श्री. सी. सुब्रमण्यम् (05.02.1990 – 09.01.1993)
श्री.सी.सुब्रमण्यम् यांनी १५ फेब्रुवारी १९९० रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल पद ग्रहण केले. ज्येष्ठ मुत्सद्दी, प्रशासक, तत्वज्ञानी, वक्ता व लेखक असलेले श्री.सी.सुब्रमण्यम् हे प्रथमत: स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडणारे निष्ठावान देशभक्त आहेत आणि त्यानंतर राष्ट्राचा विकास व त्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले.
देशाच्या विकासाची आर्थिक व सामाजिक अशी काही मोजकीच क्षेत्रे आहेत ज्यांच्याशी स्वातंत्र्याच्या मागील चार दशकांमध्ये त्यांचा संबंध आला नाही किंवा त्यांनी आपला चिरस्थायी ठसा उमटवलेला नाही. श्री.सी.सुब्रमण्यम् यांनी १९७२ मध्ये राबविलेल्या गव्हाचे विक्रमी उत्पादन करणाऱ्या कार्यक्रमाच्या यशस्वितेनंतर, ते भारताच्या आधुनिक कृषि विकास धोरणाचे शिल्पकार म्हणून सुपरिचित झाले. त्यांच्या या कामगिरीला `हरितक्रांती` असे योग्य नाव देण्यात आले आहे. श्री.सी.सुब्रमण्यम् यांच्या कामगिरीबाबत नोबेल पुरस्कार विजेते डॉ.नॉर्मन ई. बोलॉर्ग लिहितात: “कृषिविषयक बदल घडविण्यामध्ये आणि तत्संबंधी राजकीय निर्णय घेण्यामध्ये नवीन दृष्टिकोन परिणामक करण्यास भाग पाडणारी श्री.सुब्रमण्यम् यांची दृष्टी व प्रभाव यत्किंचितही कमी महत्त्वाचा लेखता कामा नये.” (गव्हाच्या उत्पादनातील) या प्रगतीचा पाया श्री.सुब्रमण्यम् हे, बदल घडविणाऱ्या राजकीय दलाला मार्गदर्शन करीत होते, त्या कालावधीतच (१९६४-६७) भक्कमपणे रचण्यात आला होता. श्री.सुब्रमण्यम् हे संस्था उभारणारे शिल्पकार आहेत.त्यांच्या प्रोत्साहनातून व पाठिंब्यामुळे सुरू झालेल्या गणितीय विज्ञान संस्था आणि मद्रास विकासविषयक अभ्यास संस्था त्यांच्या ऋणी आहेत.
श्री.सुब्रमण्यम् यांचा जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा नावलौकिक आहे तो त्यांच्याबरोबरच्या काही थोड्याच देशबांधवांना मिळाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आणि एफएक्यू व युनेस्को या संघटनांबरोबर त्यांचे जवळचे संबंध होते.
सक्रिय राजकीय जीवनातून निवृत्ती घेतल्यापासून म्हणजे जवळपास एक दशकापासून, श्री.सुब्रमण्यम् यांचेे भारतीय विद्याभवन या भारताच्या प्रमुख सांस्कृतिक संघटनेशी घनिष्ट संबंध राहिलेले आहे. सध्या ते तिचे अध्यक्ष व भवन आंतरराष्ट्रीय याचे प्रमुख आहेत.
श्री.सुब्रमण्यम् यांनी स्वच्छ सार्वजनिक जीवन मूल्याचा अथक पुरस्कार केलेला आहे निवडणूक विषयक सुधारणा, पक्ष यंत्रणा व नोकरशाही यांसह विविध विषयांवर त्यांनी अनेक व्याख्याने दिलेली आहेत.
श्री. सुब्रमण्यम् मानवतावादी, विस्तृत विद्वताधारक आणि सुसंस्कृत व्यक्ती आहे.
