बंद

    राष्ट्रपतींच्या हस्ते सेवाग्राम येथील एमजीआयएमएस संस्थेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम संपन्न

    प्रकाशित तारीख: August 17, 2019

    सेवाग्राम ही प्रेरणा देणारी भूमी – राष्ट्रपती राम नाथ कोविंद
    राष्ट्रपतींच्या हस्ते सेवाग्राम येथील एमजीआयएमएस संस्थेचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम संपन्न

    मेडीकल कॉलेज सभागृहाचे लोकार्पण

    वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे हे 150 वे जयंती वर्ष आहे. ग्रामीण भागात महात्मा गांधीजींच्या विचारांवर आधारीत पहिले वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथे सुरू झाले. या महाविद्यालयाने सुवर्ण महोत्सवी वर्षात वाटचाल केली आहे. सत्य, अहिंसा, सेवा आणि मानवतेची शिकवण देणारी ही भूमी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केले.

    सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्सच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्यपाल सी. विद्यासागर राव,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सविता रामनाथ कोविंद, कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धिरुभाई मेहता, संस्थेचे विश्वस्त पी.एल. तापडीया, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.नितीन गणगने आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती आणि मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाच्या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले.

    श्रीमती डॉ.सुशिला नायर यांनी नि:स्वार्थ भावनेने 1969 साली या संस्थेची उभारणी केली, असे सांगून राष्ट्रपती श्री.कोविंद म्हणाले, या संस्थेने देशाच्या विकासात तसेच वैद्यकीय क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले आहे. महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरीत ही संस्था मानवतेचे कल्याण करण्यासाठी कार्यरत आहे. डॉ.सुशिला नायर यांनी सेवाग्राम येथे महात्मा गांधीजींसोबत कार्य केले आहे. या संस्थेचे कार्य जगभरात पसरविणाऱ्या प्रत्येक सदस्याचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यापूर्वी बापुकुटीला भेट दिली असता महात्मा गांधींजीचा जीवनपट आणि देशासाठी त्यांनी केलेला त्याग याची आवर्जुन आठवण झाली.

    बापुकुटी परिसर हा आजही स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधेसाठी विशेष ओळखला जातो. बापुंनी आपले कुष्टरोग निर्मुलनाचे कार्य याच आश्रमातून सुरू केले. सेवाग्राम, वर्धा आणि विदर्भाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या भूमीत आचार्य विनोबा भावे यांनी भुदान आंदोलनाची तर बाबा आमटे यांनी कुष्ठरोग निर्मुलनासह सामाजिक बदलाची चळवळ उभारली. हाच वारसा सेवाग्राम मेडीकल संस्थेने जपला असून एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला असल्याचे गौरवोद्वार राष्ट्रपतींनी काढले. येथील डॉक्टरांनी समाजाच्या उत्थानासाठी आणि त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील कुटुंबाच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेली ग्रामदत्तक योजना ही कौतुकास्पद आहे. या संस्थेची आरोग्य सेवा ही ग्रामीण आणि शहरी भागातील दरी दूर करण्याचे कार्य निरंतर करीत आहे. सोबतच संस्थेची नाविण्यपूर्ण ग्रामीण आरोग्य विमा योजना अनेक कुटुंबाना दिलासा देणारी आहे.

    कर्करोग, क्षयरोग आणि कुष्ठरोग निर्मुलनासंदर्भात या संस्थेने सुरू केलेल्या संशोधनांचे चांगले परिणाम दृष्टीक्षेपात येत आहे. याचा उपयोग जागतिक आरोग्य संघटना आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या इतर संस्थांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना होत आहे. येथील वैद्यकीस सेवा ही वैज्ञानिक आणि मानवतेच्या दृष्टीने अद्वितीय आहे. ही आपली सामुहिक जबाबदारी आहे की, नागरिकांचा हा विश्वास कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

    पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत करा

    काही दिवसांपूर्वी देशासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक कुटुंब बाधित झाले आहेत. या सर्वांप्रती संवेदना व्यक्त करून राष्ट्रपती म्हणाले की,त्यांचे आयुष्य लवकर पूर्वपदावर येईल, अशी मी प्रार्थना करतो. केंद्र आणि राज्य शासन पूरपिडीतांच्या मदतीसाठी धावून आले असून समाजातील नागरिकांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी स्वयंप्रेरणेने पुढे यावे व आपले योगदान द्यावे. या संस्थेनेदेखील पूरग्रस्तांच्या आरोग्य सुविधेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष धिरुभाई मेहता यांनी केले. संस्थेच्या कार्याची माहिती त्यांनी यावेळी आपल्या भाषणात दिली. देशात 470वैद्यकीय महाविद्यालय असून सर्वोच्च तीन वैद्यकीय संस्थांमध्ये सेवाग्राम वैद्यकीय संस्थेचा समावेश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्यामुळे या संस्थेने वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग झेप घेतल्याचे त्यांनी सांगितले.

    कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने व गांधीजींच्या आवडत्या भजनाने करण्यात आली. यावेळी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते कस्तुरबा, महात्मा गांधी आणि डॉ.सुशिला नायर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ.अंशू यांनी तर आभार अधिष्ठाता डॉ.नितीन गणगने यांनी मानले. कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, संस्थेचे पदाधिकारी, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली