राज भवन, मुंबई
प्रस्तावना
मुंबई राजभवन हे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. मुंबई शहरातील ती एक अतिशय सुंदर वास्तू आहे. राजभवन अंदाजे 44 एकर जमिनीवर वसलेले आहे व त्याच्या तीनही बाजूंना समुद्र आहे.
मलबार हिल येथील राजभवन संकुल हे मैलभर लांब असलेली दाट वने, वाळुचे समुद्र किनारे आणि अनेक प्रकारच्या टवटवीत हिरवळीने व्यापले आहे. मुंबई राजभवनाबाबत सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मागील दीड शतकांपासून इतिहासाचे ते साक्षीदार आहे.
मुंबई राजभवन येथे सुंदर गालिचे, चित्रे, अत्युत्कृष्ट कोरीव काम केलेले दरवाजे व शोभिवंत फ्रेंच शैलीच्या खुर्च्या व सुंदर प्रतिमा असलेले सोफे यांचा मौल्यवान संग्रह आहे.
राजभवनाला भेट देणाऱ्या अभ्यागतांना या इमारतींचा इतिहास व येथे ठेवलेल्या काही वस्तूंबाबत नेहमीच उत्सुकता असते. हे दालन कला व इतिहासावर प्रेम करणाऱ्यांसाठी मौल्यवान असेल.
काळाचे चढउतार
कड्यांनी संरक्षित, समुद्राने वेढलेले असे प्राचीन मंदिर राजभवन येथे आहे. समुद्रकिनाऱ्याच्या वळणाच्या पलिकडे त्या मूर्त्या इतिहासाच्या अनंत क्षितिजाकडे टक लावून पाहतात. त्यांनी वाळूवर लिहिलेला धर्मग्रंथाच्या कालावधीतील चढउतार पाहिलेला आहे.
या बेटांवरील आद्यतम शक्ती असलेल्या या मूर्त्यांची, मुंबईचे पूर्वीचे रहिवाशी असलेले कोळी (मासेमारी करणारे लोक) पूजा करीत असत. नंतरच्या शतकांच्या कालप्रवाहात या मंदिराने आक्रमणकर्त्यांना किनारे लुटून नेताना पाहिले. पोर्तुगीज आले, त्यांनी या प्रदेशाची साफसफाई केली व नवीन पीठे सत्ता केंद्रे स्थापन केली. इंग्रज, व्यापारवृद्धीच्या लालसेने आले. पोर्तुगीजांनी मुंबईतून माघार घेतली व ते दक्षिणेत गेले.
इंग्रज देशी भूमीत आपल्या विदेशी शासनाची पाळेमुळे रोवून येथेच राहिले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बॉम्बे कॅसलपासून त्यांनी त्यांची राजवट सुरू केली. राजकीय प्रवाहातील स्थलांतरणाच्या ओघात गव्हर्नमेंट हाऊस मलबार पाँईट येथे हलविण्यात आले जेथे लाटांचा मंदिराच्या वाळूला सतत अखंड मारा बसत होता.
दरम्यानच्या काळात स्वातंत्र्यासाठी संपूर्ण देशभर उठाव झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री शासकीय आवास येथे स्वतंत्र राष्ट्राची विजयी घोषणा दुमदुमली.
नवीन भारताची निर्मिती झाली. गव्हर्नमेंट हाऊसला `राजभवन` असे नवीन नाव देण्यात आले. प्राचीन देवता व आधुनिक लोकशाहीच्या शिरोदन्तीत भारतीय तिरंगा अभिमानाने फडकविण्यात आला.
ब्रिटिश आरमार क्षितिजापलीकडे जात होते व ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य अस्ताला जाताना या देवता पाहात होत्या. भारतीय राज्यपालांनी कोळी लोकांना त्यांच्या धार्मिक विधींचे पुनरूज्जीवन करण्यासाठी निमंत्रित केले.
देवांचा धावा करण्यासाठी कोळी समाज फुले व धूप या धार्मिक वस्तूंसह परत आले. त्यांनी दुधाने व तुपाने देवतांना शुद्ध केले. पुज्यभावाने, ते शांत देवतांपुढे नतमस्तक झाले. समुद्रचे अपत्य असलेल्या मुंबईचे दैव अखंड अबाधित राहो, अशी त्यांनी प्रार्थना केली.