श्री.सुब्रमण्यम् यांच्या जीवनाचा व कार्याचा परिचयपट खाली दिला आहे:
तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्हयातील पोल्लाची येथे ३० जानेवारी, १९१० रोजी जन्मलेल्या श्री.सी.सुब्रमण्यम् यांनी आपले प्राथमिक शिक्षण पोल्लाची येथे आणि उच्च शिक्षण मद्रास येथे घेतले. त्यांनी १९३२ मध्ये मद्रास विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादन केली, परंतु १९३६ मध्ये कोईम्बतूर येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला. तेव्हा ते स्वातंत्र्यसंग्रामामध्ये पूर्णपणे सक्रिय झाले होते. त्यामुळे ज्यावर्षी त्यांना कायद्याची पदवी मिळाली त्याच वर्षी त्याना कारावास भोगावा लागला होता. राजकारणातील त्यांची आवड वाढतच गेली आणि १९४१ मध्ये व १९४२ मधील “छोडो भारत” चळवळीमध्ये त्यांना पुन्हा कारागृहात टाकण्यात आले. ते कोईम्बतूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले आणि राज्य काँग्रेस समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य झाले. ते १९४६ मध्ये भारताच्या घटना समितीचे (कॉन्स्टिट्यूएन्ट असेम्ब्ली ) निर्वाचित सदस्य होते आणि १९५२ पर्यंत हंगामी संसदेचे सदस्य होते.
१९५२ मध्ये श्री.सुब्रमण्यम् हे मद्रास राज्य विधानसभेच्या (आताचे तामिळनाडू) जागेसाठी निवडणूक लढवून त्यात ते जिंकून आले व राज्यमंत्रिमंडळाचे सदस्य झाले. त्यांनी १९५२ ते ६२ या दहा वर्षाच्या काळाकरिता मद्रास विधानसभेचा सभागृह नेता म्हणून काम केले. राज्यात एकाच वेळी वित्त, शिक्षण व विधि ही महत्त्वाची खाती सांभाळत असताना त्यांनी सलग दहा वर्षे हेच स्थान टिकवून ठेवले. त्यांच्या या महत्त्वाच्या खात्यांच्या धुरीणत्वाचे फलित म्हणजे या राज्याची शाश्वत शैक्षणिक प्रगती आणि सर्वांगीण विकास होय. सर्व बालकांना मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करणाऱ्या प्रारंभीच्या काही मोजक्याच राज्यांपैकी तामिळनाडू एक ठरले.
श्री.सुब्रमण्यम् हे शाळेत जाणाऱ्या गरीब मुलांकरिता मध्यान्हभोजन कार्यक्रम सुरू करण्यास देखील कारणीभूत ठरले. हा कार्यक्रम अंशत: शासकीय अंशदान आणि अंशत: ग्रामपातळीवरील स्थानिक संसाधनांचे उपयोजन करून व त्यायोगे लोकांचा सहभाग या माध्यमातून राबविण्यात आला होता.
१९६२ मध्ये श्री.सुब्रमण्यम् हे लोकसभेचे (राष्ट्रीय संसद) सदस्य झाले व पोलाद प्रभारी (१९६२-६३) पोलाद, खान व अवजड अभियांत्रिकी (१९६३-६४), अन्न व कृषि (१९६४-६६), अन्न व कृषि सामूहिक विकास व सहकार (१९६६-६७) या खात्याचे कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले. त्यांच्या पोलाद व अवजड उद्योग या खात्यांच्या प्रभारी मंत्रिपदाच्या काळात, सुरू असलेल्या औद्योगिक युनिटांच्या कामामध्ये सुधारणा करण्यासाठीच नव्हे तर, नवीन युनिटे सुरू करण्यासाठी देखील अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या. अन्न व कृषि मंत्री म्हणून श्री.सुब्रमण्यम् यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या बी-बियाणांच्या वापरास आणि खतांच्या अधिक व्यापक वापरास सुरुवात करण्यामध्ये निर्णायक भूमिका बजावली. परिणामी साठच्या दशकाच्या उत्तरार्धात धान्य उत्पादनात वाढ झाली व देश अन्नधान्यामध्ये स्वंयपूर्ण झाला.
१९६७-६८ मध्ये श्री.सुब्रमण्यम् हे, भारत सरकाने स्थापन केलेल्या विमानविद्या उद्योग समितीचे अध्यक्ष होते. जुलै-डिसेंबर, १९६९ च्या खडतर दिवसांमध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष झाले. श्री.सुब्रमण्यम् यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकारी समितीचा आणि पक्षाच्या मध्यवर्ती संसदीय मंडळाचा सदस्य म्हणून कार्य पुढे चालू ठेवले.
ऑगस्ट १९७० मध्ये, श्री.सुब्रमण्यम् राष्ट्रीय कृषि आयोगाचे अध्यक्ष झाले. कृषि विकास धोरणांमधील व कार्यक्रमांमधील समस्या सोडविण्यामधील त्यांचे कार्य व रूची विचारात घेऊन, श्री.सुब्रमण्यम् हे त्यांच्या स्वत:च्या ताकदीवर आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था, मनिला आणि आंतरराष्ट्रीय मका व गहू संशोधन संस्था, मेस्किको यांच्या नियामक मंडळावर निवडून आले होते. ही पदे त्यांनी सहा वर्षे सांभाळली.
