महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण
स्त्रियांमध्ये ‘मल्टिटास्किंग’ची क्षमता : राज्यपाल
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण
“भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांचे स्थान श्रेष्ठ आहे. कुटुंबाला सांभाळून स्वतःला सिद्ध करणाऱ्या स्त्रियांमध्ये ‘मल्टिटास्किंग’ची क्षमता असते. त्यामुळेच जिथे नारीची पूजा होते, तिथे देवतेचा वास असतो, असे म्हणतात,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी केले. स्त्रीशक्ती अद्भुत असून, युवापिढीला घडविण्याचे काम तिच्या हातून होत आहे, असे त्यांनी नमूद केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सूर्यदत्त वुमेन एम्पॉवरमेंट अँड लीडरशिप अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार-२०२३’ वितरण सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. मुंबई येथील राजभवनात झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात पद्मश्री परमपूज्य आचार्य श्री चंदनाजी महाराज, भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, संचालक प्रा. अक्षीत कुशल, प्रशांत पितालिया, रोशनी जैन, रोहित संचेती, नयना गोडांबे, गौरव शर्मा, हृषिकेश पांडे, मारुती मारेकरी, सरी नागलाई, सचिन मेने आदी उपस्थित होते.
पद्मश्री परमपूज्य आचार्य श्री चंदनाजी महाराज (अध्यात्म व मानव कल्याण), सिद्धेश्वर सिद्धसना महिला साधक (शिल्पा, नम्रता, नीता, मीनाक्षी) – आरोग्य व कौशल्य विकास, सायली आगवणे (परफॉर्मिंग आर्ट्स), आंचल भाटिया (महिला उद्योजकता), सीए कोमल चांडक (फिनटेक), डॉ. रुमा देवी (सामाजिक कार्य व उद्योजकता), सुमन धामणे-डिजिटल इन्फ्लुएन्सर (आपली आजी), विद्या विठ्ठल जाधव (समाजकार्य), डॉ. ललिता जोगड (साहित्य), डॉ. शैलजा काळे (वैद्यकीय सेवा), अलका कारवा (आरोग्य व तंदुरुस्ती), डॉ. नमिता कोहोक (शौर्य व साहस), ऍड. श्वेता कौशिक (कायदा व न्याय), पूर्वा कोठारी (ग्लोबल इंटरप्रेन्युअरशिप), नीता मोरे (आरोग्य व प्रशासन), डॉ. नागा ज्योती एन. (समाजपरिवर्तन), रेखा नहार (सौंदर्य व सामाजिक कार्य), प्राची पंड्या (शास्त्रीय नृत्य), राजश्री पारख (अध्यात्म व समाजकार्य), शलाका पारनेरकर (समाजसेवा), संगीता पाटील (शौर्य), तोनीषा पवार (मोटिवेशनल स्पीकर), मुक्ता पुणतांबेकर (समाजकार्य), ऍड. क्रांती राठी (कायदा व न्याय), पोलीस अधिकारी विनिता साहू (प्रशासकीय सेवा), तेजस्विनी सावंत (क्रीडा), अर्चना शर्मा (ग्लोबल एक्सलन्स लीडर), सौंदर्या शर्मा (मनोरंजन), ललिता तिवारी (शिक्षण व समाजकार्य), सायली नलवडे-कविटकर (पोलिटिकल कॅम्पेनर) यांना ‘सूर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्कार-२०२३’ देऊन गौरविण्यात आले.
रमेश बैस म्हणाले, “सर्वच क्षेत्रात स्त्रिया नेतृत्व करत कर्तृत्व गाजवत आहेत. सुखी परिवार, आदर्श राष्ट्रांच्या निर्मितीत योगदान देत आहेत. आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. कारण इथल्या समाजाला घडविण्याचे काम स्त्री करते. याच स्त्रीशक्तीला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे. ‘सूर्यदत्त’ परिवाराच्या माध्यमातून सुषमा व प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया या दाम्पत्याने समाजातील या स्त्रीशक्तीला सन्मानित करून एक आदर्श घालून दिला आहे. यातून विद्यार्थ्यांना, इतर महिलांना प्रेरणा मिळेल व तेही जिद्दीने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करतील.”
आचार्य श्री चंदनाजी महाराज म्हणाल्या, “जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समाजाच्या उन्नतीचे कार्य करत राहावे. कोणताही धर्म आपल्याला द्वेष शिकवत नाही. नि:स्वार्थ भावनेतून सेवा, शिक्षण आणि साधनेचे कार्य व्हायला हवे. समाजात मैत्री, प्रेम आणि सद्भावनेचे नाते अधिक दृढ व्हावे. समाज साक्षर, सुसंस्कृत करण्याचे काम व्हायला हवे.”
शाम जाजू म्हणाले, “व्यक्तीच्या स्वभाव गुणांनी त्यांचे श्रेष्ठत्व ठरते, हे दाखवणारा हा सोहळा आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माता-भगिनींची निवड करून त्यांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. संवादासाठी ‘ईमेल’ व ‘फिमेल’ अतिशय महत्वपूर्ण आहे. महिलांच्या सन्मानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना आणल्या आहेत.”
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना दरवर्षी सुर्यदत्त स्त्रीशक्ती राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा राज्यपालांच्या हस्ते स्रीशक्तीला गौरवताना आनंद होतो आहे. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचा सन्मान करून पुढील कार्यासाठी त्यांना प्रेरित करणे आपले कर्तव्य आहे.”
आनंद सिंग यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.