बदलते वारे
पोर्तुगीजांनी (1534 मध्ये) “बॉम बेम” च्या समुद्रात नांगर टाकला. ते, 1626 मध्ये अँग्लो डच सैन्यात व्यापारी वारे वाहत होते तोपर्यंत या बेटावर राहिले. इंग्लड व हॉलंडचे सैन्य पोर्तुगीजांवर नियत्रंण मिळवू शकले नाही. त्यांनी मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार करण्याच्या लालसेने बेट सोडले. हे ठिकाण जिंकण्यासाठी युद्ध न करण्याचे इंग्रजांनी ठरविले. कारस्थान रचले गेले व विवाहविषयक राजकारण मसाल्याच्या संपत्तीशी बांधल्या गेले.
1661 मध्ये, शाही लग्नाची घोषणा करण्यात आली की, राजा चार्ल्स दुसरा पोर्तुगालच्या राजाची बहीण कॅथेरीन ब्रॅगान्झा हिच्याबरोबर विवाहबद्ध होईल. यामधील अट अशी होती की, नवरीने येताना “बॉम बेम” हे बेट तिच्याबरोबर आंदण म्हणून आणावे.
इंग्लिश गव्हर्नर, सर अब्राहम शीपमन, राजाला बेट हस्तांतरित करण्यासाठी, “बॉम बेम” बेटाच्या प्रवासाला बोटीने निघाला, त्यावेळच्या पोर्तुगीज गव्हर्नरने 1665 पर्यंत या हस्तांतरणाला जाणीवपूर्वक विलंब केला. आपले कर्तव्य पार पाडण्याआधीच शीपमन, कर्तव्यावर असताना मरण पावला. हे काम हम्फ्री कुककडे सोपविण्यात आले.
1665 मध्ये, कुकने हातात माती व दगड घेऊन “बॉम्बै” चा समारंभपूर्वक ताबा घेतला. राजाला मौल्यवान रत्न भेट देऊन, `मनोर हाऊस` मध्ये ताब्याच्या विलेखावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
बॉम्बे कॅसल
इंग्रजांनी, मनोर हाऊस येथे स्वत:ला प्रस्थापित केले व त्याला “दि बॉम्बे कॅसल” असे नवीन सार्वभौम नाव बहाल केले. हे पहिले `गव्हर्नमेंट हाऊस` फोर्टच्या मध्यवर्ती भागात, टाऊन हॉलच्या मागे आणि टांकसाळ (मिंट) व ओल्ड कस्टम हाऊसच्या मध्ये वसलेले होते.
बॉम्बे कॅसलकडे एवढे आधिपत्य होते की ते, बंदराला लष्करी डावपेचाप्रमाणे घेराव घालू शकत होते. त्याला दोन उपसागर होते व ते एक नगर होते. सेकंड लेफ्टनंटच्या शब्दात, बॉम्बे कॅसल हा आपण बनविलेला भारतातील सर्वात मजबूत बालेकिल्ला होता.
इतिहासकार जेम्स डग्लस यांनी बॉम्बे कॅसलचा शक्तिशाली प्रभाव असल्याचे जाहीर केले. उंच दारामधून तुम्ही जाताना, दोन आकृत्या तुमच्याकडे बघतात. स्वत: महान जगत्प्रवासी असलेले उंच पोतुगीज सैनिक समुद्रमार्गे व जमिनीद्वारे वसाहतीच्या साम्राज्यात वाढ करणारे सूचक ध्येयचिन्ह आहे.
चार्ल्स दुसरा या राजाला निधीची सतत आवश्यकता भासत होती. त्याने 1668 मध्ये कर्जाच्या बदल्यात व वार्षिक दहा पौंड इतक्या भाडेतत्त्वावर हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला दिले. सर जॉर्ज ऑक्सीनडेन हे ईस्ट इंडिया कंपनीद्वारे नियुक्त केलेले पहिले राज्यपाल (गव्हर्नर) होते.
