बंद

    भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपालांचे भाषण.

    प्रकाशित तारीख: January 26, 2017

    शिवाजी पार्क, मुंबई येथे गुरुवार दिनांक 26 जानेवारी, 2017 रोजी सकाळी 9.00 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. चे. विद्यासागर राव यांच्याकडून देण्यात येणारे भाषण.

    बंधू आणि भगिनींनो,

    1. मी महाराष्ट्रातील जनतेला भारतीय प्रजासत्ताकाच्या 67 व्या वर्धापन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो. तसेच जनतेला 2017 या नवीन वर्षाच्यादेखील हार्दिक शुभेच्छा देतो.

    2. संविधानात अंतर्भूत असलेली लोकशाही मूल्ये बळकट करण्याप्रती असलेली आमची बांधीलकी अधिक दृढ करण्याचा आणि देशाच्या तसेच राज्याच्या सर्वांगीण विकासाकरिता काम करण्यासाठी स्वत:ला पुन्हा कटीबद्ध करण्याचा हा दिवस आहे.

    3. ज्यांनी संविधानाचा मसुदा तयार केला असे, संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तसेच घटना समितीचे सदस्य यांना मी याप्रसंगी नम्रपणे आदरांजली वाहतो.

    4. लोकशाही व समाजवादी व्यवस्थेची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी दीर्घ व खडतर मार्ग आम्ही यशस्वीरीत्या पादाक्रांत केलेला आहे. आज आपण मागे वळून पाहिले असता, जीवनाच्या विविध क्षेत्रात आपल्या संघटित प्रयत्नांतून प्रगती करणे शक्य झाल्याचे आम्हाला समाधान वाटते. आपल्या अर्थव्यवस्थेच्या कित्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडत आहेत. सर्वांगीण विकास साध्य करण्याच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे.

    5. मला आपणास सांगण्यास आनंद होत आहे की, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राने विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाची स्थापना केली आहे.

    6. सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करण्याच्या आणि दहशतवादी हल्ल्यांच्या पुनरावृत्तीस प्रतिबंध करण्याच्या हेतूने, मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये 7261 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

    7. राज्यात महानगरपालिका आणि पंचायत राज संस्था, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. संविधानातील त्र्याहत्तराव्या व चौऱ्याहत्तराव्या सुधारणांनंतर ज्यांना घटनात्मक संस्थांचा दर्जा प्राप्त झाला आहे, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांप्रती आपला विश्वास व बांधीलकी लोकशाही आचरणातून प्रतिबिंबित होते. महाराष्ट्राच्या जनतेने लोकशाही भावनेने व्यवस्थितपणे आणि शांततापूर्ण रीतीने आपल्या मताधिकाराचा वापर करावा, असे माझे आवाहन आहे.

    8. महाराष्ट्राने सर्वांगीण विकासाच्या वाटचालीस प्रारंभ केला आहे. सर्व नागरिकांस मी असे आवाहन करतो की, राष्ट्र उभारणीच्या या प्रयत्नात शासनाबरोबर सक्रियपणे सहभागी होऊया आणि सुसंधी, उद्योग, सामाजिक समानता व बंधुतेची भूमी म्हणून महाराष्ट्राचा नावलौकिक आणखी उंचावूया.

    9. माझे भाषण संपण्यापूर्वी, प्रजासत्ताक दिनाच्या या शुभ प्रसंगी राज्याच्या जनतेला मी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. देशातील प्रमुख राज्य म्हणून महाराष्ट्राचे असलेले अग्रस्थान कायम ठेवण्याचा आणि भविष्यात विकासाची सतत नवनवीन शिखरे गाठण्याचा आपण सर्वजण निर्धार करूया.

    जय हिंद ! जय महाराष्ट्र !!