बंद

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात आत्मनिर्भर भारत सेलचे उद्घाटन

    प्रकाशित तारीख: August 20, 2020

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात आत्मनिर्भर भारत सेलचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन संपन्न

    अलिबाग,जि.रायगड दि.17 (जिमाका) :- 74 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दि.15 ऑगस्ट 2020 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठातील आत्मनिर्भर भारत कक्षाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे केले.

    यावेळी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री प्रकाश जावडेकर यांची ऑनलाईन उपस्थिती होती.
    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात आत्मनिर्भर भारतासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केल्याबद्दल कुलगुरू प्रो.वेदला रामा शास्त्री यांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले, देशातील तरुणांनी मातृभाषेचे महत्त्व समजून घेऊन आपली स्वतःची शक्ती जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आत्मनिर्भर भारत साध्य करण्यासाठी आत्मविश्वासाची भूमिका पुढे आणावी आणि देशातील तरुणांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यात आपल्या विद्यापीठांनी मोठी भूमिका बजावावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. शेवटी त्यांनी उपस्थितांना व्यावहारिकदृष्ट्या काम करण्याची खूप गरज असून आत्मनिर्भर भारताचे ध्येय साकारण्यासाठी ‘श्रम’ महत्वाचे असल्याचे सांगितले.

    केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या भाषणात आत्मनिर्भर भारत कक्ष स्थापन करून विद्यापीठाने केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. आत्मनिर्भर होण्याची पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे नावीन्य आहे, असे सांगून नाविन्यपूर्ण वाढ आणि सुधारणा करण्यात विद्यापीठांच्या भूमिकेवरही भर दिला.पुढे त्यांनी जगभरातील जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या नाविन्यपूर्ण कार्यात भारतीयांनी घेतलेल्या भूमिकेची काही उदाहरणे नमूद केली. सध्याच्या संदर्भात नवनिर्मितीचा हातभार लावण्यापेक्षा नवनिर्मितीचा मालक होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

    या ऑनलाईन कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.वेदला रामा शास्त्री यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने घेतलेल्या पुढाकारांबद्दल उपस्थित सर्वांना माहिती दिली. विद्यापीठामध्ये आत्मनिर्भर भारत कक्षाची स्थापना हे या दिशेने पहिले पाऊल असून संपूर्ण देशातील सर्व विद्यापीठांमध्ये ही पहिली पायरी असल्याचे सांगून त्यांनी विद्यापीठाच्या आत्मनिर्भर भारत सेलची रचना, पुढील वाटचाल याविषयीची सविस्तर माहिती दिली.

    कुलगुरू प्रा.शास्त्री म्हणाले की, युवकांमध्ये नाविन्य आणि सर्जनशीलता वाढविण्याच्या उद्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठात (डीबीएटीयूने) आत्मनिर्भर भारत सेल तयार करण्याचा निर्णय घेतला. आपला देश केवळ स्व-टिकाव व आत्म-प्रतिरोधकच नव्हे तर ज्ञान व तंत्रज्ञान हस्तांतरण केंद्र बनविण्यासाठी विद्यापीठाने स्वतःच्या मार्गाने योगदान देण्याच्या संकल्पावर जोर दिला आहे. तसेच संपूर्ण देशात अशा प्रकारे आत्मनिर्भर भारत सेल सुरु करण्याची सर्वप्रथम संधी डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
    00000