1686 मध्ये, ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून बॉम्बेला हलविले. 1710 मध्ये, कॅसलमध्ये बळकट शस्त्रागार, सैनिकांसाठी घरे व वीस महिन्यांसाठी हजार लोकांकरिता शुद्ध पाण्याचा पुरवठा होईल यासाठी टाक्यांची व्यवस्था करण्यात आली होती.
नंतर, तटबंदीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. हे काम सुरू असतानाच अन्य ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले. गव्हर्नरांनी तटबंदीच्या आत राहणे धोरणात्मक दृष्ट्या अयोग्य असल्याचे समजण्यात आले. कारण त्यांना भेटावयास येणाऱ्या सर्वांना तटरक्षक सेनेची शक्ती व सिध्दाता याची माहिती मिळाली असती. नवीन निवासाचा शोध घेण्यास सुरुवात झाली
न्यू हाऊस
श्री.जॉन स्पेन्सर यांचे अपोलो मार्गावरील घर, 1757 मध्ये खरेदी करण्यात आले होते. ते गव्हर्नरांचे नवीन निवासस्थान झाले असते. त्याला न्यू हाऊस व त्यानंतर कंपनी हाऊस असे समर्पक नाव देण्यात आले होते.
गव्हर्नर याठिकाणी अधिक काळ राहीले नाहीत. मुंबईचा विस्तार होण्यास सुरुवात झाली होती व शहराच्या मध्यवर्ती भागात गर्दी वाढायला लागली होती. गव्हर्नरांनी अधूनमधून उष्ण हवामान असलेले परळ येथील निवासस्थान पसंत केले होते.
सॅन्स पेरील
जुन्या वैजनाथ मंदिराच्या भग्नावशेषांवर परळ येथे पूर्वी जेथे जेझ्युइट मठ होता तेथे भव्य भवन बांधण्यात आले. कर्स्टेन नेबूर या प्रवाशाने परळ येथील बंगल्याला, संपूर्ण भारतात त्याच्याशी तुलना करू शकणारे काहीही नाही म्हणून “सॅन्स पेरील” (अद्वितीय) म्हणावे असे सुचविले होते.
श्री.डब्ल्यू.हॉर्नबी (1771-1784) हे परळ येथील निवासस्थानी राहण्यास जाणारे पहिले गव्हर्नर होते. मंजुळ व मधूर आवाजानी दरबार हॉल व्यापून टाकला जायचा. विशेष आनंदाच्या सायंकाळी, बॅक्वेट हॉल मधील झुंबराच्या (शॅडेलिअरच्या) खाली चायना व बिलोरी (क्रिस्टल) काचेची भांडी चकाकत असत. 1804 मध्ये, बॉम्बे लिटररी सोसायटी सुरू करण्याच्या प्रीत्यर्थ गव्हर्नर जोनाथन डन्कन यांनी आयोजित केलेल्या मेजवानीस आंमत्रितांनी आपापले ग्लास उंचावले होते.
दरम्यानच्या काळात परळमधील औद्योगिकीकरणामुळे हवा प्रदूषित होण्यास सुरुवात झाली होती. लोकसंख्येत वाढ झाली होती. प्रदूषकांमुळे वातावरण दूषित झाले होते. वायूप्रदूषण व दूषित पाण्यामुळे रोगराई पसरायला लागली होती.
गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी आपले निवासस्थान मलबार पाँईट येथे हलविले. 1883 मध्ये, गव्हर्नरांची पत्नी लेडी फर्ग्युसन, यांचा परळ हाऊसमध्ये कॉलऱ्यामुळे मृत्यु झाला. त्यांच्या मृत्युनंतर गव्हर्नमेंट हाऊस अधिकृतपणे मलबार पाँईट येथे हलविण्यात आले.
परळ येथील निवासस्थान प्लेग रुग्णालयात रूपातंरित करण्यात आले. जेथे 1897-98 मध्ये मुंबईत आलेल्या प्लेगच्या साथीत शेकडो लोकांवर उपचार करण्यात आले होते.
डॉ.वाल्डेमर हाफकीन येथे आले आणि त्यांनी प्लेग व कॉलऱ्याची लस शोधून काढली. 1925पासून, हे गव्हर्नमेंट हाऊस ज्यांनी या जागेचे विज्ञानाच्या बालेकिल्ल्यात रूपांतर केले त्या डॉ.हाफकीन यांच्या स्मरणार्थ `हाफकीन` संस्था म्हणून ओळखले जाऊ लागले.
