बंद

    राज्यपालांचे अभिभाषण

    प्रकाशित तारीख: December 1, 2019

    सभापती महोदय, अध्यक्ष महाराज आणि सन्माननीय सदस्यहो,
    14 व्या राज्य विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतरच्या राज्य विधानमंडळाच्या या पहिल्या अधिवेशनामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. राज्य विधानसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे व त्यांच्या मंत्रिपरिषदेचे मी हार्दिक अभिनंदन करतो.
    माझे शासन, संविधानात अंतर्भूत असलेल्या सर्व मूल्यांचे समर्थन करील. माझे शासन, महाराष्ट्रातील सर्व विभागांना आणि समाजातील सर्व सामाजिक घटकांना न्याय देण्यासाठी कटिबध्द राहील.
    माझे शासन, राज्यातील जनतेची सेवा करताना, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि इतर अनेक महान नेते व समाजसुधारक यांच्या उच्च आदर्शांचे सदैव पालन करील.

    माझे शासन, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहते. त्यांच्या विचारांचा व आदर्शांचा नव्या पिढीला परिचय करुन देण्यासाठी, राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
    माझे शासन, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेच्या संबंधात राज्याने दावा केलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक जनतेच्या घटनात्मक हक्कांचे व विशेषाधिकारांचे संरक्षण करण्याच्या आपल्या बांधिलकीचा पुनरुच्चार करीत आहे. माझे शासन, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करेल.
    माझ्या शासनाला, नागरी व ग्रामीण क्षेत्रातील हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या आव्हानांची जाणीव असून माझे शासन हवामान बदलांच्या घातक परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी सुधारात्मक उपाययोजनांची सक्रियपणे अंमलबजावणी करील. नुकत्याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेल्या महापुरामुळे राज्याला फार मोठे नुकसान सोसावे लागले आहे आणि त्याचवेळी राज्याच्या बहुतांश भागाला दुष्काळाला सामोरे जावे लागले. अलिकडे पाऊस लहरी, अधून मधून आणि आकस्मिक अतिवृष्टी अशा स्वरूपात पडत आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये आपल्याकडे प्रचंड अवकाळी पाऊस झाल्यामुळे, 34 जिल्ह्यांच्या 349 तालुक्यांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ सहाय्य देण्यासाठी माझे शासन वचनबध्द आहे.
    माझ्या शासनास, तात्काळ लक्ष देण्याची गरज असलेल्या कृषिविषयक संकटाची व शेतकऱ्यांच्या आपत्तीची जाणीव आहे. माझे शासन, शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्त व चिंतामुक्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करील.
    माझ्या शासनाला, ग्रामीण पत क्षेत्राची दुरावस्था दूर करण्याची गरज असल्याची जाणीव असून माझे शासन, पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळण्याकरिता योग्य ती पावले उचलील.
    शेतमालाच्या भावामधील चढउतारांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आपत्ती सहन करावी लागते. शेतकऱ्यांच्या आपत्तीचे निवारण करण्यासाठी शेतमालाला योग्य भाव मिळण्याच्या दृष्टीने माझे शासन यथोचित उपाययोजना हाती घेईल.
    माझे शासन, राज्यातील आणि विशेषत: मराठवाड्यातील व विदर्भातील दुष्काळग्रस्त क्षेत्रांमध्ये शाश्वत पाणी पुरवठा यंत्रणा उभारण्यासाठी उपाययोजना हाती घेईल.
    या शासनाला, वाढत्या बेरोजगारीची व परिणामी युवकांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेची चिंता आहे. माझे शासन, रोजगार निर्माण करण्यासाठी आणि तसेच सार्वजनिक सेवा जलद गतीने पुरविण्यासाठी, राज्य शासनातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करील.
    वाढती बेरोजगारी ही शासनाची प्रमुख चिंता असून खाजगी क्षेत्रांमधील रोजगारांमध्ये भूमिपुत्रांसाठी 80 टक्के आरक्षण ठेवण्यासाठी आम्ही कायदा करणार आहोत.
    युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांना कौशल्य शिक्षण देण्याची गरज असल्याची जाणीव माझ्या शासनाला असून सुशिक्षित बेरोजगार युवकांना अधिछात्रवृत्ती देण्यासाठी माझे शासन प्रयत्न करील.
    प्रगतीशील समाज हा महिलांना समान संधी देतो. महिलांची सुरक्षा माझ्या शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल आणि यासाठी माझे शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना हाती घेईल.
    शिक्षण महागडे झाल्यामुळे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेले आहे. माझे शासन, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना महाविद्यालयीन व उच्च शिक्षण मोफत देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करील.
    नोकरी करणाऱ्या महिलांना सुरक्षित निवासव्यवस्था पुरवल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. माझे शासन, नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांमध्ये आणि प्रमुख शहरांमध्ये कालबध्द रितीने नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे बांधण्याचा प्रयत्न करील.
    माझे शासन, आरोग्य व पोषणआहार क्षेत्रांतील अंगणवाडी सेविकांच्या व आशा कार्यकर्त्यांच्या कामाची प्रशंसा करते. माझे शासन अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्या यांच्या सेवासुविधांमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करील.
    राज्यामध्ये महिलांव्दारे चालवण्यात येणारे आठ लाख स्वयं सहायता (बचत) गट असून माझे शासन, महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच कौशल्य विकास कार्यक्रमांव्दारे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेले कौशल्य देऊन स्वयं-सहायता (बचत) गटांचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न करील. माझे शासन महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासकीय खरेदी प्रक्रियेमध्ये प्राधान्य देऊ इच्छिते.
    शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा झाल्याशिवाय लोकसंख्याशास्त्रीय लाभ मिळू शकत नसल्याने, माझे शासन, राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्व उपाययोजना हाती घेईल.
    माझे शासन, आरोग्य, शिक्षण व उपजीविका क्षेत्रांवर अधिक भर देण्यासाठी तालुका स्तरावर मानव विकास निर्देशांक विकसित करणार असून, त्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत तुलनात्मकदृष्ट्या मागास गटांना विशेष निधी पुरविण्यात येईल.
    माझे शासन, नगरपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिका क्षेत्रांमधील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी स्वतंत्र वित्तीय तरतूद करील. नागरी क्षेत्रांमधील रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी माझे शासन, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर एक नवीन योजना राबवील.
    झोपडपट्टी धारकांच्या प्रलंबित समस्या ही राज्याची एक महत्त्वाची चिंता असून माझे शासन, मुंबई व उर्वरित महाराष्ट्रातील शहरांमध्ये पात्र झोपडपट्टी धारकांना झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत निवारा पुरविण्यासाठी जलदपणे कार्यवाही करील.
    माझे शासन, मुंबई व राज्यातील अन्य शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध आहे. माझे शासन नागरी सुविधांचे बळकटीकरण करील.

