बंद

    भारताच्या प्रगतीमध्ये ज्यू नागरिकांचे योगदान अमूल्य – राज्यपाल चे विद्यासागर राव

    प्रकाशित तारीख: January 13, 2019

    ज्यू नागरिकांची पवित्र वास्तू शारे रासोन सिनेगॉगला 175 वर्ष पूर्ण

    भारताच्या प्रगतीमध्ये ज्यू नागरिकांचे योगदान अमूल्य

    – राज्यपाल चे विद्यासागर राव

    मुंबई, दि. 13 :- भारताच्या विकासात ज्यू नागरिकांनी अमूल्य योगदान दिले आहे. चित्रपट, व्यापार, शिक्षण, वैद्यकीय सेवा अशा अनेक क्षेत्रात या नागरिकांनी अमिट ठसा उमटविला आहे, असे गौरोवपूर्ण उद्गार राज्यपाल विद्यासागर राव यांनी काढले.

    बेणे इझ्रायली ज्यू समाजाच्या शारे रासोन सिनेगॉग या पवित्र वास्तूला 175 वर्षांचे झाल्यानिमित्त जे जे रोड, भायखळा येथील मागन डेव्हिड सिनेगॉग येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

    राज्यपाल म्हणाले, भारतात चार धाम यात्रा पूर्ण करण्याला धार्मिक महत्त्व आहे. मी अद्याप चारधाम यात्रा केली नाही, परंतु ज्यू धर्मियांच्या चार सिनेगॉगला भेटी दिल्या असल्यामुळे माझी ४ धाम यात्रा पूर्ण झाली आहे असे मी मानतो. सन 1843 मध्ये बांधण्यात आलेले शारे रासोन सिनेगॉग हे भारतातील बेणे इझ्रयली ज्यू लोकांचे दुसरे जुने सिनेगॉग आहे.

    महाराष्ट्र आणि मुंबईचा इतिहास हा ज्यु धर्मियांच्या योगदानाचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण आहे. बगदादी ज्यु कुटूंबातील डेविड ससून यांनी मोठ्या प्रमाणात समाजपयोगी कामे केली. यामध्ये मुंबईतील डेवीड ससून ग्रंथालय, फ्लोरा फाऊंटन, गेट वे ऑफ इंडिया, पुण्यातील ससून रूग्णालय आदींचा उल्लेख करता येईल.

    भारतातील ज्यू नागरिकांची संख्या ही दिवसेंदिवस कमी होत आहे याबद्दल खेद व्यक्त करून राज्यपाल यांनी ज्यु नागरिकांचे भारतातील योगदान हा विषय शालेयस्तरावरील पाठ्यपुस्तकात समावेश करावा अशी इच्छा व्यक्त केली. महाराष्ट्रात ज्यू नागरिकांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाही यावेळी राज्यपालांनी उल्लेख केला. ससून ट्रस्टचे अध्यक्ष सॅलोमन सोफर यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते जागतिक ज्यू परिषदेच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    कार्यक्रमाला इझ्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत याकोव फिंकेलस्टाईन, धर्मगुरू (रबाय) याकोब मेनाशे, धर्मगुरू रोमिएल डॅनियल, शारे रासोन सिनेगॉगचे अध्यक्ष जुडा सॅम्युएल तसेच देशविदेशातील निमंत्रित उपस्थित होते.