राजभवन
“प्राइसेस मेमारियल” मध्ये अशी नोंद आहे की, मलबार पॉईंट हे गव्हर्नर मेडोस (1788-1790) यांचे अधूनमधून रहायचे ठिकाण होते. सर ईवान नेपियन (1812-1819) याठिकाणी एका लहान खोलीत राहात होते.
1880 मध्ये, सर रिचर्ड टेम्पल यांनी, परेल येथून निवासस्थान रीतसर हलविण्यास प्रारंभ केला होता. पूर्वीचे निवासस्थान व कार्यालय हे ‘मरिन व्हिला’ म्हणून ओळखण्यात येत होते. या सुंदर जागेमधून, समुद्रकिनारा व वृक्ष यांची किनार असलेल्या 44 एकरांच्या जागेवर, राजभवन विकसित करण्यात आले.
जल भूषण
गव्हर्नर मॉन्टस्टुअर्ट एलफिन्स्टन जेथे राहीले होते त्याच टुमदार बंगलीच्या पायावर जल भूषण उभे आहे. हेबर यांनी याचे वर्णन, समुद्राच्या पाण्यानी धुतली जाणारी खडकाळ व वृक्षाच्छादित भूभागावरील टुमदार बंगली असे केले आहे. लॉर्ड एलफिन्स्टन यांनी बांधलेला नागमोडी वळणाचा रस्ता हुकूमत असणारा नगर दुर्ग, म्हणजेच राज्यपालांचे निवासस्थान असणाऱ्या `जल भूषण` कडे जातो.
माँटस्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी आयात केलेले फ्रेंच फर्निचर राज्यपालांच्या भव्य कार्यालयात ठेवले आहे. कलाकारांनी दुर्मिळ कलाकुसर असलेले अतिशय सुंदर लाकडीकाम, गुंतागुंतीचे चित्रकाम असलेल्या तसबिरी आणि लाकडावर केलेले ऐतिहासिक प्रसंगाचे चित्रण यांनी जल भूषण संपन्न केले आहे.
कुंचल्याच्या कुशल फटकाऱ्याने त्यांनी लेसचा नाजुकपणा आणि मोत्यांचे तेज जिवंत केले आहे. वैभवशाली निवासस्थानात व कार्यालयात, भारतीय कलेच्या कलाकारांनी देखील आपले मानाचे स्थान मिळवले आहे. भारतीय श्रेष्ठ कलाकारांनी रेखाटलेली चित्रेही जलभूषणमध्ये आहेत.
जल चिंतन
समुद्राच्या बाजूला असलेल्या उंच कड्यावर असून त्याचे ँ जोते कड्यामध्ये घट्ट बसले आहे. एके काळी पॉईंट बंगलो या नावाने ओळखले जाणारे जल चिंतन या पायावर उभे आहे. हे राज भवनला भेट देणाऱ्या भारताच्या पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान आहे. अनधिकृतपणे ते पंडितजींचे (पंडित जवाहरलाल नेहरू यांचे) आवडीचे निवासस्थान होते.
पंडितजी व अन्य पंतप्रधान हे अंधुक समुद्रातील अंधुक प्रकाशाकडे पाहत चिंतन-मनन करीत जल चिंतनच्या सज्जावर (बाल्कनी) उभे राहिले असतील. अंधाराला छेदणारा एकमेव प्रकाश किरण प्राँगच्या लाईटहाऊस मधून येत असे त्याचे प्रकाशकिरण 35 मैलांपर्यंत पसरत असत. नाविकांसाठी, या दीपस्तंभाचे किरण म्हणजे त्यांचे मुंबईच्या उपसागरात आगमन झाल्याचे निदर्शक होते.
समुद्राच्या काळ्या कातळावर फेसाळणाऱ्या लाटा आपटताना तुम्ही अजुनही या सज्जामधून पाहू शकता कडक व खडबडीत कडा, उसळणाऱ्या समुद्राशी लढताना बघून तासनतास कसे निघून जातात, ते कळतही नाही.
