बंद

    राजभवनातील परिसराची राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून पाहणी

    प्रकाशित तारीख: December 28, 2018

    महान्यूज

    राजभवनातील परिसराची राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडून पाहणी

    मुंबई, दि.28 : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राजभवन परिसराची आज पाहणी केली.

    राज्यपाल यांचे सचिव वेणूगोपाल रेड्डी यांनी यावेळी राजभवन परिसराची माहिती दिली. यावेळी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, श्रीमती सविता कोविंद, श्रीमती विनोदा राव, श्रीमती अमृता फडणवीस उपस्थित होते.

    राजभवन येथे पूर्वी 3200 चौरस मीटर लॉन होते, ते आता 5600 चौरस मीटर केले आहे, या अतिभव्य व सुंदर लॉनची पाहणी मान्यवरांनी केली. राजभवनच्या संरक्षणासाठी नव्याने उभारलेल्या सात ते आठ फूट उंचीच्या भराव्याची माहितीही मान्यवरांनी घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती श्री. कोविंद यांना समुद्रात होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाच्या स्थळाची माहिती दिली. यावर राष्ट्रपतींनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

    राष्ट्रपती श्री. कोविंद यांनी राजभवनात सापडलेल्या ब्रिटिशकालीन बंकरची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी त्यांनी बंकर संवर्धन करण्याविषयी मोलाच्या सूचना दिल्या.

    मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बंकर संवर्धन व कोस्टल रोडबाबत राज्य शासन करीत असलेल्या कामांची माहिती दिली.

    राज्यपाल श्री. राव यांनी राजभवनात नव्याने बांधण्यात येणाऱ्या दरबार हॉलबाबत माहिती दिली. या हॉलची आसन क्षमता ९०० आसनांची असून नवा दरबार हॉल तसेच राज्यपाल सचिवालयाची इमारत जानेवारी २०२० पर्यंत बांधून पूर्ण होणार असल्याचेही राज्यपालांनी सांगितले.