सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी धरला ठेका आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आवाहन
सांस्कृतिक कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी धरला ठेका
आपल्या संस्कृतीचे संवर्धन करण्याचे आवाहन
नंदुरबार : भगदरी शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्यात सहभागी होत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ढोलच्या तालावर ठेका धरला. पालकमंत्री के.सी.पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी, खासदार हिना गावित, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि माजी आमदार नरेंद्र पाडवी हे देखील नृत्यात सहभागी झाले.
या कार्यक्रमात होळी नृत्य, लग्नातील पारंपरिक आदिवासी नृत्य, ढोल नृत्य, पारंपरिक आदिवासी नृत्याद्वारे आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले. कार्यक्रमात सामाजिक संदेशही देण्यात आले. राज्यपाल महोदयांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. ते म्हणाले, आपल्या संस्कृतीचे संवर्धन केल्यास देश महान होईल. दुर्गम भागातील घरे लहान असू देत, माणसे गरीब असू देत, यांचे हृदय शुद्ध आणि पवित्र आहे. आदिवासी मुलांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता आहे. त्यामुळे राज्यात आदिवासी बांधवांसाठी 4 क्रीडा प्रबोधिनी उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी एक नंदूरबार येथे उभारण्यात येईल.
विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे आणि मातृभाषेवर प्रभुत्व संपादन करावे. तरच जीवनात यशस्वी होता येईल. आपली भाषा, प्रदेश आणि संस्काराचा अभिमान बाळगावा. जीवनात चांगल्या संस्काराच्या आधारे यश संपादन करावे, अशा शुभेच्छा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. श्री.कोश्यारी यांनी चांगले कार्यक्रम सादर केल्याबद्दल विद्यार्थ्यांना 25 हजाराचे पारितोषिक जाहीर केले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना खाऊसाठी 11 हजार रुपये देणार असल्याचे ते म्हणाले. शाळेच्या आवश्यक गरजांसाठी प्रस्ताव आल्यास सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
पालकमंत्री म्हणाले, राज्यपाल महोदय आदिवासी संस्कृतीशी समरस झाले, त्यांनी संस्कृती जपण्याचा सल्ला दिला ही महत्त्वाची बाब आहे. दत्तक गावाबद्दल त्यांना असलेली आस्था पाहता भगदरीचा विकास अधिक वेगाने होईल. या गावात अनेक विकासकामे चांगल्याप्रकारे झाली आहेत. अशी कामे इतरत्र होणे गरजेचे आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी राज्यपाल महोदयांचे मार्गदर्शन आणि सहकार्य महत्वाचे ठरेल, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील मुलांना चांगले शिक्षण देऊन प्रशासकीय सेवेत आदिवासी युवकांनी यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शाळांमधून गुणवत्ता शोध सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.
यावेळी खासदार गावित, जि. प.अध्यक्ष वळवी यांनी आपले विचार व्यक्त केले. तत्पूर्वी श्री.कोश्यारी यांच्या हस्ते पशु संवर्धन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी पेरू बाग, आंबा बाग आणि पॉली हाऊसच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. आदिवासी बांधवांसोबत खाटेवर बसून त्यांनी बागेतील फळांचा आस्वाद घेतला. गावात वेगळ्या प्रकारचे समाधान मिळते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांनी केले, तर जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी आभार मानले.