बंद

    महाराष्टाची संस्कृती दर्शविणा-या कला प्रदर्शनाचे राज्यपालांच्याच्या हस्ते उद्घाटन

    प्रकाशित तारीख: February 7, 2020

    महाराष्टाची संस्कृती दर्शविणा-या कला प्रदर्शनाचे
    राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

    मुंबई दि. 7 : विविधतेत एकतेचे प्रदर्शन दाखवणारी महाराष्ट्राची संस्कृती कलाकारांनी कुंचल्याने साकारली आहे. चित्रप्रदर्शनातील अंजिठा -एलोरा येथील चित्रशैली जशी अमर आहेत, त्याचप्रमाणे तुमची कलाही कायम स्मरणात राहो अशी सदिच्छा राज्यपाल तथा दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.

    दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर आणि सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्राची संस्कृती व लोककला’ या विषयावरील चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन व कलाकारांचा सत्कार राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यपाल बोलत होते.

    राज्यपाल म्हणाले, भारताची संस्कृती जगभर नावाजली जाते. कलेचे जतन व संगोपन करण्याचे कार्य दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र करीत आहे. महाराष्ट्राची संस्कृती व लोककला विषयावरील प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रतिथयश तसेच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळाले आहे.

    याचबरोबर महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा, लोककला, नाट्य, कलाकृतीचे दर्शन या चित्रांमधून व्यक्त होते. कलाक्षेत्रात आधुनिक कलेचे शिक्षण घेताना वास्तववादी आणि आधुनिक काम करणा-या कलाकारांनीया चित्रांद्वारे एैतिहासिक महाराष्ट्र उभा केला आहे. या कलांमधून कला आणि संस्कृतीचेजतन केल्याचे दर्शन होत आहे, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

    २७ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२० या कालावधीत चित्रकार्यशाळेचे आयोजन सर ज. जी. स्कुल ऑफ आर्टस येथे आयोजित करण्यात आले होते. यातील निवडक ४८ चित्रांचे प्रदर्शन राजभवन येथे भरविण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान चित्र कॅटलॉगचे विमोचन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. मुंबई शहर ते आदिवासी, ग्रामीण भाग, गड किल्ले, अजिंठा लेण्यातील भारतीय चित्रशिल्पे व बुद्धप्रतिमा, महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल, लोककला, पौराणिक कथांची माहिती कलाकारांनी रंग, रेषा, आकाराच्या दृश्यभाषेत तैलरंग ऍक्रलिक व मिश्र माध्यमातून कॅनव्हासवर कलाकृती साकारल्या आहेत. या कलाकृती राजभवन येथील विविध दालनात ठेवण्यात येणार आहेत.

    यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक डॉ. दिपक खिरवाडकर, सर ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विश्वनाथ साबळे आदीसह प्राचार्य आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते