बंद

    राज्यपालांचे प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त भाषण

    प्रकाशित तारीख: January 26, 2019

    महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री. चे विद्यासागर राव यांनी, भारताच्या 69 व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या प्रसंगी शनिवार दिनांक 26 जानेवारी, 2019 रोजी, सकाळी 9 वाजता, शिवाजी पार्क, मुंबई येथे करावयाचे भाषण :

    बंधू आणि भगिनींनो,

    1. आपल्या देशाच्या 69 व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनाच्या या आनंदमय प्रसंगी महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.

    2. प्रारंभी, आपल्या संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो. मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम सुरू असून अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक निर्माण करण्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे हे आपणाला सांगण्यास मला आनंद होत आहे.

    3. भारतात होणाऱ्या एकूण विदेशी थेट गुंतवणुकीपैकी 30 टक्के इतकी गुंतवणूक महाराष्ट्राला मिळाली आहे. या वर्षी राज्याला 13.5 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी विदेशी थेट गुंतवणूक मिळाली आहे. 2025 वर्षापर्यंत महाराष्ट्र हे पहिले ट्रिलिअन डॉलरची अर्थव्यवस्था असणारे राज्य बनेल, याची मला खात्री आहे. शासन, राज्यातील उद्योग व्यवसाय सुलभीकरण यामध्ये आणखी सुधारणा करण्यासदेखील कटिबद्ध आहे.

    बंधू आणि भगिनींनो,

    4. माझे शासन, 2022 वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास कटिबद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सुमारे 41 लाख इतक्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना हवामानाशी संबंधित माहिती तत्काळ पुरविण्याच्या हेतूने, राज्यातील सर्व 2,060 इतक्या महसूल मंडलांमध्ये महावेध प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

    शासनाने, उपग्रहाच्या व ड्रोनच्या सहाय्याने शेतीविषयक समस्या सोडविण्यासाठी “महाॲग्रीटेक” हा उपक्रम सुरू केला आहे.

    5. “प्रधानमंत्री पीक विमा योजना” आणि “पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना” राबविण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 52 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 2700 कोटी रुपये इतकी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 565 कोटी रुपये इतकी नुकसानभरपाई देण्यात आली आहे. जागतिक मृदा दिनाच्या प्रसंगी म्हणजेच 5 डिसेंबर रोजी, या एका दिवसात शासनाने शेतकऱ्यांना 5.50 लाखांहून अधिक मृदा आरोग्य पत्रिकांचे वाटप केले आहे. आतापर्यंत, 77 लाखांहून अधिक मृदा आरोग्य पत्रिका देण्यात आल्या आहेत.

    6. महाराष्ट्राची वेगाने प्रगती साध्य करण्याच्या हेतूने, विशेष उपाययोजना कार्यक्रम-2018 अंतर्गत 22,122 कोटी रुपये इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 89 सिंचन प्रकल्पांवर 13,422 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

    7. “जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत”, राज्यातील 15000 हून अधिक गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. यात 5 लाखांहून अधिक कामे पूर्ण करण्यात आली असून त्याद्वारे 24.36 लाख टीसीएम इतकी पाणी साठवण क्षमता निर्माण होत आहे.

    8. “गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार” या योजनेअंतर्गत, 5,270 जलाशयांमधून 3.23 कोटी घनमीटर इतका गाळ काढण्यात आला असून 31,150 शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे.

    9. 10 सर्वोत्तम अभिनव उपक्रमांपैकी एक उपक्रम म्हणून माझ्या शासनाच्या “मागेल त्याला शेततळे” या योजनेला प्रधानमंत्री पुरस्कार मिळाला आहे. या योजनेअंतर्गत सुमारे 1.37 लाख इतकी शेततळी बांधण्यात आली आहेत हे सांगण्यास मला आनंद होत आहे.

    10. आम्ही सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विधेयक संमत केले आहे हे सांगताना मला आनंद होत आहे. या अधिनियमान्वये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील नागरिकांना, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण आणि सरकारी सेवेतील पदांवरील नियुक्त्यांकरिता आरक्षण देण्यात येईल. त्यामुळे मराठा समाजातील युवकांना शिक्षण व नोकऱ्यांद्वारे आपली प्रगती साध्य करण्यास निश्चितपणे मदत होणार आहे.