    माझ्या शासनाने, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची, इतर योजना व पायाभूत प्रकल्पांशी सांगड घालून सर्वोत्तम सोयीसुविधा व पायाभूत सुविधा पुरविण्याचे योजिले आहे.
    महागड्या रोगनिदान चाचण्या सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर असून माझे शासन, रोगनिदान चाचण्या करण्याकरिता तालुका स्तरावर “एक रूपया क्लिनिक” ही योजना सुरु करील.
    सर्वांसाठी परवडण्यायोग्य आरोग्य विशेषोपचार पुरविण्यासाठी माझे शासन, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने अतिविशेषोपचार रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करील.
    विविध आरोग्य विमा योजनांचे एकत्रीकरण करण्याची व सुटसुटीत करण्याची गरज ओळखून माझे शासन, राज्यातील सर्व नागरिकांकरिता आरोग्य विमा छत्र पुरविण्यासाठी विविध आरोग्य विमा कार्यक्रमांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करील.
    राज्यामध्ये नवीन उद्योग व गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, माझे शासन, शक्य त्या सर्व आर्थिक व आर्थिकेतर सवलती देईल. उद्योग स्थापन करण्यासाठी परवानगी देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येईल.
    दैनंदिन कार्यक्रमांचे वाढते अंकेक्षण (डिजिटायझेशन) हे माहिती तंत्रज्ञान उद्योगासाठी व्यापक संधी उपलब्ध करून देते. माझ्या राज्यात माहिती तंत्रज्ञानात प्रशिक्षण घेतलेले सुशिक्षित बेरोजगार युवक मोठ्या प्रमाणात आहेत. माझे शासन, स्थानिक सुशिक्षित युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरिता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामधील गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी नवे धोरण तयार करील.
    राज्यातील सर्व पोलीस ठाणी, राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार नोंदणी पोर्टलशी जोडण्यात येतील. या पोर्टलद्वारे सायबर गुन्ह्यांशी संबंधित सर्व तक्रारी संबंधित पोलीस आयुक्तांकडे आणि जिल्हास्तरीय पोलीस ठाण्यांकडे आपोआप वर्ग होतील.
    सायबर गुन्हे अन्वेषणामधील पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने, आगामी वर्षात, पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच, नागरिक जनजागृती कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतील.
    माझे शासन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जाती, धनगर, इतर मागासवर्ग, बलुतेदार, इत्यादींच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष देईल व ते सोडवील. वंचित समाजासाठी अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य व रोजगार या मूलभूत गरजांची पूर्तता करणे हे आमचे ध्येय आहे.
    महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित असलेले संरक्षित गडकिल्ले, राज्यातील जनतेशी उच्च सांस्कृतिक, पारंपरिक व भावनिक संबंध दृढ करतात. राज्यातील गडकिल्यांसारख्या पारंपरिक पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणात सामाजिक-सांस्कृतिक महत्त्व असल्याने, माझे शासन, गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धन करील.
    मराठी भाषेची अभिवृध्दी व प्रचार करण्याच्या दृष्टीने, माझ्या शासनाने, मुंबई येथे मराठी भाषा भवन मुख्य केंद्र व ऐरोली, नवी मुंबई येथे मराठी भाषा उपकेंद्र स्थापन करण्याचे ठरविले आहे.
    महान लेखक, गायक, संगीतकार, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगुळकर व सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी, माझ्या शासनाने 2019-20 या वर्षी गायन, लेखन, अभिनय, एकपात्री विनोदी स्पर्धा, इत्यादी बाबतच्या कार्यशाळांसह विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले आहे.
    ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा मौल्यवान ठेवा असून, त्यांचे आरोग्य व सुरक्षा ही राज्याची प्रमुख जबाबदारी असल्याने माझे शासन, ज्येष्ठ नागरिकांचे सामाजिक सुरक्षा जाळे वाढविण्यासाठी उपाययोजना करील.
    औषधिद्रव्ये व अन्नपदार्थ यांमधील भेसळ ही प्रमुख चिंता असल्याने, कडक कारवाई करून तिचे निवारण करण्यात येईल. माझे शासन, अन्न व औषधिद्रव्ये विनियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करील.