जल लक्षण
हे निवासस्थान भारताच्या राष्ट्रपतींच्या भेटीसाठी राखून ठेवण्यात आले आहे. जल लक्षण येथे एक व्यक्ती कायमस्वरूपी ठेवण्यात आलेली आहे. येथे मराठा सरदारांच्या तसबिरींचा संग्रह आहे. असे म्हणतात की, सर बॅटल फ्रेरे यांनी 1857 च्या बंडांनंतर, ही चित्रांची मालिका चित्रित करण्यासाठी थीओडोर जेन्सेन यांची नेमणूक केली होती. आपल्या कुंचल्याने व तैलरंगाने, जेन्सेनने सरदारांचा असलेला बाणेदारपणा व डौल प्रत्यक्षात उतरवला आहे.
ही चित्रे गव्हर्मेंट हाऊस येथे आणण्यात आली होती. या कलाकारांना राजकीय योग्यतेने प्रोत्साहनही देण्यात आले होते. या आदरांजलीमुळे नेत्यांचा विरोध मावळेल व ब्रिटिश राज्य स्वीकारण्यास त्यांने मन वळविता येईल अशी फ्रेरेला आशा वाटत होती.
जल लक्षणला राष्ट्रपती भेटीची प्रतिक्षा असते. राष्ट्रपती, त्यांच्या प्रतिष्ठेला साजेशा अशा वातावरणामध्ये, या भव्य आदरातिथ्य कक्षांना भेटी देण्यासाठी पाहुण्यांना निमंत्रित करतात. पाहुणे येतात व सोन्याचा मुलामा दिलेल्या कोरीव फर्निचरवर बसून, राष्ट्रपतींबरोबर सहभागी होतात.
राष्ट्रपतींच्या दालनातदेखील मुघलांच्या शैलीतील लहान वस्तूंचा अमुल्य संग्रह आहे.
जल विहार
मेजवानी दिवाणखाना (बँक्वीट हॉल) आता जलविहार या नावाने ओळखला जातो. कवी मनाच्या शील्पकारागीरांनी बनविलेल्या कोरीव पडद्यांमुळे भोजनकक्षाची जागा स्वागत कक्षापासून वेगळी झाली आहे.
दोन्ही दिवाणखान्यांच्या घुमटाकार छतांवर भारताच्या अशोकास्तंभावरील सिंहाची नक्षी काढली आहे. जमिनीवर अत्यंत किंमती असे पर्शिअन गालिचे पसरलेले असून या गालिच्यावर प्राचीन भरतकामाच्या अत्यंत सुंदर शोभाकृती आहेत, ज्या मुघल काळाची आवठवण करून देतात.
राज्यपाल, प्रतिष्ठित व्यक्ती व भेट देणारे राज्याचे प्रमुख यांच्यासाठी येथे राज्यपाल मेजवान्या आयोजित करतात. चांगल्या चांगल्या प्रसंगी जेव्हा अनेकस्तर असलेल्या झुंबरांचा प्रकाश चांदीच्या तबकांमधून परावर्तित होतो तेव्हा पाहुण्यांना जल विहारमध्य जेवणाचा एक मनोवेधक अनुभव मिळतो.
जल सभागृह
जलसभागृह हे, राजभवनाचा शांत व प्रसन्नचित्त असा दरबार हॉल आहे. क्षितिज समांतर असलेल्या फ्रेंच पद्धतीच्या खिडक्यांमधून आत येणारी उगवत्या सुर्याची किरणे येथे चकाकत असतात.
शपथविधीसारखे महत्त्वाचे कार्यक्रम या जलसभागृहामध्ये होतात. या भव्य सभागृहाचा वापर राज्यपाल साहित्यिक व कलाकार यांचा गौरव करण्यासाठीदेखील करतात.
प्राप्त झालेला वारसा
राजभवनाचा परिसर समुद्रकिनाऱ्यापासून जमिनीपर्यंतच्या उंचसखल जागेवर पसरलेला आहे. एकोणपन्नास एकरावर घुमटाकार जंगल कडा, समुद्र व वाळू आहे. राजभवन हे इतिहासाची अभिव्यक्ती असून महाराष्ट्राचा व भारताचा अभिमानास्पद वारसा आहे.
ब्रिटिश कालीन भुयार
सन २०१६ साली मलबार हिल येथील महाराष्ट्र राजभवन, मुंबई येथे ब्रिटिशकालीन भूमिगत बंकरचा शोध लागला.
हे ब्रिटिशकालीन बंकर पहिल्या महायुद्धाच्या काही काळापूर्वी बांधले गेले होते जेव्हा राजभवन हे मुंबई राज्याचे ‘गव्हर्नमेंट हाऊस’ होते.
सुमारे सहा दशके बंद असलेले १५० मीटर लांब, भूमिगत ब्रिटिशकालीन बंकर दिनांक १६ ऑगस्ट २०१६ रोजी तत्कालीन राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांच्या प्रयत्नांमुळे प्रकाशात आले.
हे भुयार उघडल्यावर त्यामध्ये ‘शेल स्टोअर’, गन शेल, काडतूस स्टोअर, शेल लिफ्ट, पंप, सेंट्रल आर्टिलरी स्टोअर, वर्कशॉप इत्यादी नावांच्या विविध खोल्या आढळल्या. या भूमिगत बंकरच्या सुरुवातीला २० फूट उंच किल्ल्यासारखा भाग आहे आणि त्याला जोडून एक उतार (रॅम्प ) आहे. हे बंकर दरबार हॉलच्या अगदी समोर उघडते. किल्ल्यासारखा भाग पार केला की एक लांबच लांब मार्गिका आहे आणि तिच्या बाजूला विभिन्न आकाराच्या १३ खोल्या आहेत. हा नागरी वास्तुकलेचा एक अनोखा नमुना आहे आणि कदाचित भारतात अन्यत्र कुठेही नसेल. बंकरचे बांधकाम अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्यामुळे कमजोर झाले होते. त्यामुळे त्याचे आयआयटी मुंबईच्या मदतीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले .
त्यानंतर बंकरच्या स्ट्रक्चरचे मजबुतीकरण करण्यात आले. मजबुतीकरणाच्या कामात वॉटरप्रूफिंग, विद्युतीकरण, वातानुकूलित आणि संबंधित कामांचा समावेश होता.
क्रांती गाथा : भारतीय क्रांतिकारकांचे दालन
राजभवन येथील ब्रिटीशकालीन बंकरचा भारतीय क्रांतिकारकांचे दालन म्हणून पुनर्जन्म झाला आहे. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी १४ जून २०२२ रोजी ‘क्रांती गाथा’ या भारतीय क्रांतिकारकांच्या दालनाचे उद्घाटन केले.
या दालनामध्ये विविध भित्तीचित्रे, प्रतिमा आणि ज्ञात आणि गायब झालेल्या क्रांतिकारकांचे अर्धपुतळे ठेवण्यात आले आहेत. इतिहासकार आणि लेखक डॉ विक्रम संपत यांच्या मार्गदर्शनाखाली हे दालन तयार करण्यात आले आहे.
या दालनात १८५७ साली झालेल्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धापासून ते १९४६ साली मुंबईतील नौदल विद्रोहापर्यंत सहभाग घेतलेल्या महाराष्ट्रातील अनेक क्रांतिकारकांच्या आठवणी जागविण्यात आल्या आहेत. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व क्रांतीकारकांना या दालनाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले आहे. त्यामध्ये विशेषतः वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, बाळ गंगाधर टिळक, विनायक दामोदर सावरकर, बाबाराव सावरकर, अनंत लक्ष्मण कान्हेरे, मॅडम भिकाजी कामा, भारतातील पहिली संघटित गुप्त संघटना – अभिनव भारत, गणेश विष्णू पिंगळे, वासुदेव बळवंत गोगटे, शिवराम राजगुरू आणि अनेक क्रांतिकारकांचा समावेश आहे.
या दालनात अभ्यागतांना प्रदर्शन, शिल्पे आणि दुर्मिळ अभिलेखीय छायाचित्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रात (तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सी) ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या सशस्त्र संघर्षाच्या या संपूर्ण कथेचे दर्शन करण्यात आले आहे. या दालनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दृश्य देखील समाविष्ट करण्यात आले आहे.
यंदा देश स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. या वर्षाचे औचित्य साधून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या दालनाचे लोकार्पण करण्यात आले.