बंद

    प्रा. (डॉ.) व्ही. आर. शास्त्री यांची लोणेरे येथील तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

    प्रकाशित तारीख: March 6, 2019

    सुरतकल, कर्नाटक येथे असलेल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील खनन अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक डॉ वेदाला रामा शास्त्री यांची लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या (बाटु) कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी बुधवारी (दिनांक ६) डॉ. शास्त्री यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ. शास्त्री यांची नियुक्ती पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे.

    शासन नियुक्त कुलगुरू डॉ. विलास गायकर यांचा कार्यकाळ दिनांक १ मार्च २०१९ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त होते. त्यानंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर बाटुच्या कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.

    डॉ व्ही. आर. शास्त्री (जन्म १६ फेब्रुवारी १९५९) यांनी आयआयटी, वाराणशी येथून एम.टेक व पीएच.डी. प्राप्त केली असून उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन, प्रशासन तसेच संशोधनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्यपालांनी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठीत केली होती. आयआयटी मुंबईचे संचालक प्रो. देवांग खक्कर तसेच शासनाचे प्रधान सचिव भूषण गगराणी हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. शास्त्री यांच्या नियुक्तीची घोषणा केली.