    माझे शासन, नागरिकांना ताजे व सकस जेवण मिळण्याकरिता दहा रूपये इतक्या वाजवी दरात जेवणाची थाळी पुरविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करील.
    प्लास्टिक, थर्माकोल व प्लास्टिक पिशव्यांचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम सुपरिचित आहेत. यामुळे नागरी क्षेत्रांमध्ये पूर येतात, कृषी-पारिस्थितीकी प्रणालीचे नुकसान होते, सागरी जीवसृष्टीवर परिणाम होतो, प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी स्थानिक प्राधिकरणांवरील आर्थिक बोजा वाढतो आणि जैवविविधतेवर प्रतिकूल परिणाम होतो. हा दुष्परिणाम कमी करण्यासाठी माझ्या शासनाने, एकदाच वापरले जाणारे प्लास्टिकच्या व थर्माकोलच्या वस्तू, प्लास्टिक व न विणलेल्या पिशव्यांवर राज्यभरात बंदी घातली आहे. माझे शासन, या बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करील.
    माझे शासन, समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण, किनारपट्टी क्षेत्रातील समाजांचे जीवनमान उंचावणे आणि राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी एकात्मिक किनारी प्रक्षेत्र व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी करील.
    पारंपारिक मच्छिमारांना न्याय देण्यासाठी माझे शासन, किनारपट्टीतील अवैज्ञानिक व अशाश्वत मच्छीमारी करणाऱ्यावर कडक कारवाई करील.
    माझे शासन, राज्याची सध्याची आर्थिक स्थिती दर्शविणारा वस्तुस्थितीदर्शक अहवाल जनतेसमोर मांडेल. तसेच, माझे शासन, राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी व आर्थिक शिस्त आणण्यासाठी वचनबद्ध आहे.
    सन्माननीय सदस्यहो, माझे शासन, राज्यातील जनतेला स्वच्छ, पारदर्शक, जबाबदार व निर्णयाभिमुख प्रशासन देईल. या प्रयत्नात, दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य, शासनाला आपले संपूर्ण सहकार्य व पाठिंबा देतील आणि मार्गदर्शन करतील याची मला खात्री आहे.
    पुन्हा एकदा, आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.

    जय हिंद ! जय महाराष्ट्र !