    11. राज्य शासनाने, ग्रामीण भागातील बालकांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन केले आहे. पहिल्या टप्प्यात, 13 शाळा या, “भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा” या नावाने सुरू झाल्या आहेत.

    12. आदिवासी भागातील कुपोषणाच्या आणि पंडुरोगाच्या समस्येवर मात करण्यासाठी “डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना” राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 1.59 लाख इतक्या गरोदर महिलांना व स्तनदा मातांना लाभ देण्यात येत आहे.

    13. “2022 पर्यंत सर्वांना परवडणारी घरे” देण्याचे ध्येय गाठण्याच्या हेतूने, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 10.50 लाखांहून अधिक लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून 3 लाख घरे पूर्ण करण्यात आली आहेत.

    14. पुणे येथे “खेलो इंडिया युथ गेम्स” चे यजमान पद स्वीकारून, 85 सुवर्ण, 62 रजत व 81 कांस्य अशी एकूण 228 पदके मिळवून महाराष्ट्र राज्य विजेता म्हणून उदयास आले आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतो.

    15. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे 2.27 कोटी इतक्या कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी, सामाजिक-आर्थिक जातनिहाय जनगणना आधारसामग्रीच्या आधारे निवडलेल्या 83 लाख इतक्या अतिवंचित कुटुंबांना आयुष्यमान भारत योजनेचाही लाभ देण्यात येत आहे.

    16. जनतेला सुरक्षित सायबर सेवा मिळावी, यासाठी राज्यात 44 सायबर प्रयोगशाळा व पोलीस ठाण्यांमार्फत एक सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

    17. सार्वजनिक वाहतूक सेवा जलद व आरामदायी होण्यासाठी, राज्यात विविध ठिकाणी सुमारे 55 उड्डाणपुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. मुंबई, नागपूर आणि पुणे येथे सुमारे 350 किलोमीटर इतक्या लांबीचे मेट्रो रेल्वेमार्गाचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक दिवशी 11.1 दशलक्ष इतक्या प्रवाशांना सेवा मिळणार आहे. अॅन्युटी मॉडेलअंतर्गत 10,500 किलोमीटर इतक्या लांबीच्या रस्त्यांच्या नूतनीकरणास मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 8,000 किलोमीटर इतक्या लांबीच्या रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याशिवाय, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सुमारे 30,000 किलोमीटर इतक्या लांबीच्या ग्रामीण रस्त्यांचा दर्जावाढ करण्यात येत आहे. त्याद्वारे जवळजवळ 6,000 किलोमीटर इतक्या ग्रामीण रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामास प्रारंभ झाला आहे. याशिवाय राज्यात आणखी 10 विमानतळे उभारण्याचे काम सुरू झाले आहे. शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ यापूर्वीच पूर्णपणे सुरु झाले आहे.

    18. राज्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात येत असून, त्या कार्यक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणातील लोकसहभागातून 50 कोटी इतक्या वृक्षाची लागवड करण्यात येत आहे.

    19. श्री. पु. ल. देशपांडे, श्री. ग. दि. माडगूळकर आणि श्री. सुधीर फडके या, महाराष्ट्राच्या अत्यंत प्रतिभाशाली सुपुत्रांच्या जन्मशताब्दी महोत्सवाचा एक भाग म्हणून माझे शासन विविध कार्यक्रम आयोजित करीत आहे.

    20. ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षण, 2018 अंतर्गत, सातारा, नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांनी देशातील 10 स्वच्छ जिल्ह्यांमध्ये विशेष स्थान प्राप्त केले आहे. राज्यातील सुमारे 34 जिल्हे, 351 तालुके आणि 27,667 ग्रामपंचायतींना हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहे. “स्वच्छ भारत अभियाना” अंतर्गत आपल्या राज्याला पाच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे, याचा मला आनंद आहे.

    21. आजच्या या प्रजासत्ताक दिनी, एक बलशाली, प्रगतीशील व सर्वसमावेशक असा नवीन महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण एकत्रित येऊ या.

    जय हिंद ! जय महाराष्ट्र !!