मनन, चिंतन आणि लेखनासाठी वाचन करण्याची सवय लावा — राज्यपाल
मुंबई दि. 15: आपण कितीही व्यस्त असलो तरी पुस्तक वाचण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेणे आवश्यक असते कारण पुस्तकांमुळे आपल्याला मनन,चिंतन आणि लेखन करण्याची ऊर्जा मिळते असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नमूद केले.
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच निमित्ताने आज राजभवन येथे माजी राष्ट्रपती ए.पी.जे कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर राजभवन येथील अधिकारी/कर्मचारी यांनी काही कविता, गोष्ट, उतारे उपस्थितांना वाचून दाखवत अनोख्या पध्दतीने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. या कार्यक्रमास राजभवन येथील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की, भारताचे माजी राष्ट्रपती हे जरी वैज्ञानिक असले तरी त्यांना मनन, चिंतन करण्याची सवय होती. आजच्या तरुणांनी वाचले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक सकारात्मकेचा संदेश देणरे आहे. आजच्या त्यांच्या जयंती निमित्ताने आपण सर्वांनी वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहनही राज्यपाल यांनी यावेळी केले.