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी राज्यपाल बोलत होते. ‘मेडियुष’ या दंतवैद्यकांच्या संघटनेच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियानाच्या बोधचिन्हाचे तसेच बोधवाक्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
‘स्वच्छ मुख अभियान’ हा चांगला उपक्रम आहे, परंतु असे अभियान हे एक दिवस राबविण्याचे काम नाही. त्यासाठी प्रत्येकदा खाणे झाल्यानंतर चुळा भरुन तोंड धुण्याची पारंपरिक पद्धत टिकवणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. ‘फिंगर बोल’ मध्ये हात बुडवून धुणे यासारखे आधुनिक जीवन पद्धतीमध्ये निर्माण झालेले दोष दूर करण्यास दंतवैद्यकांनी मदत करावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
वैद्यकीय सेवा हा एक पवित्र पेशा असून त्याचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले. नवनवीन औषधे व तंत्रज्ञान विकसित होत आहे, तसेच नवनवे आजार देखील येत आहेत. कर्णाने आपले सोन्याचे दात काढून दान दिले होते अशी पौराणिक आख्यायिका सांगण्यात येते, असे नमूद करून डॉक्टरांनी रुग्णांना देव मानून सेवा करावी असे आवाहन राज्यपालांनी केले.
कार्यक्रमाला ‘मेडीयुष’चे सह-संस्थापक डॉ गोविंद भताने, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ विवेक पाखमोडे, ‘ओरल हेल्थ मिशन’चे डॉ दर्शन दक्षिणदास, डॉ विश्वेश ठाकरे, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ अशोक ढोबळे, सौंदर्यवर्धक व कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञ डॉ संदेश मयेकर, कालिका स्टीलचे संचालक गोविंद गोयल, तसेच दंतचिकित्सा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.