मार्च 1971 मध्ये निवडणुका झाल्यानंतर, श्री.सुब्रमण्यम् यांना नियोजन मंत्री म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आणि राष्ट्रीय नियोजन आयोगाचा उपाध्यक्ष म्हणून देखील रूजू होण्याकरिता बोलाविण्यात आले. त्यांच्याकडे त्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा प्रभार देखील सोपविण्यात आला होता.
ऑगस्ट १९७१ मध्ये तामिळनाडूमध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये जिंकून श्री.सुब्रमण्यम् निवडून आले होते. या निवडणुकीमध्ये सुमारे ९० टक्के मतदारांनी मतदान केले होते.
जुलै १९७२ मध्ये, श्री.सुब्रमण्यम् यांनी औद्योगिक विकास मंत्री म्हणून अधिकार सूत्रे हाती घेतली व नियोजन खाते सोडून दिले, परंतु विज्ञान व तंत्रज्ञान खाते त्यांच्याकडेच होते. जुलै १९७२ पासून त्यांच्याकडे कृषिमंत्री या पदाचा प्रभारही देण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर १९७४ पासून मार्च १९७७ पर्यंत ते अर्थ मंत्री होते. मार्च १९७७ मध्ये ते पालानी मतदार संघातून प्रचंड बहुमताने लोकसभेवर निवडून आले. जुलै १९७९ ते जानेवारी १९८० या काळात श्री.सुब्रमण्यम् हे संरक्षण खात्याचे प्रभारी कॅबिनेट मंत्री झाले.
श्री.सुब्रमण्यम् यांनी विकसनशील राष्ट्रांमधील मुलांच्या पोषणविषयक दर्जा-सुधारणेमध्ये दीर्घकालीन बांधिलकी जोपासली आहे. सप्टेंबर १९६९ मध्ये संयुक्त राष्ट्र महासचिवांच्या आमंत्रणावरून श्री. सुब्रमण्यम् यांनी विकसनशील देशांमध्ये पोषणदृष्ट्या उपासमारीचा मुकाबला करण्यासंदर्भात धोरणात्मक निवेदन तयार केले आणि मे १९७१ मध्ये तज्ञ मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. महासभेने कार्यवाही करण्याकरिता या मंडळाने शिफारशी केल्या होत्या.
श्री.सुब्रमण्यम् यांनी भारतात आणि विदेशात मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आहे. त्यांनी अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांचे अगदी अलिकडचे पुस्तक म्हणजे, “दि न्यू स्ट्रॅटिजी इन इंडियन अग्रिकल्चर”.
श्री.सुब्रमण्यम् यांच्या नैतिक व राष्ट्रीय व्यक्तित्व बांधणीतील समर्पित जीवनाबद्दल फेब्रुवारी १९८८ मध्ये त्यांना नवी दिल्लीच्या जय तुलसी फाऊंडेशनने सुरू केलेला `अनुव्रत पुरस्कार` देण्यात आला. एक लाख रूपये रोख रक्कम आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्युत्कृष्ट वर्तणुकीकरिता बक्षीसे देण्याच्या प्रयोजनार्थ हा पुरस्कार भारतीय विद्याभवनला देण्यात आला. अत्युत्कृष्ट वर्तणुकीकरिताचे हे पुरस्कार तीस शाळांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येतात.
श्री.सुब्रमण्यम् यांना खेळाची विशेषकरून टेनिस व क्रिकेट या खेळांची खूप आवड आहे.
प्रकाशने:
- वॉर ऑन पॉव्हर्टी
- दि न्यू स्ट्रॅटिजी इन इंडियन अॅग्रिकल्चर.
- सम कन्ट्रीज विच आय व्हिझिटेड राउंड द वर्ल्ड
- दि इंडिया ऑफ माय ड्रीम्स
कुटुंब:
पत्नी: श्रीमती शंकुतला सुब्रमण्यम्
मुलगा: श्री.राजशेखर
मुली: श्रीमती अरूणा रामकृष्णन्, श्रीमती स्वतंत्रा सक्तीवेल
कायमचा पत्ता : रिव्हर व्ह्यू, कोट्टुर्पुरम, मद्रास – ६०० ०८५ (तामिळनाडू)